शहरी वातावरणात अमोनिया (दशकोटी भागात २० भाग) असणे स्वाभाविक आहे. या वायूची हवेतील तीव्रता वाढल्यास त्याचा तिखट वास लगेच जाणवतो. सहसा औद्योगिक अपघातात गळतीमुळे हवेत बाहेर पडणारा अमोनिया वनस्पतींना घातक ठरतो. पानांवर काळे डाग पडणे, किंवा पाने काळी पडणे, पानांवर तांबडसर  चट्टे पडणे, शिरांच्या दरम्यानचा भाग भुरा होणे, पानांच्या कडा व टोके काळी पडणे किंवा पाने पांढरी पडणे अशा वेगवेगळ्या जखमांच्या खुणा निरनिराळ्या वनस्पतींवर नोंदण्यात आल्या आहेत. फळांच्या सालीवरही भुरे ठिपके, चट्टे व काळे डाग दिसून येतात.अमोनिया पानांच्या रंध्रांतून झपाट्याने आत शिरतो, हरितद्रव्याचा व इतर रंगकणांचा नाश करतो आणि पाने रंगहीन होतात, पेशींचा नाश होऊन पानाला भोकेही पडतात. दशलक्ष भागात ४० भाग अमोनिया एका तासात टोमॅटो, सूर्यफूल व कोलीयस इत्यादींवर परिणाम करतो. दशलक्ष भागात ८ भाग अमोनियामुळे पानांच्या कडांवर ५ तासात दुष्परिणाम दिसू लागतात.

संदर्भ :

  • Brennan, E., Leone, I.; Daines, R.H. Ammonia  injury to apples and peaches in storage, Plant Dis. Rep. 46: 792 – 795, 1962.
  • Ramsey, G.B. Mechanical and chemical injuries, In: Plant Diseases, USDA Yearbook, Pp.835 – 837, 1953.

समीक्षक – बाळ फोंडके

प्रतिक्रिया व्यक्त करा