‘कर्मयोग’ या शब्दाचा व्युत्पत्यर्थ ‘कर्माची युक्ती’ किंवा ‘कर्माची कुशलता’ असा आहे. कोणतेही युक्त कर्म करण्याचा मार्ग किंवा पद्धती म्हणजे कर्मयोग, असा त्याचा भावार्थ आहे. धर्मशास्त्रात, विशेषत: वेदांमध्ये, विहित असलेली कर्मे हीच युक्त कर्मे होत, असे वैदिक धर्माच्या संदर्भात मानलेले आहे. या अर्थामध्ये भगवद्‌गीतेने अधिक भर घालून तो अर्थ संपुष्ट केला. युक्त कर्मे फलाची आसक्ती सोडून आणि लाभ-अलाभ, सुख-दुःख, राग-द्वेष, सिद्धी-असिद्धी, जय-पराजय या द्वंद्वांचा अभिनिवेश न धरता सतत करीत राहणे म्हणजे कर्मयोग होय, असा भगवद्‌गीतेचा अभिप्राय आहे. निष्काम बुद्धीने वरील द्वंद्वांचा अभिनिवेश न ठेवता व निरहंकार बनून शास्त्रविहित कर्मे करीत राहिल्याने पापनाश होऊन चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धीच्या योगाने आत्मा प्रसन्न होऊन परतत्त्वाचा किंवा परमेश्वराचा साक्षात्कार होतो आणि साक्षात्काराने मोक्ष सिद्ध होतो, असा कार्यकारणभाव भगवद्‌गीतेत सांगितलेला आहे. अद्वैतवादाप्रमाणे जीवात्माच तत्त्वत: परमात्मा आहे. हे जीवात्म्याचे तात्त्विक स्वरूप म्हणजे परमात्मा असून त्याचा चित्तशुद्धीद्वारा साक्षात्कार होतो. जीवात्म्याहून परमात्मा हा भिन्न आहे, असे विशिष्टाद्वैतवाद किंवा द्वैतवाद मानतो. परमात्मा म्हणजे परमेश्वर. परमेश्वराचा साक्षात्कार होण्याकरिता कर्मयोगाला भक्तियोगाची जोड द्यावी लागते, असे अद्वैतवादही मानतो. विशिष्टाद्वैतवाद व द्वैतवाद भक्तियोगास प्राधान्य देतात व कर्मयोग हा भक्तियोगाचे अंग किंवा सहकारी कारण समजतात. शंकराचार्यप्रणीत अद्वैतवादाप्रमाणे गृहस्थाश्रमातील कर्मयोगाचे महत्त्व मर्यादित आहे, असे समजले जाते. साक्षात्काराची इच्छा द्दढ झाल्यानंतर गृहस्थाश्रमीने कर्मयोग सोडून संन्यासाश्रम स्वीकारावा, असे शंकराचार्यांचे मत आहे. यास ‘विविदिषा संन्यास’ म्हणतात. कर्मयोगाला भक्तियोगाची जोड शांकरमतालाही मान्य आहे. भक्तियोग, कर्मयोग ही या मताप्रमाणे ज्ञानयोगाची अंगे होत. या मतानुसार मध्यवर्ती किंवा मुख्य स्थान ज्ञानयोगाला आहे. संन्यासाश्रमात आत्मतत्त्वाचे श्रवण, मनन आणि निदिध्यासन हे प्रमुख होय. आत्मतत्त्वाचे श्रवण, मनन, निदिध्यासन आणि आत्मसाक्षात्कार मिळून ज्ञानयोग होय. या ज्ञानयोगाला भक्तियोग व कर्मयोग यांची जोड द्यावीच लागते. शंकराचार्यांच्या मताप्रमाणे ज्ञानयोगच मोक्षाचे मुख्य साधन असल्यामुळे, त्यांनी विविदिषा संन्यासाचा आग्रह धरला आहे. परंतु संन्यासाश्रमावाचूनही गृहस्थाश्रमातील कर्मयोग आचरीत असताना भक्तियोग व ज्ञानयोग यांचे सहकार्य घेऊन आत्मसाक्षात्कार होतो व मोक्षाची प्राप्ती होते, असेही शंकराचार्यांनी भगवद्‌गीतेवरील भाष्यात म्हटले आहे.

