डीझेल, रूडाेल्फ (१८ मार्च १८५८ – २९ सप्टेंबर १९१३).

जर्मन तंत्रज्ञ. डीझेल इंजिनाचे जनक. व्यवसायाने यांत्रिक अभियंते. डीझेल या खनिज तेल इंधनावर धावणाऱ्या इंजिनचे ते जनक होत. १८९२ मध्ये, त्यांनी डीझेल इंजिनाचे एकस्व (पेटंट) मिळविले. १९७८ मध्ये, ऑटोमोटिव्ह हॉल ऑफ फेमचे ते मरणोत्तर मानकरी ठरले.

त्यांचे संपूर्ण नाव रूडोल्फ ख्रिश्चन कार्ल डीझेल. त्यांचा जन्म फ्रान्समधील पॅरिस येथे झाला. त्यांचे वडील बावरियामधून स्थलांतर करून फ्रान्समध्ये स्थायिक झाले होते. बावरियातील आऊग्जबुर्ग येथे त्यांचा पुस्तक-बांधणीचा व्यवसाय होता. पॅरिस येथे आल्यानंतर त्यांनी चामड्याच्या निर्मितीचा  धंदा  सुरू केला. परंतु १८७० मध्ये तोंड फुटलेल्या फ्रँको-प्रशियन युध्दामुळे त्यांना फ्रान्स सोडून लंडनला प्रयाण करावे लागले. रूडोल्फचे शिक्षण आऊग्जबर्ग येथील रॉयल कंट्री ट्रेड स्कूलमध्ये झाले. दोन वर्षांत शाळेमध्ये हुशार विद्यार्थी म्हणून गणल्या गेलेल्या रूडोल्फ याने म्यूनिक येथील रॉयल बावरियन पॉलिटेक्निक संस्थेची शिष्यवृत्ती पटकावली, परंतु पदवीच्या वर्षी आंत्रज्वर या तापाने ते आजारी पडले व त्यामुळे वर्ष वाया गेले. तरुण व जिद्दी रूडोल्फने त्यावेळी स्वित्झर्लंडमधील एका कारखान्यात उमेदवारी करून अभियांत्रिकीतील व्यावहारिक ज्ञान मिळविले. १८८० मध्ये उच्चतम श्रेणीत पदवी प्राप्त करून डीझेल पॅरिसला परत गेले. त्यांनी म्यूनिक येथील एका प्राध्यापकासोबत काम करून वातानुकूलित यंत्रणा व बर्फाच्या कारखान्याची रचना करण्याचे काम हाती घेतले. पुढे एका वर्षानंतर ते त्या शीतक कारखान्याचे संचालक देखील झाले. तेथे कार्यरत असताना त्यांनी अनेक साधन-सामग्रींची एकस्वे मिळविली.

इ.स. १८९० मध्ये डीझेल कुटुंबासह बर्लिनला आले. वाफेच्या इंजिनाची उभारणी करीत असताना, एकदा अमोनिया वायू वापरून इंजिनाच्या इंधन-क्षमतेची चाचणी घेत असताना झालेल्या स्फोटात ते जबर जखमी झाले व कित्येक महिने अंथरुणाला खिळून होते. नंतर बर्लिन येथे नोकरी करीत असताना एका नव्या पध्दतीच्या अंतर्ज्वलन इंजिनाच्या कार्य पध्दतीबाबत त्यांनी एकस्व मिळविले.

