बारडीन, जॉन (२३ मे १९०८ – ३० जानेवारी १९९१).

अमेरिकन भौतिकीविज्ञ. बारडीन यांना ट्रांझिस्टरच्या शोधाबद्दल १९५६ मध्ये पहिला तर, १९७२ मध्ये अतिसंवाहकता गुणधर्म शोधण्यासाठी दुसऱ्यांदा नोबेल पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे. शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, भौतिकीविज्ञ अशी बिरुदावली त्यांचे व्यक्तिमत्त्व वर्णन करते. भौतिकी विषयात दोन वेळा नोबेल पुरस्कार मिळविणारे ते एकमेव शास्त्रज्ञ आहेत. पहिला पुरस्कार १९५६ मध्ये विल्यम ब्रडफोर्ड शॉक्ली व वॉल्टर हौझर ब्रॅटन यांच्याबरोबर विभागून मिळाला; तर दुसरे १९७२ साली अतिसंवाहकता गुणधर्मावर (सुपरकंडक्टीव्हिटीवर, superconductivity) केलेल्या संशोधनासाठी लीअन कूपर व जॉन रॉबर्ट स्क्रीफर या दोघांबरोबर विभागून मिळाला. हे संशोधन या तीन संशोधकांच्या अद्याक्षराच्या नावाने, म्हणजे BCS सिद्धांत या नावाने प्रसिद्ध आहे.

बारडीन यांचा जन्म अमेरिकेतील मॅडिसन (विस्कॉन्सिन) या गावात झाला. त्यांचे शालेय व विद्यालयीन शिक्षण मॅडिसन येथेच झाले. विद्युत् अभियांत्रिकी या विषयात १९२८ मध्ये बी.एस्सी. पदवी, तर  १९२९ मध्ये एम्.एस्सी. पदवी तेथूनच मिळविली. १९३०३३ मध्ये त्यांनी गल्फ रिसर्च लॅबोरेटरीमध्ये भूभौतिकीविज्ञ म्हणून काम केले. त्यांना भौतिकशास्त्र व गणित या विषयांमध्ये विशेष रस होता. प्रिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी हे दोन विषय घेऊन पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. १९३५ मध्ये हार्व्हर्ड युनिव्हर्सिटीत सहाय्यक फेलो या पदावर त्यांना काम करण्यासाठी पाचारण करण्यात आले. १९३५३८ या काळात हार्व्हर्ड युनिव्हर्सिटीत फेलोपदी असताना त्यांना भौतिकी विषयातील नोबेल पुरस्कार विजेते जॉन हसब्रुक व्हॅन व्ह लेक व पर्सी विल्यम ब्रिजमन यांच्याबरोबर धातूमधील विद्युत् संवाहकतेवर काम करण्याची संधी मिळाली. १९३६ मध्ये त्यांनी प्रिन्स्टन  विद्यापीठाची पीएच्. डी. पदवी मिळविली.

बारडीन यांनी १९३८ पर्यंत हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीत अध्यापन केले. १९३८४१ या कालावधीत त्यांनी मिनेसोटा युनिव्हर्सिटीत भौतिकशास्त्र विषयाचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. दुसरे महायुद्ध चालू असताना (१९४१४५) त्यांनी वॉशिंग्टन येथील नेव्हल ऑर्डनन्स लॅबोरेटरीत मुलकी भौतिकीविज्ञ म्हणून काम केले. दुसरे महायुद्ध संपल्यावर १९४५ सालच्या ऑक्टोबरमध्ये जॉन बारडीन यांनी बेल टेलिफोन लॅबोरेटरीजमधील विल्यम शॉक्ली व वॉल्टर ब्रॅटन या भौतिक शास्त्रज्ञाबरोबर काम सुरू केले. १९४७ साली इलेक्ट्रॉनिक जगतात क्रांती घडवून आणणाऱ्या ट्रांझिस्टरचा शोध या तिघांच्या प्रयत्नांनी लागला. त्यासाठी १९५६ साली भौतिकी विषयासाठी असलेला नोबेल पुरस्कार या तिघांना विभागून देण्यात आला.

बारडीन अमेरिकन फिजिकल सोसायटीचे सदस्य होते. अध्यक्षांच्या सल्लागार समितीमध्ये त्यांचा समावेश होता. १९५२ मध्ये फ्रँकलिन संस्थेकडून बॅलांटाइन पारितोषिक, १९६५ साली विज्ञानातील राष्ट्रीय पारितोषिक, १९७१ मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्स (आय.ई.ई.ई.) या संस्थेकडून सन्मानार्थ पदक, १९७५ मध्ये फ्रँक्लिन पदक अशी अनेक पदके बारडीन यांना मिळाली आहेत. सर्वांत विशेष म्हणजे १९९० साली अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अमेरिकन जनतेच्या कल्याणार्थ त्यांनी लावलेल्या शोधासाठी त्यांचा केलेला सन्मान आणि सोव्हिएत ॲकॅडेमीने सन्मानाने दिलेले सुवर्ण पदक हे महत्त्वाचे होत.

बारडीन नास्तिक होते पण जीवनातील सर्व प्रकारच्या प्रश्नांना विज्ञान उत्तरे देऊ शकत नाही याचे भानही त्यांना होते. ते स्वभावाने अत्यंत मनमिळाऊ आणि कुटूंबवत्सल होते. गोल्फ खेळायला त्यांना मनापासून आवडे.

बारडीन यांचे बॉस्टनमध्ये हृदय विकाराने निधन झाले.

 

संदर्भ :

समीक्षक – हेमंत लागवणकर

प्रतिक्रिया व्यक्त करा