संन्यास म्हणजे कर्मांचा संन्यास. कर्मांचा संन्यास झाल्याशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही, असे शंकराचार्यांचे मत आहे. त्यांची उपपत्ती अशी : कर्मात द्वैत म्हणजे भेद असतो. कर्ता, कर्म व फल हे ते द्वैत होय. आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाच्या ज्ञानात हे द्वैत राहू शकत नाही. कारण आत्मा हा एकच एक सत्य असून कर्ता-कर्म-फलादी भेद हे मिथ्या म्हणजे अविद्याकृत म्हणजे भ्रमविषय आहेत. अर्थात कर्म हे मिथ्या असल्यामुळे, त्याचाही निरास अविद्येच्या किंवा द्वैतभ्रमाच्या निरासाने होतो. कर्मसंन्यास म्हणजे नैष्कर्म्य; हे केवल व शुद्ध आत्म्याचेच स्वरूप असल्यामुळे, आत्मसाक्षात्कारामध्ये कर्माचा संबंध राहत नाही, हे आपोआपच सिद्ध होते. आत्म्याचे हे नैष्कर्म्य संन्सासवादी व कर्मवादी या दोघांनाही ते अद्वैतवादी असतील, तर मान्यच करावे लागते.

परंतु आत्मसाक्षात्कारी हा जिवंत असेपर्यंत तत्त्वतः नैष्कर्म्य स्थितीस म्हणजे परमात्मास्वरूपास प्राप्त झालेला असला, तरी तो व्यावहारिक दृष्टीने कर्म करीत राहतोच. तात्त्विक दृष्टीने देह, विश्व व त्यातील कर्म हे मिथ्या अतएव खोटे व असत्‌ असले, तरी तो व्यावहारिक दृष्टीने कर्मकर्ता असा असतोच. म्हणून साक्षात्कारी मुक्तावस्थेमध्ये व्यवहारतः कर्मयोग चालूच राहणार. तो गृहस्थाश्रमी असेल, तर तो गृहस्थाश्रमाची कर्मे करणार व संन्यासी असेल, तर तो देहधारणेशी संबद्ध असलेली आणि मैत्री, करुणा इ. गुणांमुळे लोकोद्धाराची कर्मे करीत राहणारच. सनत्कुमार, कपिल महामुनी, पंचशिख, बादरायणव्यास, नारद, गौडपादाचार्य, स्वतः आद्यशंकराचार्य इ. नैष्ठिक ब्रह्मचारी व संन्यासी त्यांनी ज्ञानोत्तर लोकोद्धाराची, विशेषतः तत्त्वोपदेशाची, कर्मे केलीच आहेत; म्हणून ज्ञाननिष्ठेशी कर्मयोगाचा विरोध नाही. भगवद्गीतेत स्वतः भगवान श्रीकृष्ण म्हणतात, की ‘मला काही कर्तव्य किंवा प्राप्तव्यच शिल्लक नाही; काही मिळवायचे राहिले नाही; तरी मी या लोकसंस्थेचा असत्‌ कर्माच्या योगाने होणारा नाश टाळण्याकरिता, साधूंच्या परित्राणाकरिता आणि धर्मस्थापनेकरिता अवतार घेऊन सत्कर्मे करीतच असतो. ज्ञानी सत्पुरुषांनी सत्कर्मे सोडली, तर सामान्य जनांच्या पुढे सत्कर्मांचा आदर्श राहत नाही. सामान्य जन हे श्रेष्ठांचेच अनुकरण करून सत्कर्माचे आचरण करू शकतात. म्हणून ज्ञान्यांनी कर्मयोग लोकोद्धाराकरिता करीत राहणे, हे युक्त होय’.

