झेर्निके, फ्रिट्स   (१६ जुलै १८८८ १० मार्च १९६६).

डच भौतिकीविज्ञ. सजीव पेशीच्या आंतर्रचना पाहता येतील अशा सूक्ष्मदर्शकाचा शोध लावल्याबद्दल १९५३ सालचे नोबेल पारितोषिक त्यांना देण्यात आले.

झेर्निके यांचा जन्म नेदरलॅंड्समधील अॅम्स्टरडॅम येथे झाला. त्यांचे वडील कार्ल फ्रेडरिक ऑगस्ट झेर्निके प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते. ते गणित हा विषय शिकवीत असत. विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये त्यांना विलक्षण रस होता. विविध वैज्ञानिक विषयांवरची प्राथमिक माहिती देणारी अनेक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यांची आई अॅण्टजे डिएपेरिंक शाळेत गणित शिकवीत असत.

झेर्निके यांना वडिलांप्रमाणे मनापासून भौतिकशास्त्र आवडत असे. अगदी प्राथमिक शाळेत असल्यापासून त्यांनी प्रयोगासाठी लागणाऱ्या नळ्या व काचेची भांडी त्यांनी स्वत:च्या पैशातून जमविली होती. माध्यमिक शाळेत त्यांना विज्ञान विषयात भरपूर गुण मिळाले होते. परंतु इतिहास व भाषा या विषयांकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले. पुढे विद्यापीठात प्रवेश मिळविण्यासाठी त्यांना ग्रीक व लॅटिन या भाषांचा अभ्यास करावा लागला. शाळेत असताना झेर्निके यांचा संपूर्ण वेळ प्रयोग करण्यात जात असे. याच काळात त्यांना रंगीत छायाचित्रणाची गोडी लागली. त्यासाठी लागणारी साधनसामुग्री विकत घेणे शक्य नव्हते. त्यामुळेच प्रयोगासाठी लागणारी साधने त्यांनी स्वत:च तयार केली. कॅमेरा तयार करण्याचे तंत्र समजून घेऊन त्यांनी प्रयोगासाठी योग्य असा कॅमेरा आणि अंतराळाचा वेध घेण्यासाठी प्रयोगशाळा तयार केली. यामुळेच ते धूमकेतूचेही छायाचित्रण करू शकले.

इ.स. १९०५ मध्ये झेर्निके यांनी अॅम्स्टरडॅम विद्यापीठात प्रवेश घेतला. त्यांचा प्रमुख विषय रसायनशास्त्र तर भौतिकशास्त्र व गणित हे दुय्यम विषय होते. १९१३ मध्ये त्यांनी या विद्यापीठाची बी. एस्. पदवी संपादन केली. लहानपणापासूनच गणित या विषयात प्रावीण्य असल्यामुळे १९०८ मध्ये ग्रोनिंगेन विद्यापिठात असतांना त्यांना गणित विषयाचे सुवर्ण पदक मिळाले; तर पदार्थाच्या वैशिष्ट्यपूर्ण पारदर्शकतेवर (Critical Opalescence) केलेल्या सखोल अभ्यासाबद्दल १९१२ मध्ये त्यांना दुसरे सुवर्ण पदक मिळाले. परीक्षक मंडळावर त्या काळातील शास्त्रज्ञ हेंड्रिक आंटोन लोरेन्ट्स, व्हॅन डर व्हाल्स व हर्म्यान्स हागा हे होते. या बक्षिसपात्र निबंधाचा पाया धरून झेर्निके यांनी. प्रबंध लिहून, १९१५ मध्ये ग्रोनिंगेन विद्यापीठाची पीएच्.डी पदवी मिळविली.

इ.स. १९१३ मध्ये ग्रोनिंगेन विद्यापीठातील प्रख्यात प्राध्यापक केप्टेन (Prof. Kepteyn) यांनी झेर्निके यांना सहाय्यक म्हणून बोलावून घेतले. १९१५ मध्ये त्यांना प्रथमच अध्यापक म्हणून नोकरी मिळाली. ही नोकरी त्यांना रसायनशास्त्र किंवा खगोलशास्त्र शिकविण्यासाठी नव्हे, तर गणितीय भौतिकशास्त्र (Mathematical Physics) शिकविण्यासाठी मिळाली. १९२० मध्ये ते पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून काम पाहू लागले. १९५८ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. १९४८ मध्ये त्यांनी बॉल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केले.

संवेदनाशील गॅल्व्हानोमीटर बनविण्यासाठी झेर्निके यांनी केलेले प्रयोग १९२३ पासून सर्वश्रत होते. १९३० पासून त्यांनी प्रकाशलहरींवर आपले लक्ष केंद्रित केले. पारदर्शक पदार्थामधून प्रकाशकिरण गेल्यावर वक्रीभवनामुळे तयार होणाऱ्या सदोष प्रतिमेवर अभ्यास करून निर्दोष प्रतिमा मिळवून देणारे सूक्ष्मदर्शक यंत्र त्यांनी तयार केले. परंतु त्याचे महत्त्व त्यावेळी लक्षात आले नाही. त्यामुळे ते दुर्लक्षितच राहिले. जर्मनीच्या व्हरमॅट(Wehrmacht) यांना हे संशोधन दुसऱ्या महायुध्दात उपयोगी पडू शकते हे जाणवले आणि त्याचे महत्त्व एकदम वाढले. दुसरे महायुध्द संपल्यावर जर्मन कंपनीने हजारो सूक्ष्मदर्शक यंत्रे तयार केली. सजीव पेशींचा अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा जास्त उपयोग झाला. याच संशोधनाबद्दल १९५३ मध्ये झेर्निके यांना नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

झेर्निके यांच्या संशोधनाची पावती रॉयल मॅक्रोस्कोपिक सोसायटीने रम्फर्ड पदक बहाल करून दिली (१९५२). त्याचप्रमाणे त्यांना अॅम्स्टरडॅम विद्यापिठातर्फे पीएच्.डी. पदवी सन्मानपूर्वक देण्यात आली.

झेर्निके यांचा मृत्यू ग्रोनिंगेन येथे झाला.

 

संदर्भ :

समीक्षक – हेमंत लागवणकर

प्रतिक्रिया व्यक्त करा