कमळ ह्या वनस्पतीचे फूल भारत आणि व्हिएटनाम या देशांचे राष्ट्रीय फूल आहे. ही सुंदर, बळकट जलवनस्पती निंफिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निलंबो न्युसीफेरा असे आहे. जगभर या वनस्पतीच्या सु. १०० जाती आढळतात. ही वनस्पती मूळची चीन, जपान व भारत या देशांतील असावी; हिचा प्रसार भारतात सर्वत्र व इराणपासून पूर्वेस ऑस्ट्रेलियापर्यंत आहे.

कमळ सामान्यत: गोड्या व उथळ पाण्यात वाढते आणि १-१.५ मी. उंच तर समस्तरीय ३ मी. पर्यंत पसरते. खोड (मूलक्षोड) लांब असून पाण्याच्या तळाशी जमिनीवर सरपटत वाढते, तर पाने पाण्यावर तरंगतात. पाने मोठी, वर्तुळाकार व छत्राकृती असून ६०- ९० सेंमी. व्यासाची असतात. देठ लांब असतो. पानांवरील शिरा पानाच्या मध्यापासून किरणांप्रमाणे पसरलेल्या असतात. कमळाचे फूल सुंदर, सुंगधी व मोठे असून साधारणत: १५-२० सेंमी. व्यासाचे असते. फुले पाण्यावर तरंगतात. फुलांचा रंग त्यांच्या जातीनुसार वेगवेगळा असतो. फुले जुलै-ऑक्टोबरमध्ये येतात. या वनस्पतीच्या लागवडीकरिता बिया व गड्डे (मूलक्षोड) वापरतात.

आशिया खंडात कमळाचे पान, खोड व बी यांचा वापर खाण्यासाठी करतात. गड्डे भाजून, तळून वा लोणचे बनवून खातात. त्यामध्ये रिबोफ्लाविन, निअ‍ॅसीन व क आणि इ जीवनसत्त्वे असतात. कमळाची बी लंबवर्तुळाकार असून तिचा खाण्यात उपयोग करतात. कमळाचा मध गुणकारी असतो. फुले थंड व आकुंचन करणारी (स्तंभक) असून पटकी व अतिसार यांवर देतात. बी ओकारी थांबविण्याकरिता, मुलांना लघवी होण्यास व ज्वरावर देतात. त्वचारोगांवर व कुष्ठांवर थंडावा देण्यासाठीदेखील बियांचा वापर होतो. मुळांची भुकटी मूळव्याध, आमांश, अग्निमांद्य इत्यादींवर गुणकारी असून नायटा व इतर त्वचारोगांवर लेप म्हणून लावतात.

भारतात लाल वा रक्त कमळ आणि उपल्या कमळ या दोन प्रमुख जाती आढळतात.

लाल कमळ : (निंफिया प्यूबिसेन्स ) या औषधीय जलवनस्पतीचे मूलक्षोड आखूड, उभे, गोलाकार व ग्रंथिल असते. उथळ पाण्यात वाढणारी ही वनस्पती भारतातील उष्ण भागात तसेच आफ्रिका, हंगेरी, इंडोनेशिया, फिलिपीन्स इ. प्रदेशांत आढळते. पाने गुळगुळीत देठाची असून त्यांची खालची बाजू लवदार असते. फक्त सकाळीच उमलणारी गर्द लाल ते पांढर्‍या रंगाची फुले सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येतात. मृदुफळ हिरवे व गोल असते. लाल कमळाचे बहुतेक सर्वच भाग खाण्याकरिता वापरतात. बियांच्या अतिसेवनाने विषबाधा होते.

उपल्या कमळ : (निंफिया स्टेल्लॅटा) ही जाती बहुवर्षायू असून तिचे मूलस्थान आग्नेय आशिया होय. मूलक्षोड लंबगोल असते. पाने वर्तुळाकार पण तळाशी अरुंद खंडित भाग असतो. त्यांच्या कडा तरंगित किंवा अखंड असून पानाच्या खालच्या बाजूस किरमिजी रंगाचे ठिपके असतात. फुले फिकट निळी, जांभळी, पांढरी व गुलाबी असून त्यांना किंचित मंद वास असतो. फुले दिवसभर उमललेली असतात.