भगवद्‌गीतेत ज्ञानयोग वा संन्यासयोग, भक्तियोग आणि कर्मयोग हे तिन्हीही सांगितले आहेत; परंतु कर्मयोगाला विशेष महत्त्व दिले आहे. याला आधार म्हणून सांगितलेला युक्तिवाद असा : जिवंत देहाचा कर्म हा स्वभाव आहे. श्वासोच्छ‌्वास, नेत्रांची उघडझाप, आहारविहार इ. कर्मे कोणत्याही देहधार्‍याला टळत नाहीत. देहधारणार्थ विविध कर्मे करावीच लागतात. दुसरे असे, की स्थूल देह, कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये व मन हे त्रिगुणात्मक प्रकृतीचे विकार असल्यामुळे प्रवृत्ती व निवृत्तिरूप कर्म हा त्यांचा स्वभाव आहे. ज्याचा जो स्वभाव आहे. त्या स्वभावाला धरून विहित कर्म कोणते व निषिद्ध कर्म कोणते हे ठरविता येते. शास्त्राप्रमाणे किंवा विवेकबुद्धीप्रमाणे आपले स्वभावनियत कर्म कोणते, हे निश्चित करता येते. तोच स्वधर्म होय. स्वधर्माचरणाने इहलोकीची यात्रा नीट चालून पारलौकिक कल्याण साधता येते. या स्वभावनियत स्वधर्मालाच ‘यज्ञ’ असे म्हणतात. तिसरे असे, की ईश्वरानुग्रह प्राप्त होऊन पापातून मुक्त व्हावे, ईश्वरसाक्षात्कार व्हावा आणि परमशांती मिळावी असे ज्याला वाटते, त्याने निष्काम बुद्धीने, फलाशारहित वर सांगितलेल्या द्वंद्वांचा अभिनिवेश न ठेवता ईश्वरार्पण बुद्धीने, ईश्वरास सर्वथा शरण जाऊन कर्मे करावी; म्हणजे चित्तशुद्धी, ज्ञानप्राप्ती व मोक्षसिद्धी होते. निष्काम बुद्धीने व ईश्वरार्पण बुद्धीने केलेली कर्मे बंधनकारक होत नाहीत. निष्काम बुद्धी म्हणजे अनासक्ती. अनासक्ती हाच खरा संन्यास होय. प्रत्यक्ष कर्मे सोडणे हा संन्सास नव्हे. कारण कर्मे सोडताच येत नाहीत. ईश्वरार्पण बुद्धी हीच भक्ती होय. अशा रीतीने कर्माशी म्हणजे स्वधर्माशी भक्ती, संन्यास आणि ज्ञान यांचा सांधा जुळतो. यालाच गीतारहस्यकार लोकमान्य टिळक ‘ज्ञानमूलक भक्तिप्रधान कर्मयोग’ म्हणतात. येथे ज्ञान हे दोन प्रकारचे : (१) परोक्ष व (२) अपरोक्ष म्हणजे साक्षात्कारात्मक. मुमुक्षू स्थितीत श्रवण, मनन व निदिध्यासन ह्या तीन अवस्थांतील ज्ञान हे परोक्ष ज्ञान होय. अशा प्रकारच्या ज्ञानाची प्राप्ती होऊन ते दृढ होईपर्यंत जी स्थिती असते, ती मुमुक्षूची अवस्था होय. ह्या मुमुक्षू स्थितीत ईश्वराराधनारूप भक्ती चालूच ठेवावी लागते. ज्ञान जेव्हा साक्षात्काराच्या अवस्थेत पोहोचते, तेव्हा त्या अवस्थेत व्यक्ती मुक्त होते.

गीतेच्या कर्मयोगाचे सूत्र –

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।

मा कर्मफलहेतुर्भूर्माते संगोऽस्त्वकर्मणि ॥

(माणसा तुला कर्माविषयीच अधिकार आहे, फलाच्या ठिकाणी कधीही नाही. कर्माचा व फलाचा उद्देशही तुझ्यात असता कामा नये. इतके असूनही कर्म न करण्याची आसक्तीही तुला नको) या एका श्लोकात ग्रथित केलेले आहे, तात्पर्य फलाची, कर्माची व अकर्माची आसक्ती न ठेवता कर्माचा अधिकार अमलात आणणे हेच कर्मयोगाचे मोक्षदृष्ट्या सार आहे. फलाची, कर्माची व अकर्माची आसक्ती नसेल, तर कर्म होईलही व होणारही नाही. देहधारणेची कर्मे होत राहतील; परंतु तीसुद्धा कदाचित होणारही नाहीत. अशा स्थितीत कर्मयोगाची महती गीतेने का सांगावी असा प्रश्न पडतो. हा प्रश्न अवघड आहे. त्याचे उत्तर देण्याचा गीतेनेच प्रयत्न केला आहे. ते देताना सात्त्विक कर्त्याचे लक्षण सांगितले आहे. सात्त्विक कर्ता म्हणजे कर्मयोगी. ते लक्षण असे :

