आधाराच्या मदतीने वाढणाऱ्या नाजूक वा कठीण खोड असलेल्या वनस्पतींना अनुक्रमे वेली आणि काष्ठवेली म्हणतात. सरळ खांबासारखा बुंधा असलेल्या वृक्षांच्या मदतीने उंचावर पोहोचणाऱ्या काष्ठवेली त्याच्या दोरखंडासारख्या खोडाच्या वाढीसाठी कमी ऊर्जा खर्च करतात आणि प्रकाश मिळविण्यासाठी पाने उंचावर पसरू शकतात. अशा काष्ठवेलींच्या जाती उष्ण कटिबंधांतील वनांमध्ये मोठ्या प्रमाणावर (१९-३०%) दिसतात. उबदार प्रदेशात काहीशा कमी प्रमाणात (९.६–१९%), तर समशीतोष्ण कटिबंधातील वनांत केवळ ५–६% आढळतात. विशेष म्हणजे वादळ-वाऱ्यामुळे अथवा वृक्षतोड होत असल्यामुळे या वेलींची संख्या आणि जैविक वस्तुमान (Biomass) यांत वाढ झालेली आढळून येते.
अनेक जातींच्या, निरनिराळ्या कुलांतील वेलींच्या आकाराप्रमाणे आणि आधारावर चढण्याच्या पद्धतीनुसार वेली-काष्ठवेलींचे सहा प्रकार आहेत. ते खालीलप्रमाणे :
(१) वेलीचे खोड आधाराभोवती गुंडाळले जाणारे (twiners) : (अ) घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने – डायोस्कोरिया; (आ) घड्याळाच्या काट्यांच्या उलट दिशेने –जाई, जुई, चमेली इ.
(२) जमिनीवर किंवा आधारावर पसरत वाढणारे (stragglers) : (अ) काटेरी – तोरण; (आ) काटेविरहित – उक्षी, ग्रेविया.
(३) लता-तंतूच्या मदतीने आधारावर चढणारे (tendril climbers) : भोपळा, तोंडली, द्राक्षे यांचे वेल.
(४) हुक किंवा आकड्याच्या मदतीने आधारावर चढणारे : हिरवा चाफा.
(५) खोडावर वाढणाऱ्या मुळाच्या मदतीने आधारावर चढणारे : पोथॉस, मोन्सटेरा.
(६) गळ किंवा आकड्याच्या मदतीने आधारावर चढणारे (grapnel) : वेत (cane).
आधारावर चढण्याच्या क्रियेत वेलींचे खोड अनेक वेळा पिळले जाते. काही काष्ठ-वेलींचे खोड १८०० डीग्रीतही पिळले जाते, तरीही वेलीवर त्याचा दुष्परिणाम होत नाही. काष्ठवेलींच्या खोडातील जलवाहिन्या (झायलेम) सरळ वाढणाऱ्या वृक्षामधील जलवाहिन्यांपेक्षा जास्त मोठ्या व्यासाच्या असतात.
पूर्व व पश्चिम घाट, तसेच कोरोमंडेल किनारी प्रदेशात ४७ कुलांतील १०१ प्रजातीच्या १४८ जाती नोंदल्या गेल्या आहेत. त्यांची संख्या टेकड्या-पर्वतांच्या वाढत्या उंचीबरोबर कमी होत गेल्याचे आढळते. वनसंहार, वृक्षतोड यांमुळे वेलींच्या वैविध्यावर परिणाम होतो. कोरड्या हरित वनांतील आणि अर्ध-हरित वनातील वेलींचा प्रसार वाऱ्याच्या मदतीने, तर सदाहरित वनातील वेलींचा प्रसार वन्यप्राण्यांच्या मदतीने होतो. काष्ठवेलींची पाने खाऊन कीटक, अळ्या आणि काही प्रकारचे भुंगेरे जगतात, फुलांवर माश्या आणि फुलपाखरे चरतात, तर पक्षी फळे पसंत करतात. दाट वनातील काष्ठवेलींवर माकडासारखे प्राणी गुजराण करतात. गुरांना चारा म्हणून पाने दिली जातात. काष्ठवेलींच्या ४९ जाती औषधात वापरल्या जातात.
लोखंडी, शिरीष, खिरणी इ. वृक्षांवर काष्ठवेली वाढताना दिसतात, कधीकधी खूप वाढ झालेल्या काष्ठवेलींच्या वजनामुळे आधारवृक्ष खुरटतात व मरतातही.
संदर्भ :
- M. Anbarashan and N.Parthasarathy , Diversity and Ecolofy of Lianas in tropical dry evergreen forests on the Coromandel coast of India under various disturbance regimes.Flora208(2013,22-32.
- N. Parthasarathy; S. Muthuramkumar and M. Sridhar Reddy. Patterns of liana diversity in tropical evergreen forests of peninsular India. Forest Ecology and Management 190 (2004),15-31.
समीक्षक – बाळ फोंडके