इ.स. १८९३ मध्ये डीझेल यांनी कार्नोट चक्रावर आधारित इंजिन तयार करायला घेतले. ऊष्मागतिकीचा सखोल अभ्यास केल्यामुळे, इंजिनाची आखणी व रचना तयार करणे त्यांच्या आवाक्यात आले. त्या सुधारित इंजिनाचे देखील त्यांनी एकस्व घेतले. त्याच वर्षी, त्यांनी एका नव्या तर्कशुध्द इंजिनासंबंधीचे सिध्दांत व रचना हा शोधनिबंध लिहिला. त्यातील कल्पनेनुसार, प्रथम त्या काळातील स्वस्त इंधन म्हणून वापरली जाणारी कोळशाची भुकटी व नंतर खनिज तेल वापरून इंजिन चालविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अखेर, पाच वर्षांच्या सततच्या प्रयत्नानंतर १८९७ मध्ये संपीडित (कॉम्प्रेस्ड) हवेच्या तापमानाने इंधनाचे प्रज्वलन होत असलेले व पुढे दाब कायम राहून त्याचे ज्वलन होत असलेले इंजिन यशस्वी रीत्या तयार केले. हे इंजिन २५ अश्वशक्तीचे, उभ्या सिलिंडरचे, हवेच्या दाबाने इंधन तेलाचे अंत:क्षेपण होणारे, चार धावांचे, जड, दणकट, मंद गतीचे परंतु उच्च औष्णिक कार्य क्षमतेचे होते.

तीस वर्षाच्या अखंड परिश्रमानंतर, त्यांनी बर्लिन येथील जर्मन रेश कार्यालयातून ऑगस्ट १८९२ मध्ये डीझेल इंजिनचे एकस्व मिळविले होते. त्यानंतरचा दोन वर्षाचा काळ प्रायोगिक चाचण्यात गेला. त्यावेळी इंजिनाच्या रचनेत विविध प्रकारचे बदल घडवून आणण्यात आले. तसेच त्या इंजिनात वापरल्या जाणाऱ्या इंधंनामुळे जास्तीत जास्त गतिक्षमता असणारे इंजिन तयार व्हावे म्हणून डीझेल सतत प्रयत्नशील राहिले. त्यांनी या इंजिनात पेट्रोल, केरोसीन, वनस्पतिज तेले इ. इंधनांचा प्रयोगदेखील करून पाहिले आणि त्या विविध प्रयोगांत निरनिराळ्या कार्यक्षमतेच्या इंजिनाची निर्मिती होत गेली. त्यांचे कार्य त्यांनी थिअरी अँड कन्स्ट्रक्शन ऑफ अ रॅशनल हिट मोटार (Theorie und Konstruktion eines rationellen Wäremotors (Theory and Construction of a Rational Heat Motor) या नावाने प्रकाशित केले.

ऑक्टोबर १८९८ मध्ये डीझेल आणि मशीन फॅब्रिक या कंपनीने २२ परवाने मुक्त करून हे इंजिन बाजारात विक्रीस आणले. त्याच वेळी म्यूनिकमध्ये भरलेल्या तंत्रज्ञान प्रदर्शनात ह्या इंजिनाने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. याच प्रदर्शनात डीझेलवर चालणाऱ्या इंजिनाद्वारे संपीडक (कॉम्प्रेसर) आणि जनित्र (जनरेटर) चालवून दाखविण्यात आले. त्यानंतर उत्तर अमेरिका, स्वित्झर्लंड, डेन्मार्क व रशिया या देशांतील विविध कंपन्यांनी डीझेल यांच्याशी करार केले. १९०४ आणि १९१२ मध्ये डीझेल यांनी  अमेरिका वाऱ्या केल्या व तेथे त्यांनी व्याख्याने दिली. १९१३ मध्ये त्यांनी  डीझेल इंजिनाची उत्पत्ती या विषयावर दुसरा शोधनिबंध प्रसिध्द केला.

हळूहळू जगातील सर्व औद्योगिक क्षेत्रांतील कंपन्यांनी डीझेल इंजिनात रस घेऊन आपआपल्या देशासाठी परवाने मिळविले व त्या इंजिनात छोटे-मोठे बदल करीत विविध नामाभिधाने असलेली इंजिने तयार केली. १९०४ च्या दरम्यान डीझेल इंजिन वाहतुकीसाठी कल्पना प्रबळ झाली. १९०८ मध्ये या इंजिनाचे जर्मनीतून रशियात आगमन झाले. त्यानंतर अमेरिकेतील बर्मीस्टर ह्या कंपनीने १९१२ मध्ये एक इतिहास घडविला. सेलांडिया नावाची ७००० टनाची बोट त्यांनी डीझेल इंजिनवर चालवून दाखविली. कोपेनहेगन, लंडन, अॅन्टवर्प, जिनीव्हा व सिंगापूर असा यशस्वी प्रवास त्या बोटीने केला. तेव्हा साऱ्या जगाने आश्चर्य व्यक्त केले.