मुक्तसंगोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वितः ।

सिध्यसिध्योर्निर्विकारः कर्ता सात्त्विक उध्यते ॥

(आसक्तीरहित, अनहंकारी, धैर्य व उत्साह यांनी संपन्न आणि सिद्धी व असिद्धी यांपैकी काहीही झाले, तरी ज्याच्या मनात अनुकूल वा प्रतिकूल विकार उत्पन्न होत नाही, तो सात्त्विक कर्ता होय). धृती (चिकाटी) व उत्साह हे दोन गुण ज्याच्या स्वभावात आहेत, म्हणजे स्वभावसिद्ध आहेत, त्याच्या हातून कर्म हे घडतच राहणार. कर्म हे या दोन गुणांचे अपरिहार्य असे कार्य आहे. हे गुण जन्मसिद्ध असले, तर उत्तरकालीन योग्य संस्कारांनी वृद्धिंगत होतात आणि म्हणून साक्षात्कार अवस्थेतही म्हणजे मुक्तस्थितीतही सतत कर्माच्या स्वरूपात प्रगट होत राहतात. चित्तशुद्धीकरिता धर्माचरणाची नितांत आवश्यकता शास्त्रांनी सांगितली आहे. त्यामुळे संस्काराच्या योगाने धृती व उत्साह अधिक कार्यप्रवण होतात.

चित्तशुद्धी होत असताना निष्काम कर्म कर्तव्य म्हणून पार पाडावेच लागते. या स्थितीत सत्कर्म हेच उद्दिष्ट बनते. म्हणजे त्याला साध्यमूल्य येते. ते फलाचे साधन म्हणून काही स्वीकारलेले नसते. कलेला ज्याप्रमाणे साध्यमूल्य असते, तसेच सत्कर्माचे असते. यालाच ‘धर्म’-पुरुषार्थ म्हणतात.

भगवद्‌गीतेत तत्पूर्वीच्या प्राचीन चार धार्मिक संप्रदायांचा समन्वय करण्याचा प्रयत्न केला आहे. ते चार संप्रदाय म्हणजे योग, कर्म, ज्ञान व भक्ती हे होत. (१) योग संप्रदाय हा वेदपूर्वकाळी भारतात अस्तित्वात आला. मोहें-जो-दडो व हडप्पा येथील वेदपूर्व सिंधु संस्कृतीत ध्यानस्थ शिवाच्या मूर्ती किंवा चित्रे सापडली आहेत. बुद्ध व महावीर या आर्यांनी वेदपूर्वकालीन योग्यांच्या संप्रदायाचा, त्यावर नवीन संस्कार करून पुरस्कार केला. गृहस्थाश्रमाचा स्वीकार न करता किंवा स्वीकार केला असल्यास त्याचा त्याग करून, वैराग्यनिष्ठा साधावी व कर्मबंधातून वैराग्यनिष्ठेच्या योगे मुक्त व्हावे, असा संसारमुक्तीचा व दुःखमुक्तीचा मार्ग या दोन्ही धर्मस्थापकांनी सांगितला. चित्त हे सांसारिक वासनेतून म्हणजे तृष्णेतून यम-नियमांनी व ध्यान-धारणेने मुक्त करणे, असा ह्या योगमार्गाचा आशय व मुख्य उद्देश आहे. त्यांनी वैदिकांच्या यज्ञमार्गावर म्हणजे कर्मकांडावर टीका केली. या कर्मकांडाच्या योगाने मनुष्य स्वर्गीय सुखाची व ऐहिक समृद्धीची अभिलाषा धरतो, त्यामुळे त्याचा कर्मबंध सुटत नाही, जन्म-मरण-परंपरा म्हणजे संसारबंध त्याला चुकवता येत नाही, यज्ञात जिवंत प्राण्यांची हिंसा करावी लागते, त्या हिंसेत पाप घडते, यज्ञार्थ हिंसादेखील पापच होय. भगवद्‌गीतेत या योगमार्गाचा वारंवार निर्देश केला आहे.

