अर्थशास्त्राच्या इतिहासात संप्रदाय किंवा विचारधारा म्हणजे अर्थव्यवस्थांच्या कार्यपद्धतीवर समान दृष्टिकोन बाळगणाऱ्या विचारवंताचा गट होय. सर्वच अर्थतज्ज्ञ एखाद्या विशिष्ट विचारधारेत मोडतात असे नाही; परंतु आधुनिक काळात विचारधारेनुसार विचारवंतांचे वर्गीकरण करण्याची पद्धत सर्वमान्य आहे. अर्थशास्त्रात आजवर होऊन गेलेल्या प्रमुख सुमारे ३० विचारधारांचे वर्गीकरण मुख्य प्रवाहातले (पारंपरिक) म्हणजेच खाऱ्या पाण्यातले (बर्कली, हार्व्हर्ड, एमआयटी, पेनसिल्व्हेनिया, प्रिन्स्टन, येल इत्यादी विद्यापीठांमधील) आणि गोड्या पाण्यातले निर्हस्तक्षेपवादी विचार (शिकागो, कार्नेगी, मेलॉन, रॉचेस्टर आणि मिनेसोटा या विद्यापीठांमधील) असे केले जाते. हे दोन्ही प्रवाह नव-अभिजातवादी समन्वयी विचार आहेत.
स्टॉकहोम संप्रदाय प्रामुख्याने १९२७ – १९३७ या काळादरम्यान अतिशय प्रभावी होता. स्टॉकहोम संप्रदाय हे नाव अर्थतज्ज्ञ ओहलिन यांनी १९३७ मध्ये दिले. कार्ल गन्नार मीर्दाल, लिंडाल, हमरस्कोल्ड, बर्टिल जी. ओहलीन, लुंडबर्ग हे अर्थतज्ज्ञ या विचारधारेचे प्रणेते होते. अर्थशास्त्रात गतिशील पद्धतींचा विकास करणे, हे त्यांचे सामायिक उद्दिष्ट होते. या शाखेद्वारे अंशकालीन समतोल आणि आंतर-अंशकालीन समतोल विकसित करण्याचे मूलभूत योगदान दिले गेले. या विचारवंतांवर इतर कोणत्याही विचारवंतांचा प्रभाव पडला असल्याचा पुरावा नाही. १९३७ नंतर मात्र या विचारसरणीने अर्थतज्ज्ञ सर जॉन रिचर्ड हिक्स आणि पॉल अँटनी सॅम्युएल्सन यांचे विचार अंगिकारल्याचे स्पष्टपणे दिसून येते. केन्सवादी समग्र अर्थशास्त्राशी या विचारांचे साम्य दिसत असले, तरी केन्स यांच्याप्रमाणे त्यांनी प्रभावी मागणीचे तत्त्व विकसित केले नाही, असे अर्थतज्ज्ञ लार्स पीटर हॅन्सेन, डॉन पॅटिंकीन इत्यादींचे मत आहे.
