थोर बौद्ध नैयायिक. तिबेटी परंपरेनुसार दक्षिण भारतांतर्गत प्राचीन चोल देशातील तिरुमलई नावाच्या गावी त्यांचा जन्म झाला. दिङ्नागांचा शिष्य ईश्वरसेन यांच्याकडे न्यायशास्त्राचे काही काळ अध्ययन केल्यानंतर त्यांनी नालंदा येथे जाऊन तेथील महाविहाराचा संघस्थविर आणि विज्ञानवादी आचार्य धर्मपाल यांचे शिष्यत्व स्वीकारले. धर्मकीर्तींनी अनेक ब्राह्मण विद्वानांशी आणि निर्ग्रंथ जैन आचार्यांशी वादविवाद करून सभा गाजविल्या व त्या जिंकल्या. त्यांचा काळ हा इसवी सनाच्या सहाव्या शतकाचा उत्तरार्ध की सातव्या शतकाचा पूर्वार्ध, याविषयी मतांतरे दिसून येतात. त्यांच्या ग्रंथसंपदेत एकूण नऊ ग्रंथ मानले जातात. त्यांपैकी सात या स्वतंत्र रचना, तर दोन स्वतःच्याच ग्रंथांवरील टीका आहेत. हे ग्रंथ पुढीलप्रमाणे : १. प्रमाण-वार्तिक, २. प्रमाण-विनिश्चय, ३. न्यायबिंदु, ४. हेतुबिंदु, ५. वादन्याय, ६. संबंध-परीक्षा, ७. संतानांतरसिद्धी; तर प्रमाण-वार्तिकस्ववृत्ती व संबंध-परीक्षास्ववृत्ती हे दोन टीकाग्रंथ. प्रमाण-वार्तिक हा धर्मकीर्तींचा सर्वांत महत्त्वाचा संस्कृत ग्रंथ होय. नैयायिक म्हणून त्यांच्या श्रेष्ठ बौद्धिक कामगिरीची साक्ष या ग्रंथावरून मिळते. राहुल सांकृत्यायन यांनी तिबेटमधील बौद्ध मठांतील ग्रंथ-संग्रहातून हा ग्रंथ शोधून काढून मूळ संस्कृतांत तो उपलब्ध केलेला आहे. वास्तविक दिङ्नागांच्या प्रमाण-समुच्चय ग्रंथाची मीमांसा म्हणून हा ग्रंथ रचला गेला असला, तरी धर्मकीर्तींनी आपल्या स्वतंत्र प्रतिभेने यात प्रामाण्यवादाचे विश्लेषण केले आहे. सामान्यतः वरील सर्व ग्रंथांतून बौद्धतत्त्वमीमांसा मांडलेली असून धर्मकीर्तींची बहुश्रुतता आणि सूक्ष्म, तरल चिंतनशक्ती यांचा प्रत्यय त्यांतून येतो. हे सर्व ग्रंथ न्यायशास्त्रावर आधारित असून अनुमान प्रमाण व प्रत्यक्ष प्रमाण यांचे विवेचन त्यांत येते. बौद्ध न्यायाच्या अध्ययनाकरिता मूलभूत ग्रंथ म्हणून त्यांचे ग्रंथ मान्यता पावले. त्यांच्या बुद्धिमत्तेची चुणूक या सर्व ग्रंथांत प्रतीत होते. “माझ्या कृतींना जाणून घेऊ शकेल, अशी व्यक्ती मिळणे दुर्मीळ आहे”, अशी खंत प्रमाण-वार्तिक ग्रंथात ते स्वतः व्यक्त करतात.
धर्मकीर्ती हे योगाचार संप्रदायाचे अनुयायी मानले गेले असले, तरी ते पूर्णांशाने त्या संप्रदायाचे नाहीत. विज्ञान हे मूलतत्त्व मानले, तरी बाह्यार्थाचे क्षणिक अस्तित्त्व ते मान्य करतात. त्यामुळे त्यांच्यावर सौतांत्रिक मताचा प्रभाव जाणवतो. विज्ञानवाद्यांचे आलयविज्ञान त्यांना मान्य नाही; कारण त्यांत त्यांना आत्म्याचा वास येतो. विज्ञानवाद्यांच्या आलयविज्ञानाने बौद्ध धर्माच्या उत्तरकालात धर्मकीर्तींच्या ग्रंथांतून बौद्ध ज्ञानमीमांसेतील सर्वोच्च शिखर गाठले; एवढेच नव्हे, तर एकूण भारतीय न्यायशास्त्राच्या विकासाच्या इतिहासातही प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा निर्माण केला. नवव्या शतकात होऊन गेलेल्या वाचस्पतिमिश्राला न्याय-वार्तिक-तात्पर्य-टीका लिहिण्याची प्रेरणा धर्मकीर्तींच्या ग्रंथांनी दिली. ‘भारताचा कांट’ म्हणून त्यांचा गौरव शेरबाट्स्की ह्या रशियन पंडिताने केलेला आहे.
संदर्भ :
- Bapat, Lata, Buddhist Logic : A Fresh study of Dharmakirti’s Philosophy, Delhi, 1989.
- Shcherbatsky, Fyodor, Buddhist Logic, Vol. I, II, Delhi, 1993.
- धर्मकीर्ति, महान बौद्ध दार्शनिक, नई दिल्ली, २००९.
समीक्षक – ललिता नामजोशी