(२) दुसरा संप्रदाय कर्माचा आहे. वेदांमध्ये कर्ममार्ग सांगितला आहे. उपनिषदांपूर्वीचा सर्व वेदभाग यज्ञपरच आहे. हे यज्ञ गृहस्थाश्रमी माणसाची कर्तव्ये होत. ऐहिक सुखे व ऐहिक सुखसाधने यांच्याकरिता आणि स्वर्गाच्या प्राप्तीकरिता हे यज्ञ सांगितले आहेत. या यज्ञांची तीव्र निंदा गीतेत केलेली आहे. तेथे म्हटले आहे, की हे विषयवासनेने बरबटलेले, यज्ञाशिवाय दुसरा सन्मार्ग नाही, असे म्हणणारे वेदवादी, स्वर्ग प्राप्त झाल्यानंतर, पुण्य क्षीण झाल्यानंतर, पुन्हा या मृत्युलोकात येऊन आदळतात, त्यांना संसारचक्रात सारखे फिरावे लागते.

(३) तिसरा संप्रदाय सांख्य-योग किंवा ज्ञानयोग होय. यानुसार तत्त्वचिंतनातच रममाण झाल्याने शुद्ध आत्मरूप तत्त्वाचा साक्षात्कार होऊन मोक्ष मिळतो. त्रिगुणात्मक प्रकृतीचा बंध तत्त्वसाक्षात्कारानेच तुटतो. या तत्त्वचिंतकांच्या वर्गाचा मुख्य प्रतिनिधी कपिलमुनी होय. संन्यासाला त्याने प्राधान्य दिले होते. कारण तत्त्वचिंतनाला गृहस्थाश्रमाचा व्याप आडवा येतो; परंतु गृहस्थाश्रमातही तत्त्वचिंतन काही थोड्यांना साध्य करता येते, म्हणून वैदिक कर्मकांडाच्या जंजाळात न सापडणारे गृहस्थाश्रमीही मुक्त होतात, असे त्यांचे मत होते.

(४) चौथा संप्रदाय भक्तिमार्गाचा होय. पांचरात्र  वासुदेवभक्तिसंप्रदाय, शिवभक्तिसंप्रदाय, देवी संप्रदाय इ. संप्रदाय मुळात अवैदिक होते. त्यांनी केलेली यज्ञमार्गाची निंदा महाभारतविष्णुपुराणभागवत इ. इतिहास-पुराणांमध्ये वर्णिलेली आहे. गीता मुख्यत: वासुदेवभक्तिसंप्रदायाचा ग्रंथ आहे. परंतु या ग्रंथात वरील चारी मार्गांचा समन्वय साधला आहे. निरहंकार बुद्धीने, अनासक्तीने, इंद्रियवासनांपासून किंवा कामक्रोधादी मनोविकारांपासून मुक्त होणे, हाच खरा योग होय, असे गीतेने सांगितले आहे. आसानप्राणायामादिकांच्या योगाने समाधी सिद्ध करणे, हे योगमार्गाचे स्वरूप होय, तेही गीतेने मान्य केले आहे. मुमुक्षू नसलेल्या सामान्य सांसारिक जनांनी वेदांतील कर्मकांडाचे अनुष्ठान करावे असे सांगून, वैदिक कर्मे फलासक्ती सोडून केली, तर त्याने पापनाश होऊन चित्तशुद्धी होते, असे सांगून वैदिक कर्मकांडाचाही मर्यादित अर्थाने पुरस्कार केला आहे. सांख्यांच्या ज्ञानमार्गातील शुद्ध आत्मतत्त्वाचे विवरण करून ते आत्मज्ञान निष्काम कर्मयोगाला कसे पूरक आहे, हेही दाखवून दिले आहे. वैदिक किंवा शास्त्रोक्त कर्मे ही ईश्वराची पूजाच होय, असे सांगून भक्तीचाही कर्माशी सांधा जुळवून दिला आहे. पहिल्या योगमार्गाच्या दृष्टीने मनुष्य हा आत्मसंयम साधून स्वप्रयत्नानेच मोक्ष प्राप्त करून घेऊ शकतो, असा जैन व बौद्ध यांचा सिद्धांत मात्र गीतेने अमान्य केला आहे. त्रिगुणात्मक विश्वप्रकृती लहानशा जीवात्म्याला अनिवार्यपणे वासनेच्या बंधात, कितीही प्रयत्न केला तरी अडकवून ठेवते. याकरिता त्याविश्वप्रकृतीचाही पूर्णस्वामी असा परमेश्वरच जीवात्म्याला तिच्या बंधातून, त्याला शरण गेल्याने सोडवू शकतो. त्या सर्वशक्तिमानाच्या साहाय्याशिवाय त्रिगुणात्मक विश्वप्रकृतीने निर्माण केलेल्या संसारसागरातून उद्धार होणे शक्य नाही, असे गीतेने निक्षून सांगितले आहे.