इसवी सन १९२० च्या दशकापासून झालेला स्टॉकहोम संप्रदायाचा उदय हा मूलतः काहींच्या मते, त्यापूर्वीच्या नव-अभिजात विचारांपासून दूर जाणारे होते; तर हे विचार अठराव्या शतकापासून चालत आलेल्या विचारांचाच परिपाक होता, असेही एक मत मांडले जाते. या विचारांची जगाला पहिली ओळख ब्रिनले थॉमस यांनी आपल्या मॉनेटरी पॉलिसी ॲण्ड क्राइसेस – ए स्टडी ऑफ स्वीडिश एक्सपिरिअन्स या पुस्तकाद्वारे करून दिली. थॉमस यांना असे आढळून आले की, स्वीडिश विचारवंतांचा प्रभाव उजव्या व डाव्या विचारांच्या राजकीय पक्षांवर, बँकिंग तज्ज्ञांवर, उद्योजकांवर आणि सामान्य लोकांवरही होता. या अगोदरच्या इतर विचारवंतांपेक्षा त्यांना अधिक प्रतिष्ठा लाभलेली होती. राजकीय दृष्ट्या तटस्थ आणि शास्त्रशुद्ध अशा या विचारांना पूर्व परंपरा असलीच पाहिजे, असे त्यांचे मत होते. एकूणच विसाव्या शतकात अर्थशास्त्राचा प्रभाव समाजात सर्वत्र दिसून येत. सर्व सामाजिक शास्त्रांत अर्थशास्त्राला केंद्रस्थान मिळाले होते. अर्थतज्ज्ञ योझेफ आलोईस शुंपेटर यांच्या मताप्रमाणे, अर्थशास्त्राला व्यावहारिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी असलेली साधने मानले जाई. जॉर्ज जोसेफ स्टिगलर यांच्या मते, समाजाने अर्थतज्ज्ञांचे म्हणणे पुरेशा गांभीर्याने घेतले नसले, तरीही अर्थशास्त्राचा प्रभाव नाकारता येणार नाही. समाजातील समस्यांचे तटस्थ स्पष्टीकरण देण्यात अर्थशास्त्राचे योगदान महत्त्वाचे आहे. प्रत्यक्षात ते सर्वत्रच खरे नाही.
इतिहास : एकोणीसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन-तीन दशकांत स्वीडिश विचारांमध्ये मुक्त व्यापार व निर्हस्तक्षेपाचे वर्चस्व होते. ‘स्वीडिश इकॉनॉमिक सोसायटी’ या प्रतिष्ठित सभासद असलेल्या संस्थेच्या नियमावलीत मुक्त व्यापार गृहीत होता. यातील सर्वाधिक चर्चेचा विषय संरक्षण व जकाती हा असे. या संस्थेतूनच १८९० – १८९८ यांदरम्यान अर्थतज्ज्ञ डेव्हिड डेव्हिडसन आणि योहान गस्टाव्ह नट विकसेल यांचे नावलौकिक झाले; मात्र एकोणीसाव्या शतकातील स्वीडिश अर्थतज्ज्ञ हे व्यावसायिक आणि पूर्णवेळ अर्थतज्ज्ञ नसून ते पेशाने विधिज्ञ, राजकारणी किंवा प्राध्यापक होते. आर्थिक विचार मांडणे हा त्यांचा अर्धवेळ छंदाचा उद्योग होता. सामान्य जनतेपासून ते अलिप्त होते.
इसवी सन १९०० – १९३० या काळात पूर्ण वेळ अर्थशास्त्रज्ञांची परंपरा सुरू झाली. हळूहळू अनेक ठिकाणी अर्थशास्त्राचा स्वतंत्र अभ्यास होऊ लागला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्वीडिश अर्थशास्त्र हे विधी, राज्यशास्त्र व राजकारण यांच्यापासून मुक्त होऊन स्वतंत्र शास्त्र बनले. विविध सिद्धांत आणि विशिष्ट अभ्यासपद्धती विकसित केली गेली. समाजावर पहिल्या पिढीतील अर्थशास्त्रज्ञांचा प्रचंड प्रभाव होता. त्यांपैकी गुस्ताव्हो कॅसल हे या प्रभावळीतील पहिले प्रभावी विचारवंत होय. त्यांच्या विचारांचा प्रभाव इतर देशांवरही होता. पुढील काळात केन्सवादामुळे हा प्रभाव ओसरला. त्याचबरोबर एली हेकशर, स्वेन ब्रिसमन या अर्थशास्त्रज्ञांनीही आपापल्या परीने भर टाकली; मात्र त्यांची कामगिरी ऐतिहासिक दृष्टिकोनाअभावी फार मोठी ठरली नाही.
