महाराष्ट्रातील पावरा आदिवासी जमातीतील प्रसिद्ध उत्सव. सातपुडा परिसरात भिल्ल व पावरा या दोन्ही समाजात प्रामुख्याने हा उत्सव साजरा करतात. ‘इंदल’ म्हणजे इंदीराजा; एक लोकदेवता. पुत्रप्राप्तीसाठी, घरातील बरकतीसाठी, सुखशांतीसाठी ,वैयक्तिक स्वरूपात तर गावावरील अरिष्ट निवारणासाठी या देवतेस नवस बोलून साकडे घातले जाते. नवस फेडण्याचा कार्यक्रम या उत्सवातून साजरा केला जातो. इंदल दोन प्रकारे साजरा करतात. एक म्हणजे सामुदायिक रित्या गावकरी मिळून साजरा करतात तो ‘गाव गोंदऱ्या इंदल’ आणि दुसरा वैयक्तिक घरगुती स्वरूपात साजरा करतात तो ‘चुऱ्यो इंदल’. गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश व राजस्थान या राज्यांच्या सीमावर्ती प्रदेशातील आदिवासी परिसरात हा उत्सव साजरा केला जातो .

‘गाव गोंदऱ्या इंदल’ हा उत्सव संपूर्ण गाव मिळून साजरा करते. सामुहिक निर्णय घेवून उत्सवाचे नियोजन केले जाते .बादीस (भगरीसारखे धान्य) हळद लावून जितक्या गावांना आमंत्रण पाठवायचे असते, तितक्या बादीसच्या पुरचुंडी तयार करून इतर गावांना निमंत्रण पाठविले जाते.‘इंदल’च्या एक दिवस आधी सायंकाळी गावातील व परगावातील लोक एकत्र जमतात.जमलेल्या मंडळींबरोबर १०-१२ वर्षांची तीन कुंवार (कुमार) मुले गावाबाहेरील पूर्वेस किंवा उत्तरेस कळम (कदंब) झाडाच्या फांद्या आणण्यासाठी जातात. रस्त्याने जाताना सगळ्यात पुढे पुजारा असतो. त्याच्या हातात आरती व पूजेच्या साहित्याचे तबक असते. त्याच्या मागे तीन कुंवार मुले असतात.नंतर पुरूष मंडळी आणि गावातील मुली तसेच स्त्रिया या क्रमाने मिरवणूक निघते. यावेळी स्त्रिया इंदिराजाचे स्तुतीपर गाणे गातात. कदंबाच्या झाडाजवळ आल्यावर झाडाच्या बुंध्याजवळ पुजारा पुजेचे साहित्य मांडतो. पुजारा झाडाची पूजा करतो. पूजाविधी आटोपल्यानंतर कदंबाच्या झाडाच्या तीन फांद्या तोडतात. झाडाखालील लोक ते वरच्यावर झेलतात. या तीन फांद्या सोबतच्या तीन कुंवार मुलांच्या हातात देतात.‘इंदल’ प्रसंगी फांद्या घेण्यास ‘इंदल’ पूजेच्या ठिकाणी कुंवारी मुलेच लागतात. त्याचे एक कारण असे सांगितले जाते की,इंदीराजा हा कुंवारा होता.कदंब वृक्षाच्या तोडलेल्या तीन फांद्यात पहिली फांदी इंदिराजाच्या,दुसरी कणहर मातेच्या आणि तिसरी हुडोवदेवाच्या नावाची असते. ह्या तीन फांद्या घेऊन जाताना मागे वळून पाहात नाहीत.

ही मिरवणूक पाटलाच्या अंगणात येते.तेथे दोन-अडीच फुटाचे तीन अड्डे ओळीने खणलेले असतात. त्यात फांद्या रोवून, ज्वारी टाकून खड्डे भरतात.खड्ड्यांमध्ये दाणे टाकण्याच्या आधी ते मोजतात.त्या खड्ड्यांजवळ फांद्या आणणाऱ्या कुंवाऱ्या मुलांना बसवतात.कदंबाच्या फांद्यांना लिंबू मंतरून बांधलेले असते. पूर्वेस तोंड करून या तीन फांद्यांसमोर पुजारा पुजेचे साहित्य मांडून पूजाविधीस सुरुवात करतो. पुजाऱ्याचा पूजाविधी होत असताना त्याचवेळी मोठे रिंगण करून या तीन मुलांच्या भोवती ढोलाच्या तालावर लोक फेर धरून नाचतात.गावातील प्रत्येक घरातून टोपली भरून भाकरी जमा केल्या जातात.दुपारी जेवणाची पंगत बसते.बाहेर गावच्या मंडळींना प्रथम मान देवून पंगतीस बसवितात.मग गावपंगत बसते.दुसऱ्या दिवशी सर्वांचे जेवण झाल्यावर संध्याकाळी खड्ड्यातील कदंबाच्या रोवलेल्या तीन फांद्या काढून मिरवणूकीने गावाबाहेरील नदीकाठावर जातात.तेथे पुजारा फांद्यांची यथासांग पूजा करून त्या फांद्या नदीच्या प्रवाहात सोडतो आणि ‘गावगोंदऱ्या इंदल’ची सांगता होते.फांद्या काढण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी ज्वारी काढून ती पूर्वीच्या मापनापेक्षा अधिक भरल्यास इंदिराजा प्रसन्न झाला असे मानतात.असे धान्य बरकतीसाठी घरातील धान्याच्या कणगीत टाकतात.