हा समन्वय गीतेने साधला आहे, असे सर्वच गीताभाष्यकारांचे मत आहे. परंतु हा समन्वय कशा प्रकारचा आहे, याबद्दल भाष्यकारांमध्ये मतभेद आहेत. शंकराचार्यांच्या पूर्वीच्या भाष्यकारांच्या मते ज्ञान व कर्म या दोन्ही साधनांच्या समुच्चयानेच मोक्ष सिद्ध होतो. भक्ती हे ज्ञान व कर्म यांचे अंग होय. केवळ ज्ञानाने किंवा केवळ निष्काम कर्माने मोक्ष मिळत नाही, असे गीतेचे तात्पर्य आहे. शंकराचार्यांनी या समुच्चयवादाचे खंडन करून संन्यासपूर्वक तत्त्वज्ञान हेच एकमेव मोक्षाचे साधन होय, असे प्रतिपादन केले. तत्त्वसाक्षात्कारात्मक ज्ञान होण्याच्या पूर्वी निष्काम कर्म व भक्ती यांच्या योगाने चित्तशुद्धी होते व त्यामुळे ज्ञानप्राप्ती होते; केवळ ज्ञानच मोक्षाचे साक्षात साधन होय, असे त्यांनी प्रतिपादिले आहे. शंकराचार्यांच्या नंतर लगेच झालेल्या भास्कराचार्यांनी परत वरील ज्ञान-कर्म-समुच्चय प्रतिपादिला आहे. रामानुज, मध्वाचार्य, नीलकंठ इ. भक्तिमार्गी आचार्यांनी भक्ती हीच अंतिम निष्ठा मोक्षास कारण होय आणि ईश्वरसाक्षात्कार म्हणजे ज्ञान हे भक्तिमयच असते, कर्म हेही भक्तिपूर्वकच करावयाचे असते, असा सिद्धांत प्रतिपादिला आहे.

योगी अरविंद हे पूर्णयोगाचा पुरस्कार करतात. या पूर्णयोगात कर्म, भक्ती, योग आणि ज्ञान यांना समप्राधान्य आहे. यांतील कोणताही घटक न्यून असला, तर इतरही घटक अपूर्णच राहतात, असा पूर्णयोगाचा आशय आहे.

ख्रिस्ती तत्त्ववेत्ते साक्षात्कारवादी असले, तरी ते ईश्वरभक्तीलाच मोक्षाचे मुख्य साधन मानतात. ईश्वरशरणतेचा सिद्धांत म्हणजेच भक्तीचा सिद्धांत होय. सर्व पश्चिमी ईश्वरवादी तत्त्ववेत्ते भक्तिमार्गीच आहेत.

संदर्भ :

  • Ghose, Aurobindo, Essays on the gita, Calcutta, 1928.
  • टिळक, बा. गं. श्रीमद्‌भगवद्‌गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र, पुणे, १९६३.
  • शंकराचार्य, श्रीमद्‌भगवद्‌गीताभाष्यम्‌, अष्टेकर प्रत, पुणे, १९१६.
  • श्रीमद्‌भगवद्‌गीता, गीताप्रेस, गोरखपूर, १९३४.

प्रतिक्रिया व्यक्त करा