ओहलिन यांच्या मते, पूर्ण रोजगार परिस्थितीत बचतीपेक्षा गुंतवणूक कमी झाली, तर आर्थिक मंदी निर्माण होईल. घटत्या व्याजदराने गुंतवणुकीला चालना न दिल्यास एकूण उत्पन्न व रोजगार घटेल, असा त्यांचा विश्वास होता. केन्स यांच्या जनरल थिअर’या ग्रंथातसुद्धा या प्रमाणेच निष्कर्ष होते. याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी इकॉनॉमिक जर्नलमध्ये ‘सम नोट्स ऑन दी स्टॉकहोम थिअरी ऑफ सेविंग ॲण्ड इन्व्हेस्टमेंट’ या शीर्षकाचा लेख लिहिला. याबाबतीत अर्थतज्ज्ञ मीर्दाल यांचेही मत मिळतेजुळते होते. किंबहुना, शासनाने वित्तिय व मौद्रिक धोरणांद्वारे हस्तक्षेप करावा, अशी कल्पना सर्वप्रथम त्यांनीच मांडली असा ओहलिन यांचा दावा होता. यावर विल्यम बार्बर यांच्या मते, ‘जर १९३६ पूर्वी मीर्दाल यांचे विचार इंग्रजीत उपलब्ध झाले असते, तर ज्याला आपण आज केन्स विचारसरणी म्हणतो, त्यालाच आज मीर्दाल विचारसरणी म्हटले गेले असते. मीर्दाल यांनी ज्यात मुख्य चलाचा संबंध रेखीय असतो अशी मूलभूत संकल्पना विकसित केली.
वैचारिक योगदान : १) समतोलावरील विचार : सर्वप्रथम मीर्दाल यांच्या प्रबंधात कॅसेल यांच्या अपूर्ण स्पष्टीकरणाचे अधिक विवेचन आहे व गतिशील दृष्टिकोन विकसित केला गेला आहे. यात भविष्यातील अपेक्षा प्रत्यक्षात येण्यापूर्वीच समतोल पातळीवर परिणाम करतात, हे मांडले गेले आहे. याला मीर्दाल यांनी ‘अपेक्षा पद्धत’ (अँटिसिपेशन मेथड) असे म्हटले आहे. मुळातल्या समतोलाच्या औपचारिक सिद्धांतामध्ये ‘अपेक्षा’ या बाह्य चलाचा समावेश केल्याने ही विचारसरणी गतिशील ठरते. लिंडाल यांनी अंशकालीन (टेंपररी) व आंतरअंशकालीन (इंटरटेंपररी) समतोल पद्धत विकसित केली. यात प्रत्येक व्यक्तीबाबत वस्तूच्या किमतीच्या अपेक्षित पातळीत मागणी आणि पुरवठ्याचा तोल साधला जाऊन सर्व अपेक्षा पूर्ण होतात, असे स्पष्टीकरण आहे. या दृष्टीने लिंडाल यांचा १९२९ मधील ‘दी प्लेस ऑफ कॅपिटल इन थिअरी ऑफ प्राइस’ हा लेख महत्त्वाचा आहे. लेखात स्थिर समतोलात भांडवली वस्तूंचा समावेश केल्याने होणारे परिणाम स्पष्ट केले आहेत. आंतर अंशकालीन समतोल समग्रलक्षी समस्यांचा अभ्यास करत नसून स्थिर समतोलाच्या तौलनिकतेतील मर्यादा दर्शवतो. लिंडाल यांच्याप्रमाणेच अर्थतज्ज्ञ फ्रिड्रिक ऑगस्ट फोन हायेक यांनी १९२८ मध्ये आंतर अंशकालीन समतोल स्पष्ट केला होता; परंतु लिंडाल यांना हायेक यांचे विचार माहित होते की, नाही हे कळायला मार्ग नाही. आंतरअंशकालीन समतोल गतिशील विश्लेषण करू शकतो असे मानले गेले असले, तरी प्रत्यक्षातील गणिती मांडणीत फार