विद्युत् उत्पादक केंद्रापासून जनित्राने निर्माण केलेली विद्युत् शक्ती विद्युत् ग्रहण केंद्राकडे नेणाऱ्या विद्युत् दाबाच्या मार्गाला प्रेषणमार्ग म्हणतात. साधारणपणे ही त्रिकला मार्ग (3 phase) शक्ती असते. हे मार्ग जमिनीवरून मनोऱ्याच्या आधारावर स्थिरावलेल्या तारा असतात किंवा कदाचित जमिनीखालून विद्युत् निरोधकाने (Electric Insulator) अवगुंठित बंदिस्त केबल्स असू शकतात.

जमिनीवरून जाणाऱ्या या विद्युत् तारांना त्यांचा रोध (resistance), प्रवर्तनी अवरोध  (Inductive reactance) आणि धारक अवरोध (capacitive reactance) असतो. तारांच्या प्रत्येक मीटर लांबीत या प्रत्येकाची किंमत स्थिर असते. जेव्हा यांमधून विद्युत् प्रवाह वाहतो, तेव्हा या प्रत्येक घटकामुळे विद्युत् गळती होते. त्याचा परिणाम होऊन ग्रहण केंद्राचा दाब कमी होऊ शकतो.

ठराविक विद्युत् दाब मिळण्यासाठी ही गळती मोजणे आवश्यक ठरते. त्यासाठी आकडेमोड सुलभ व्हावी, म्हणून हे तीनही स्थिरांक एकाच जागी एकवटले आहेत, असे गृहीत धरले जाते. प्रेषण मार्गाची एकूण लांबी आणि त्यातील धारकता याप्रमाणे खालील प्रकार होतात.

(१) लहान लांबीचा प्रेषणमार्ग : नावाप्रमाणे या मार्गाची लांबी ही साधारणपणे ८० किमी. पर्यंत असते. कमी लांबीमुळे या मार्गातील धारक अवरोधाचा (capacitive reactance) प्रभावही शून्य धरला जातो. मार्गात फक्त रोध आणि प्रवर्तनी अवरोध  असतात. त्यामुळे उत्पादन केंद्राचा प्रवाह आणि ग्रहण केंद्राचा प्रवाह हा एकच असतो.

आ. १ लहान लांबीचा प्रेषणमार्ग

 

(२) मध्यम लांबीचा प्रेषणमार्ग : साधारणपणे ८० ते १६० किमी. या मार्गांची लांबी असते. यामध्ये रोध आणि प्रवर्तनी अवरोध  असतोच शिवाय धारक अवरोधसुद्धा  (capacitive reactance) असतो. तो एक किंवा दोन ठिकाणी एकवटलेला गृहीत धरला जातो. त्याप्रमाणे खालील उपप्रकार होतात.

(अ) ‘T’ प्रकार : यामध्ये धारक अवरोध एकाच जागी परंतु मार्गाच्या मध्यभागी गृहीत धरला जातो. त्यामुळे  रोध आणि प्रवर्तनी अवरोध यांचे दोन भाग होतात. काही वेळेला हे दोन्‍ही भाग समान असतात, तर काही वेळेला असमान असतात.

आ. २ (अ) समान ‘T’ मंडल
आ. २ (ब)  असमान ‘T’ मंडल

 

 

 

 

(ब) Π प्रकार : या प्रकारात धारक अवरोध दोन भागात विभागला जातो. एक भाग उत्पादन केंद्राजवळ तर दुसरा ग्रहण केंद्राजवळ एकवटलेला गृहीत धरला जातो. समान Π मंडलात हे दोन ही भाग समान असतात. तर असमान Π मंडलात हे दोन्ही भाग असमान असतात. वरील  ‘T’ व ‘Π’ प्रकारांमध्ये ग्रहणकेंद्राचा प्रवाह हा उत्पादन केंद्राच्या प्रवाहापेक्षा भिन्न असतो.

आ. ३ (अ)  समान ‘π ‘ मंडल
आ. ३ (ब) असमान ‘π’ मंडल

 

 

       

 

 

 

समान ‘T’ आणि समान ‘Π’ प्रकार  मध्यम लांबीचा प्रेषणमार्ग दर्शवण्यासाठी बहुतेक वेळा वापरले जातात.

(३) जास्त लांबीचा प्रेषणमार्ग : हा मार्ग खूपच लांब १६० किमी.पेक्षा मोठा असतो. या मार्गामध्ये धारक अवरोध भरपूर असतो. त्यामुळे तो प्रत्येक मीटरसाठी दाखवावा लागतो. तसेच यांचा रोध आणि प्रवर्तनी अवरोधही  प्रत्येक मीटरसाठी विचारात घ्यावा  लागतो. विद्युत् प्रवाहसुद्धा प्रत्येक मीटरसाठी बदलत असतो.

आ. ४ जास्त लांबीचा प्रेषणमार्ग

 

वरील सर्व प्रकारात ग्रहणकेंद्राचा विद्युत् दाब आणि प्रवाह माहित असून गळती शोधणे हा उद्देश आहे. त्या गळतीच्या आधारे उत्पादन केंद्रामधील दाब किती ठेवायचा तो निश्चित करता येतो.

संदर्भ :

  • Kothari, D.P.; Nagrath, I.J. Modern Power System Analysis, Published by Tata McGraw-Hill Publishing Company Limited.
  • Stevenson (J.); Elements of Power Systems Analysis, 1982, Published by Tata McGraw-Hill International Editions.

 समीक्षक – एस. डी. गोखले

प्रतिक्रिया व्यक्त करा