भारतीय तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाची संकल्पना. आत्मा हा शब्द अत् = सतत चालणे या धातुपासून आला असावा. सतत गतिशील असल्याने त्याला ही संज्ञा मिळाली आहे. तसेच त्याला ‘आत्मन्’ अशीही एक संज्ञा आहे. आत्म्याविषयी वेगवेगळ्या दर्शनांमध्ये वेगवेगळ्या व्याख्या आढळतात. तत्त्वज्ञानामध्ये ज्या तीन वस्तूंचा सर्वाधिक विचार केला जातो, त्यांतील एक म्हणजे आत्मा होय. आत्मतत्त्वाचे सर्वसाधारणपणे परमात्मा आणि जीवात्मा असे दोन पैलू आहेत. येथे जीवात्मस्वरूपाचा विस्ताराने विचार केला आहे.
सर्वसाधारण भाषेमध्ये त्यालाच जीव असेही म्हटले जाते किंवा सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी निवास करत असलेले चेतनतत्त्व, भारतीय तत्त्वज्ञानामध्ये ‘आत्मन्’ या नावाने निर्देशित केले जाते. वेदांच्या संहिताकालखंडामध्ये आत्मन् ही संकल्पना अपरिचित नसली, तरी त्यावर प्रामुख्याने विचार उपनिषदकालामध्ये झाला. त्यानंतर दर्शनकालामध्ये आत्मतत्त्वाच्या स्वरूपाविषयी अधिक सखोल विचार झाल्याचे दिसून येते.
कठोपनिषदामध्ये नचिकेत्याच्या प्रश्नांना उत्तर देताना यमधर्म याविषयी विवेचन करताना दिसतो. आत्मा कधीही जन्माला येत नाही किंवा मृत्यूही पावत नाही. तो अजन्मा, नित्य आहे.
अणूसारख्या सूक्ष्म गोष्टीहूनही लहान आणि मोठ्या गोष्टीहूनही मोठा असलेला आत्मा या प्राणिमात्रांच्या हृदयात निवास करतो आहे. त्या आत्म्याच्या महिम्याला परमात्म्याच्या कृपेने इंद्रिये व चित्त शांत झालेला, शोकाच्या पलीकडे गेलेला पुरुष पाहतो (कठोपनिषद १.२.२०).
या उपनिषदातील १.३.१५ या मंत्रामध्ये आत्मतत्त्वाला लावलेली अशब्द इत्यादी विशेषणे त्याचे गुणरहित असणे स्पष्ट करतात. त्याचप्रमाणॆ हा आत्मा इंद्रियांना कळण्याजोगा नाही, हेसुद्धा याद्वारे दिसते.
छांदोग्योपनिषदामध्ये आत्मा पापरहित, वृद्धत्व-मृत्यू यांच्यापासून मुक्त, शोकापासून अलिप्त आणि तहान व भूक नसलेला असा वर्णिला आहे. आत्म्याचे अविनाशी असणे हे यातून ठसविण्याचा प्रयत्न या उद्धरणातून दिसतो.
या विचाराचा भग्वद्गीतेमध्ये अधिक विस्तार झालेला दिसतो.
न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे॥ ( भगवद्गीता २.२३-२४)
हा आत्मा कधीही जन्मत किंवा मरत नाही अथवा असेही नाही की, एकदा होऊन पुनः होणारा आहे. हा आत्मा न जन्मणारा, नित्य, शाश्वत आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला, तरी हा नाश पावत नाही. तसेच, या आत्म्याला शस्त्रे तोडू शकत नाहीत, याला अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही. न तोडता. न जाळता न भिजवता आणि न सुकवता येणारा असा हा आत्मा निःसंशय नित्य, सर्वांमध्ये असलेला, स्थिर, अचल आणि सनातन आहे.
आत्मा शरीरापासून भिन्न आहे, किंबहुना ज्याप्रमाणे पुरुष जीर्ण झालेली वस्त्रे टाकून दुसरी वस्त्रे परिधान करतो, त्याप्रमाणे आत्मा एका शरीराचा त्याग करून दुसरे शरीर धारण करतो. देहापासून भिन्न असणारा आत्मा बुद्धी आणि इंद्रिये यांच्यापासूनही भिन्न असतो, हे प्रसिद्ध अशा रथरूपकावरून सिद्ध आहे (कठोपनिषद, भगवद्गीता).
माण्डूक्योपनिषदामध्ये आत्म्याच्या विश्व, तैजस् आणि प्राज्ञ अशा अवस्था कल्पिलेल्या आहेत. या अनुक्रमे जाग्रत्, स्वप्न आणि सुषुप्ती अवस्थेतील आत्म्याच्या संज्ञा आहेत. या तीनही अवस्थांच्या पलीकडे असणारा म्हणजेच समाधिरूप चौथी अवस्था (तुरीया) होय. या विशुद्ध आत्म्याला जाणल्याने अमृतत्वाचे फल मिळते.
तैत्तिरीयोपनिषदाच्या द्वितीय अध्यायामध्ये असे म्हटले आहे की, मन आणि बुद्धी यांमध्ये विकार घडतात; त्यामुळे अविनाशी , कूटस्थ, अविचल, नित्य, अविकारी आत्मा त्यांच्या पलीकडे आहे. शरीरपिंड अन्नरसाने तयार होतो, एकप्रकारे हा आत्माच असला, तरीही बाह्य आत्मा आहे. त्याच्या आतमध्ये प्राणमय कोश असतो. शरीराचा व्यापार चालविणारी शक्ती म्हणजे प्राण. या प्राणमयाच्या आत मनोमय आत्मा असून त्याच्याही आतमध्ये विज्ञानमय, तर त्याच्या अंतर्भागी आनंदमय आत्मा असतो (तैत्तिरीयोपनिषद, माण्डूक्योपनिषद).
ब्रह्मतत्त्वाशी किंवा परमात्म्याशी एकरूप असणारा आत्मा हा या आनंदमयाच्याही पलीकडे असतो. तो साक्षी, अग्राह्य, अचिंत्य आणि अलक्षण असतो.
बृहदारण्यकोपनिषदामध्ये आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यो मन्तव्यो निदिध्यासितव्यो …..(बृहदारण्यकोपनिषद २.४.५) अशी आत्मज्ञानाची आवश्यकता सांगितली आहे. आत्म्याचे ज्ञान हे केवळ तर्काने होत नाही; प्रवचनाने, स्मरणाने विविध ज्ञानानेदेखील नाही, तर ज्याला हा आत्मा निवडतो त्यालाच तो प्राप्त होतो. त्याला हा आत्मा स्वतःचे रूप प्रकट करून दाखवितो (कठोपनिषद १.२.२३).
हे आत्मज्ञान म्हणजेच मोक्ष होय. त्याचे ज्ञान झाल्यावर हृदयाच्या सर्व अज्ञानरूपी ग्रंथी नष्ट होतात, सर्व संशय दूर होतात आणि त्या साक्षात्कारी पुरुषाची सर्व कर्मे नष्ट होतात (मुण्डकोपनिषद २.२.८).
संदर्भ :
- Sharma,Chandradhar, Critical Survey of Indian Philosophy, New Delhi, 1971.
- दीक्षित, श्रीनिवास, भारतीय तत्त्वज्ञान, कोल्हापूर,२०१४.
- सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, म. म. उपनिषदांचे मराठी भाषांतर, पुणे, १९७९.
समीक्षक – ललिता नामजोशी