मोठी ‘गतिशीलता’ दिसून येत नाही; कारण वस्तूंच्या किंमती, प्रमाण आणि भिन्न भिन्न काळातील व्याजदर प्रत्येक काळातील समतोलाशी एकाच वेळी अभ्यासले जातात. या मर्यादेतूनच लिंडाल यांनी अंशकालीन समतोल संकल्पना विकसित केली. या दोन्ही दृष्टिकोनात ‘काळ’ ही संकल्पना महत्त्वाची आहे. काळानुसार गतिशील समतोलाचे वर्गीकरण सुरुवातीच्या टप्प्यात ढोबळमानाने झालेले असले, तरी नंतर हमरस्कोल्ड यांनी त्याला विश्लेषणात्मक आधार पुरविला. अंशकालीन समतोल म्हणजे काळाच्या प्रत्येक टप्प्यावर मागणी-पुरवठा-किंमती समतोलात असतात व या सर्व आंशिक समतोलाच्या मालिकेतून समतोलाची गतिशील प्रक्रिया स्पष्ट केली जाते. हे स्पष्टीकरण हिक्स यांच्या मूल्य आणि भांडवल या ग्रंथापूर्वीच केलेले आढळते. लिंडाल यांच्या स्पष्टीकरणावर मीर्दाल व लुंडबर्ग यांनी त्वरित टीका केली. लुंडबर्ग यांची टीका जरी आंतर अंशकालीन समतोलापुरती असली, तरी ती आंशिक समतोलालाही लागू होते. या टीकेचा मुख्य रोख समतोलाच्या क्रममालिकांवरील बाह्य बदलांचा प्रभाव स्पष्ट न करण्यावर होता. म्हणजेच, विविध काळातील समतोलांमधील ‘जोडणी’ अपूर्ण होती.
२) असमतोल दृष्टिकोन : मीर्दाल यांनी १९३१ मध्ये लिहिलेल्या आपल्या मॉनेटरा इक्विलिब्रिअम या पुस्तकात आरंभी विकसेल यांच्या सर्वसाधारण व्याजदराची पुनर्मांडणी केली आहे; परंतु त्यांचे सर्वाधिक महत्त्वाचे योगदान म्हणजे पूर्वलक्षी (ex-ante) आणि पश्चातलक्षी (ex-post) गणती होय. पूर्वअंदाज महत्त्वाचे असले, तरी अंतिम परिणाम पुढील काळातील पूर्वअंदाजावर प्रभाव टाकत असल्याने महत्त्वाचे असतातच असे त्यांचे प्रतिपादन होते.
दोन भिन्न काळातील असमतोलाची जोडणी करण्याचा प्रयत्न करणारा स्टॉकहोम विचारधारेत हमरस्कोल्ड हे पहिले विचारवंत होते. त्यांच्यापूर्वी या संप्रदायातील कोणीही निश्चित योजना आणि कालावधी यांतील सहसंबंध स्पष्ट केला नव्हता; परंतु त्यांच्या स्पष्टीकरणामुळे बदलल्या न गेलेल्या योजनांच्या कालावधीमुळे एकूण कालावधी निश्चित होतो, हे मान्य केले गेले.
इतरांप्रमाणेच ओहलिन यांनाही किंमत पातळीतील बदलांचे स्पष्टीकरण करण्यात रुची होतीच; परंतु त्याहीपेक्षा किंमत बदलामागील कारणीभूत घटकांचे विश्लेषण करण्यात अधिक रस होता. ओहलिन यांचे योगदान म्हणजे जुन्या विकसेलप्रणीत विचारांची पुनर्मांडणी होय. शिवाय, उपभोगात स्वतंत्र रित्या होणाऱ्या बदलांचा अभ्यास हेही ओहलिन यांचे महत्त्वाचे योगदान आहे. उपभोगवस्तूंच्या बाजारपेठेतील असमतोल हा किंमत बदलाला प्रामुख्याने कारणीभूत ठरतो, हे त्यांनी स्पष्ट केले.