‘चुऱ्यो इंदल’ हा वैयक्तिक, घरगुती स्वरूपात साजरा करतात. ज्या व्यक्तीने इंदलचा नवस केलेला असतो, ती व्यक्ती आपल्या घरी इंदल बसविते.गावकऱ्यांना किंवा परगावच्या लोकांना निमंत्रण देऊन खाऊ घालण्याची आर्थिक ऐपत ज्या व्यक्तीची नसेल, परंतु त्याच्या घराण्यात वंशपरंपरागत ‘इंदल’ साजरा करण्याची प्रथा असेल, अशा व्यक्तीस ‘इंदल’ बसवावाच लागतो. सकाळी चार वाजता गावच्या वर्गणीतून विकत घेतलेले बोकड आणि परगावच्या लोकांनी आणलेले बोकड यांची फांद्यांसमोर पूजा करतात.प्रथम गावच्या बोकडाची पूजा करतात. त्याच्यावर पुजारा मंत्र म्हणत पाणी शिंपडतो. बोकडाने शहारून अंग झटकले तर बोकडावर इंदिराजा प्रसन्न झालेला आहे असे समजून त्याचा बळी देतात.बोकड शहारले नाही तर तो बोकड इंदिराजास मान्य नाही असे समजतात, त्या बोकडाचा बळी देत नाहीत. इंदिराजास मान्य असलेल्या बोकडाच्या मानेवर पाव्यू (लांब दांड्याचा विळा) किंवा तलवारीचा घाव घालून एका झटक्यात बोकडाचे डोके धडापासून वेगळे करतात.या कृतीस झाटकन म्हणतात. त्यानंतर क्रमाक्रमाने गावातील तसेच पाहुण्यांनी आणलेल्या बोकडांचा बऴी देतात.पैपाहुण्यांनी आणलेल्या बोकडांचे निम्मे मटण गावासाठी काढून घेतात आणि राहिलेले निम्मे मटण भेट म्हणून त्यांना परत देतात. बोकडांचे बळी दिल्यानंतर त्यांची कातडी सोलून काढली जात नाही, तर प्रज्ज्वलित अग्नीच्या निखाऱ्यावर भाजून बोकडाच्या कातडीचे केस पूर्णपणे जाळतात. नंतर कातडी घासून-घासून साफ करून मग मटण तयार करतात. त्यानंतर मटण शिजविण्यास दिवस उजाडण्यापूर्वीच रात्रीच इंदलचा पूजाविधी संपवून टाकतात. सकाळी त्या घरी ‘इंदल’ बसविण्याच्या खाणाखुणा दिसत नाहीत, तसेच त्या घरातील व्यक्ती आपल्या घरी ‘इंदल’ बसवलाच नाही असे लोकांना भासवते, म्हणून त्यास ‘चुऱ्यो इंदल’ (चोरून बसविलेला इंदल) असे म्हणतात. ज्या व्यक्तीची घरची आर्थिक परिस्थिती चांगली असेल आणि वंशपंरपरागत ‘इंदल’ साजरा करणे भाग असेल, अशा व्यक्ती परगावच्या लोकांना तसेच गावातील लोकांना आमंत्रित करून ‘इंदल’ बसविते. असा कौटुंबिक इंदल ‘गावगोंदऱ्या इंदल’ सारखाच साजरा केला जातो. ‘चुऱ्यो इंदल’ मधील व ‘गावगोंदऱ्या इंदल’ मधील पूजाविधी सारखाच असतो.

संदर्भ :

  • इंगळे, दिलीप, सातपुड्याच्या सहवासात, प्रस्ताव प्रकाशन, नाशिक, १९९४.
  • पाटील, डी. जी.,पावरा समाज व संस्कृती, भाषा संशोधन-प्रकाशन केंद्र, बडोदे, १९९८.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा