अमृतनादोपनिषद्  हे कृष्णयजुर्वेदाच्या परंपरेतील गौण उपनिषद् आहे. ज्या उपनिषदांवर शंकराचार्यांनी भाष्ये लिहिली आहेत त्या उपनिषदांना मुख्य उपनिषदे आणि इतर उपनिषदांना गौण उपनिषदे म्हणण्याचा प्रघात आहे. अमृतनादोपनिषद्  पद्यात्मक असून त्यात एकोणचाळीस मंत्र आहेत. प्रणव आणि प्रणवाच्या साधनेतून मुक्ती हा प्रस्तुत उपनिषदाचा मुख्य विषय आहे.

या उपनिषदात चित्तशुद्धीसाठी प्रत्याहार, ध्यान, प्राणायाम, धारणा, तर्क व समाधी अशा सहा अंगांचा योग अर्थात षडङ्गयोग सांगितला आहे. सर्वसाधारणपणे योगाभ्यास करणाऱ्या साधकांना पातंजल योगशास्त्रात पुरस्कृत केलेला अष्टाङ्गयोग माहित असतो. तथापि प्रस्तुत उपनिषदात त्यातील यम, नियम व आसने यांचा योगाचे एक अंग या अर्थी निर्देश नाही. ओंकाराचे वर्णन, प्राणायाम-साधना, पंचप्राणांची स्थाने, त्यांचे वर्ण आणि पंचमहाभूताधिष्ठित प्राणायामाच्या मात्रा यांचे ओघवते विवेचन या उपनिषदात आढळते. ओंकाराचे वर्णन करणारे ‘ओमित्येकाक्षरं ब्रह्म’ हे भगवद्गीतेतील वचन प्रस्तुत उपनिषदात एकविसाव्या मंत्रात आढळून येते.

या उपनिषदात प्राणायाम, प्रणव आणि प्राण यांचे पुढीलप्रमाणे वर्णन आले आहे —

प्राणायाम करण्यासाठी साधकाने निर्दोष ठिकाणी पद्मासनात, स्वस्तिकासनात किंवा भद्रासनात उत्तराभिमुख बसावे. एक नाकपुडी बोटाने बंद करून दुसऱ्या नाकपुडीने वायू आत घ्यावा. मूलाधार चक्राच्या ठिकाणी अग्नीची धारणा करावी. यावेळी केवळ ओंकाराचेच चिंतन करावे. हा शब्दरूप एकाक्षर ओंकार (प्रणव) म्हणजेच ब्रह्म होय. त्याचे ध्यान करीत रेचक करावा. अशाप्रकारे ओंकाररूपी मंत्राच्या निरंतर अभ्यासाने शरीरातील व चित्तातील मल दूर करावेत. ओंकाराच्या अकार, उकार, मकार मात्रांचा जप ध्यानासह करीत प्राणायाम करावा. हा प्राणायाम करताना हृदयस्थानी ईश्वराचे ध्यान करावे आणि प्राणायाम स्थूलापासून सूक्ष्म मात्रेपर्यंत न्यावा. मात्रा म्हणजे उच्चारणासाठी लागणारा काळ होय. पृथ्वीशी संबंधित पार्थिव प्राणायाम ५ मात्रांचा, जलाशी संबद्ध वारुण प्राणायाम ४ मात्रांचा, आग्नेय प्राणायाम ३ मात्रांचा, वायव्य २ मात्रांचा आणि आकाशाशी संबंधित प्राणायाम १ मात्रेचा असतो; तर केवळ प्रणवाशी संबंधित प्राणायाम अर्धमात्रेचा असावा.

पूरक, कुंभक व रेचक या प्राणायामाच्या त्रिविध भेदांचे वर्णन करून व्याहृतींसह गायत्रीमंत्र व ओंकारनादासह तीनवेळा प्राणायाम-साधना करावी. हे प्राणायामाचे एक आवर्तन मानले आहे. योगाभ्यासाचीही प्रक्रिया नियोजित वेळेनुसार करावी. ज्याप्रमाणे पर्वतामध्ये उत्पन्न होणाऱ्या सुवर्ण आदी धातूंमध्ये असलेले दोष अग्नीच्या संपर्कात येताच भस्म होतात, त्याप्रमाणे इंद्रियांद्वारे निर्माण झालेले दोष प्राण संयमाने अर्थात प्राणायाम केल्याने भस्मसात होतात.

प्रणव अर्थात ॐ हे श्रेष्ठ अक्षर आहे. तो स्वरही नाही किंवा व्यंजनही नाही. तो कण्ठ, तालू, नासिका इत्यादी उच्चारण स्थानांवरून उच्चारित होत नाही. त्याचा कधीही ऱ्हास होत नाही. साधकाने प्रणवरूपी मार्गावर निरंतर वाटचाल करावी.

योग्याने भय, आलस्य, अतिनिद्रा, अतिजागरण, अत्याहार किंवा निराहार या गोष्टी वर्ज्य कराव्यात. या उपनिषदामध्ये प्राणायाम, पूरक, कुंभक, धारणा, ऊह आणि समाधी या संज्ञांच्या समर्पक परिभाषा आढळतात. या उपनिषदानुसार दिवस व रात्र मिळून होणाऱ्या श्वासांची संख्या  १,१३,८१३ अशी आहे.

प्राणाचे स्थान हृदय असून त्याचा वर्ण प्रवाळाप्रमाणे लाल असतो, अपानाचे स्थान गुदद्वार व वर्ण इंद्रगोप किड्याप्रमाणे गडद लाल असतो, समानाचे स्थान नाभी असून त्याचा वर्ण गायीच्या दुधासारखा पांढरा असतो, उदानाचे स्थान कंठ असून त्याचा वर्ण  धूसर/ मातकट असतो, व्यान सर्व शरीराला व्यापून असतो व त्याचा वर्ण ज्योतीच्या प्रभेसारखा असतो.

साधकाने ओंकाररूपी रथावर आरूढ व्हावे; प्रत्यक्ष श्रीविष्णू आपले सारथी आहेत अशी कल्पना करावी आणि ब्रह्मसाक्षात्कारासाठी रुद्राची आराधना करावी. ज्याप्रमाणे रथाचा स्वामी ज्या ठिकाणी त्याला जायचे आहे त्या ठिकाणी (गन्तव्यस्थानी) गेल्यावर रथाचा त्याग करतो त्याप्रमाणे इष्टप्राप्ती होईपर्यंत प्रणवाची साधना करावी. साक्षात्कारानंतर प्रणवाचे प्रयोजन उरत नाही. कैवल्यप्राप्ती हे ओंकाराच्या विधिवत अभ्यासाचे फळ होय. जो साधक रूप आंधळ्याप्रमाणे, शब्द बहिऱ्याप्रमाणे आणि स्वत:च्या शरीराला लाकडाच्या निर्जीव ओंडक्याप्रमाणे पाहतो, त्याला प्रशान्त अवस्थेतील साधक असे म्हणतात.

ज्या योग्याचा प्राण सर्व मंडले भेदून मस्तकात प्रवेश करतो, त्या योग्याने कोठेही प्राणत्याग केला तरी त्याला मुक्ती प्राप्त होते, असे या उपनिषदाची समाप्ती करताना म्हटले आहे.

पहा : आरण्यके व उपनिषदे, प्रणव, प्राण, प्राणायाम.

समीक्षक : प्राची पाठक