खाजकुइली ही वर्षायू वेल फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव म्युक्युना प्रुरीएन्स अहे. उष्ण कटिबंधातील वनांमध्ये तसेच शेतांच्या कुंपणावर सामान्यत: वाढते. भारतात व पाकिस्तानात ती सर्वत्र आढळते.
खाजकुइली ही आरोही वनस्पती (वेल) असून ती सु. १५ मी.पर्यंत वाढते. पाने संयुक्त व त्रिदली असून पर्णिकांचा आकार अंडाकार असतो. पानांच्या खालच्या बाजूला लव असते. फुले नोव्हेंबरात झुकलेल्या फुलांच्या मंजिरीत येतात. फुले ६-३०, मध्यम आकाराची, गर्द जांभळी व पतंगरूप असतात. शेंगा गोलसर, फुगीर, दोन्ही टोकांस वाकलेल्या, ५ ते ७.५ सेंमी. लांब, फिकट पिंगट व राठ केसांनी आच्छादलेल्या असतात. बिया लहान व ५-६ असतात.
वेल कोवळी असताना पूर्ण वेलीवर केस असतात. तसेच कोवळ्या पानांवर दोन्ही बाजूंना केस असतात. वेल जून झाल्यावर मात्र पूर्ण वेलीवर फारसे केस नसतात. या वनस्पतीच्या शेंगांवर मात्र केसाचे दाट आवरण असते. या केसांमध्ये म्युक्युनेन (प्रथिन) आणि सिरोटोनिन (मोनो-अमाइन) ही रासायनिक संयुगे असतात. यांच्यामुळे केसांचा संपर्क त्वचेशी झाल्यास प्रचंड खाज सुटते.
मूळ, शेंग आणि बिया उपयुक्त आहेत. मुळाचा काढा जलोदरात लघवी साफ होण्यासाठी देतात. तसेच मुळाचा लेप पोटावर बाहेरून लावतात. मज्जासंस्थेच्या रोगात, चेहर्याच्या पक्षाघातात आणि अर्धांगवायूत मूळ वापरले जाते. आमांश आणि गर्भाशयाच्या त्रासात मूळ वापरतात. मुळाचा काढा स्त्रीरोगात उपयुक्त आहे. शेंगा कामोत्तेजक असतात. शेंगा कृमिनाशक म्हणूनही वापरतात. बियांचे चूर्ण श्वेतप्रदर आणि स्वप्नावस्थेत वापरतात. बिया विषशामक, विरेचक व शक्तिवर्धक असून गरमीवर उपयोगी आहेत.