३) क्रममालिका विश्लेषण : लिंडाल यांच्या १९३४ मधील ‘नोट ऑन डायनामिक प्राइसिंग प्रॉब्लेम’ या चार पानांच्या खासगी पातळीवर वितरित केलेल्या लेखामुळे क्रममालिका विश्लेषणाचा पाया घातला गेला. नंतर १९३९ मध्ये ‘दी डायनामिक ॲप्रोच टू इकॉनॉमिक थिअरी’मध्ये हे विचार प्रसिद्ध झाले. कोणत्याही विशिष्ट काळात विशिष्ट परिस्थितीत निश्चित स्वरूपाच्या मानवी कृती घडतात, हे मान्य केल्यास निश्चित क्रममालिकांचा अर्थ उलगडता येतो; मात्र मानवी कृती किंवा त्यांचे परिणाम इतर भौतिक व्यवहारांप्रमाणे निश्चितपणे स्पष्ट करता येत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे. लिंडाल यांनी पुढील स्पष्टीकरण मांडले आहे : एका विशिष्ट काळात (t), उत्पादन व उपभोगाच्या योजना निश्चित असतात. विशिष्ट काळापयंत (t-t+१) जर किंमत पातळी माहित असली, तर त्या विशिष्ट काळासाठी व्यक्तींच्या कृती निश्चित करता येतात. t+१ काळातील कृतींवर t+२ काळातील परिस्थिती अवलंबून असते. याप्रमाणे ‘संपूर्ण गतिशील समस्या’ मांडता येते. याला एकेरी काळ विश्लेषण म्हणतात. विशिष्ट काळाच्या आरंभीच्या पूर्वलक्षी योजना त्या काळाच्या अखेरीस पश्चातलक्षी परिणामात रूपांतरित होतात हे दाखवता येते; मात्र यातून t काळात t+१ काळापुढील कालावधीतील गतिशील प्रक्रियेचे स्पष्टीकरण देता येत नाही. त्यामुळे सातत्यपूर्ण विश्लेषणाची गरज भासते. क्रममालिका विश्लेषणात या दोन्ही पद्धतींना महत्त्वपूर्ण स्थान आहे. म्हणजेच, t, t+१, t+२ या प्रत्येक काळातील समतोल एक प्रकारे गतिशील समतोल आहे. लुंडबर्ग यांनी स्थितिशील समतोलावर टीका करून असमतोल क्रममालिका विश्लेषण मांडले, तर लिंडाल यांचे विश्लेषण समतोलाबाबत आहे. असमतोल विश्लेषण हे एक प्रकारे समतोल प्रक्रिया विश्लेषणच आहे; मात्र विशिष्ट काळातील अपेक्षा पूर्ण होत नसल्याने तेथे असमतोल निर्माण होतो, हे लक्षात घेतले पाहिजे.
इसवी सन १९३० नंतर स्टॉकहोम संप्रदायातील गतिशील अभ्यासात काहीही लक्षणीय योगदान घडून आले नाही. या संप्रदायातील मूळच्या महत्त्वाच्या विचारवंतांनी शुद्ध अर्थशास्त्राचा अभ्यास सोडून व्यावहारिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली, हे त्यामागचे एक प्रमुख कारण होय. उदा., मीर्दाल यांनी १९४० च्या दशकाच्या आरंभी अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या प्रश्नांचा अभ्यास सुरू केला व नंतर ते शासनात मंत्रीही झाले. ओहलिन हेही लिबरल पक्षाचे नेते झाले. लुंडबर्ग हे व्यापारचक्र संशोधन संस्थेचे संचालक झाले. केवळ लिंडाल यांनीच शास्त्रशुद्ध अभ्यासशाखेची पाठराखण केली; परंतु अगोदरच मांडल्या गेलेल्या विचारांमध्ये त्यांनी फारशी भर घातली नाही.
संदर्भ :
- Eatwell, John; Milgate, Murra; Newman, Peter, The New Palgrave – A Dictionary of Economics. Ed. Vol 4, U. K.,1987.
- Hanson, B. A., The Stockholm School and the Development of Dynamic Method, London, 1982.
- Myrdal, G., ‘Monetary Equilibrium – A translation and extended version of German Edition of 1933 which is translation of Swedish Edition’ New York, 1965.
- Ohlin, B., ‘Some notes on the Stockholm Theory of Saving and Investment’, 1937.
समीक्षक : श्रीनिवास खांदेवाले