स्टेहेलीन, डॉमिनीक (४ सप्टेंबर १९४३).

फ्रेंच जीवरसायनशास्त्रज्ञ. स्टेहेलीन, मायकेल बिशप, आणि हॅरल्ड एलियट व्हार्मस या कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सॅन फ्रॅ‍न्सिस्को येथील  शास्त्रज्ञांनी असे दाखवून दिले की, कर्कार्बुद (ऑन्कोजीन्स) हे सक्रिय झालेले प्रोटो-कर्कार्बुद असतात (१९७६). असे प्रोटो-कर्कार्बुद माणूस व इतर प्राण्यांमध्ये असतात. प्रोटो-कर्कार्बुद ही सामान्य जनुके असतात. ती उत्परिवर्तन (म्युटेशन्स) झाल्यामुळे किंवा अधिक तयार झाल्याने कर्कार्बुद होऊ शकतात. ह्या  सिद्धांतासाठी १९८९ सालातील वैद्यक ‍किंवा शरीरक्रियाविज्ञान या विषयातील नोबेल पारितोषिक जॉन मायकेल बिशप, हॅरल्ड एलियट व्हार्मस यांना जाहीर झाला.

डॉमीनिक स्टेहेलीन यांनी पदवीचे शिक्षण स्ट्रॅस्बर्ग (Strasbourg) विद्यापीठात घेतले आणि डॉक्टरेटची पदवी पाश्चर विद्यापीठातून मिळवली. त्यांनी व त्यांच्या सहका-यांनी असे दाखवून दिले की विषाणूंची (Rous Sarcoma Virus) जनुके सामान्य पेशींमध्ये बदल करून कर्करोगाचे कारण ठरू शकतात. त्यांचा  शोधनिबंध नेचर  मासिकात प्रसिद्ध  झाला. अशा रीतीने प्रत्येक सामान्य पेशीतील जनुकांमुळे त्यात व्यत्यय आला तर कर्करोग होऊ शकतो असे सिद्ध होऊ शकले. आपली कल्पना तपासण्याकरिता स्टेहेलीन यांनी एस.आर सी जनुकांप्रती शोधणी (प्रोब) तयार केली. ती  विविध पक्ष्यांच्या सामान्य डीएनएशी जोडली जाऊ शकली.

स्टेहेलीन यांचे नाव नोबेल पारितोषिकासाठी न आल्याने त्यांनी नाराजी जाहीर केली कारण संबधीत शोधनिबंधावर पहिला लेखक म्हणून त्यांचे नाव होते. स्टेहेलीन पोस्टडॉक्टरल अधिछात्र (फेलो) म्हणून त्या प्रयोगशाळेत काम करत होते आणि त्यांच्या मते पारितोषिक विजेत्या शोधाची कल्पना त्यांची होती व प्रयोगही त्यांनीच केलेले  होते. ते आपल्या प्रयोगशाळेतील नोंदी दाखवायला तयार असल्याचे दूरदर्शनवर म्हणाले.

स्टेहेलीन यांच्या उलट साक्ष देणारे शास्त्रज्ञपण त्यांच्या प्रयोगशाळेत होते. तरीही  स्टेहेलीन यांनी नोबेल समितीकडे तक्रार केली. अखेर त्यांचे नाव नोबेल पारितोषिकासाठी उशिरा जाहीर झाले.

जीन समाईल (Jean Samille) यांनी स्टेहेलीन यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला व तक्रार योग्य आहे असे म्हटले. स्टेहेलीन, लील येथील पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये (Development and Cancer Mechanisms of the CNRS unit at the Pasteur Institute) संशोधन संचालक आहेत तर जीन समाईल हे तिथे संचालक आहेत.

स्टेहेलीन यांनी आंतरराष्ट्रीय विज्ञान मासिकात २२० शोधनिबंध लिहिले. स्टेहेलीन एक्झोन्हिट थिंअरॉपिटीक्स एस.ए.(Exonhit Therapeutics SA) चे वैज्ञानिक सल्लागार आहेत. स्टेहेलीन त्यांच्या कर्करोगाच्या संशोधनाबद्दल प्रसिद्ध आहेत. ते फ्रान्सच्या वैज्ञानिक अकादमीचे मानद सभासद आहेत.

संदर्भ: 

समीक्षक – रंजन गर्गे

प्रतिक्रिया व्यक्त करा