बेंझ कंपनीने १९२३ मध्ये तयार केलेला ५ टनाचा ट्रक अॅम्स्टरडॅम येथे १९२४ सालातील प्रदर्शनात ठेवण्यात आला होता. पुढे झपाट्याने प्रगती होत गेली. इंधनाचे पुरेपूर ज्वलन होऊन जास्तीत जास्त कार्यक्षमता असलेले इंजिन तयार करण्याचे प्रयत्न तंत्रज्ञ करीतच होते. फ्रान्समधील प्यूगोट कंपनीने १९२२ मध्ये डीझेल इंधनावर धावणारी मोटारकार तयार केली व ती १५ अश्वशक्तीवर पहिल्या चाचणीत चालवून दाखविली. अशाप्रकारे अनेक स्थित्यंतरातून जात डीझेल इंजिन आज मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान पटकावून बसले आहे.

पहिली ८५ वर्षे डीझेल इंजिन हे विविध प्रकारे उपयोगात आणले जात होते, तरी त्यात सातत्याने सुधारणा होत होती. आज जगात सर्वत्र रेल्वेप्रवास, जहाजे, वाहतुकीची वाहने, शेतीची साधने नि उपकरणे तसेच लष्करात ह्या इंजिनाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे. पेट्रोलसारखे इंधन महागल्यामुळे कारगाड्यांत सुध्दा डीझेलचे इंजिन वापरण्यावर भर दिला गेला. शंभर वर्षापूर्वी जर्मन तंत्रज्ञ डीझेल यांनी डीझेल या खनिज तेल इंधनावर चालणाऱ्या इंजिनाचा शोध लावला आणि २००३ मध्ये तंत्रज्ञानाच्या जगतात त्याची शताब्दी साजरी करण्यात आली.

मानवापुढे आलेल्या विविध आव्हानांना तोंड देताना, त्याने जो प्रतिसाद दिला त्यातून विकास होत गेला. डीझेल इंजिनाची होत गेलेली प्रगती हा त्या आव्हानातून निर्माण झालेला गरजेचाच भाग होता. डीझेल हे इंधन,पेट्रोलप्रमाणे ठिणगी देऊन (spark ignition) इंजिन कार्य करीत नसतात, तर डीझेलची इंजिने ही अंतर्ज्वलन (internal combustion) प्रणालीवर कार्यरत होतात. या इंजिनात डीझेल तेलाची अती दाबाखाली वाफ बनते व ती वाफ पेट घेते. पर्यावरणाचा प्रश्न जगभर गंभीर स्वरूप धारण करीत असल्याने निसर्गमित्र स्वरूपाची इंधने निर्माण करण्यावर आता भर दिला जात आहे. जरी डीझेल ह्यांनी केवळ उत्कृष्ट प्रतीच्या डीझेल इंधनांवर चालणाऱ्या इंजिनाची रचना केली होती, तरी आपले हे यांत्रिक अपत्य विविध प्रकारच्या उपलब्ध इंधनांवर कार्यरत होऊ शकले पाहिजे, ही त्यांची सुरुवातीपासूनची धारणा होती. विशेष म्हणजे आज हे इंजिन संपीडित नैसर्गिक वायू (C.N.G.) व घरगुती वापराचा द्रवीकृत खनिज तेल (L.P.G) ह्या वायुरूप नि प्रदूषणरहित इंधंनावर चालविले जात आहे.

२९  सप्टेंबर १९१३  रोजी आरमारी खात्याशी विचारविनिमय करण्यासाठी जात असता इंग्लिश खाडीत बुडून ते मृत्यू पावले.

 

संदर्भ:

समीक्षक अ.पां. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा