अभिजात वास्तुशैलीतील जपानमधील झेन मंदिर. रायऑन-जी हे जपानमधील क्योटो शहराच्या वायव्येस आहे. इ.स. १५००च्या सुमारास मुरोमाची कालखंडात (१३३६-१५७३) होसोकावा कात्सुमोटो यांद्वारे त्याची स्थापन करण्यात आली. दायुन्झान(Daiunzan) मंदिर व बौद्ध भिक्षूंच्या ध्यानधारणेसाठी बाग अशी त्याची निर्मिती करण्यात आली आहे. रायऑन-जी येथील बाग जपानमध्ये प्रचलित असलेल्या कारेसांसुई (जपानी खडक बाग; Japanese Rock Garden) या कोरड्या भूदृष्य कलाशैलीचे (Dry Landscape) उत्तम उदाहरण आहे. रायऑन-जीचा समावेश क्योटो मधील प्राचीन स्मारकांच्या यादीत झाला असून युनेस्कोने त्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे (१९९४).
रायऑन-जी बागेची रचना आयताकृती व आंतर्मुख पद्धतीची असून त्याने सु. २४८ चौ. मी. क्षेत्र व्यापलेले आहे. या बागेच्या तीन बाजूंनी कौलारू छप्पर असलेल्या १८० सेंमी. उंचीच्या मातीच्या भिंती आहेत. या भिंतींचे बांधकाम मोहरीचे तेल मिश्रित मातीपासून करण्यात आले आहे. जमीनीवरील पांढऱ्या खडीवरून प्रकाश परावर्तित होऊन डोळे दिपण्याची शक्यता केशरट तपकिरी रंगाच्या या भिंतींमुळे कमी होते. सभोवतालच्या झाडीकडे लक्ष न जाता बागेच्या आतील जमिनीवर असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेवर लक्ष केंद्रित करण्यासाठीही या भिंतींचा उपयोग होतो. बागेच्या आतील जमिनीची पातळी भिंतीपलीकडच्या पातळीहून ८० सेंमी. वरती आहे. त्यामुळे भिंतींच्या भक्कमपणात भर पडली आहे. उत्तम बांधकाम तंत्रज्ञानामुळे या भिंती वर्षानुवर्षे हवा-पाण्याच्या मारा सहन करूनही सुस्थितीत उभ्या आहेत.
रायऑन-जी बागेत विशिष्ट आकाराच्या १५ दगडी शिळा एका प्रमाणबद्ध पद्धतीने, प्रत्येकी ५, ३ व २ अशा गटात उभ्या केल्या आहेत. या शिळांचा आकार व त्यांच्यातील अंतर हे गणिती सूत्रांनी बद्ध आहे, ज्यामुळे बघणाऱ्याचे चित्त एकाग्र होण्यास मदत होते. एका वेळेस जास्तीत जास्त १४ शिळाच दिसतील अशा पद्धतीने त्यांची मांडणी केली गेली आहे. त्यामुळे शिळांची संपूर्ण रचना बागेतील कोणत्याच ठिकाणाहून दिसत नाही. साधनेचा अंतिम टप्पा गाठणाऱ्यालाच सर्व १५ शिळा एका वेळेस दिसू शकतात असा समज या बाबतीत रूढ आहे.
बागेच्या जमिनीच्या पृष्ठभागावर नदीपात्रातील बारीक क्वार्ट्झ खडीने आच्छादित केला आहे. खडी भोवती चारही बाजूंनी छोट्या दगडांची किनार आहे. शिळांभोवती वर्तुळाकृती व उर्वरित भागात समांतर रेषा अशी खडींची रचना केली आहे. यामुळे जलाशयात उभ्या असलेल्या शिळा व पाण्यात निर्माण झालेले तरंग असावे असा भास होतो. या रचनेचे नदीच्या प्रवाहातील बेटे, पाण्यातून पोहत जाणारे वाघाचे छावे, ढगांमधून डोकावणारी पर्वत शिखरे, गूढ झेन कोडं असे विविध अर्थही लावले जातात. यांपैकी कोणता अर्थ या रचनेतून प्रतीत होतो हे पूर्णपणे बघणाऱ्यावर अवलंबून आहे. नैसर्गिक घटक वापरून केली गेलेली ही एक सौंदर्यपूर्ण ॲबस्ट्रॅक्ट रचना (Abstract composition) असेही म्हणता येईल.
बागेतील जमीनीचा पृष्ठभाग सरळ दिसला तरीही आग्नेय दिशेकडे त्याला थोडा उतार दिलेला आहे जेणेकरून पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. तसेच बागेची पश्चिम भिंत उत्तरेकडून दक्षिणेकडे थोडी उतरती बांधली आहे. बाग छोटेखानीच असली तरी दृष्टीकोनाची (पर्स्पेक्टिव्ह; Perspective) अशी कुशल हाताळणी केल्यामुळे, आहे त्यापेक्षा जास्त खोलीची असल्याचा दृष्टीभ्रम निर्माण होतो.
दंताळ्याच्या साहाय्याने खडीमध्ये समांतर रेषा रेखाटणारा भिक्षू सोडून कोणालाही या बागेत पाऊल ठेवण्यास मज्जाव आहे. फक्त होंजो (Hōjō; मठाधिपतीच्या वास्तव्याचे ठिकाण) व्हरांड्यात बसून, एका नेमस्त चौकटीतूनच चित्रासारखा या देखाव्याचा आस्वाद घेता येतो.
झाडे, झुडपे, वेली अशा बागेत नेहमी वापरल्या जाणाऱ्या सजीव घटकांचा उपयोग न करता केवळ दगड व खडी अशा निर्जीव घटकांचा समावेश या रचनेत केला गेला आहे. शिळांवर असलेले शैवाल एवढाच काय तो सजीव घटक. त्यावरूनच ‘कोरडी बाग’ (ड्राय गार्डन; Dry Garden) असे या प्रकाराला नाव पडले. याच काळात जपान मध्ये निर्माण झालेल्या ‘स्ट्रॉल गार्डन्स’ (Stroll Gardens) पेक्षा या बागा अगदीच निराळ्या धाटणीच्या. स्ट्रॉल बगीच्यांमध्ये निसर्गाचा आस्वाद घेणं, व निसर्गाच्या सान्निध्यात विश्रांती घेणं हा मुख्य उद्देश तर झेन बगीच्यांमध्ये निसर्गाच्या माध्यमातून अध्यात्मिक उन्नती साधणे हा प्रमुख उद्देश. झेन भिक्षूंच्या आयुष्याप्रमाणेच या बागांमध्येही साधेपणा, काटेकोरपणा व नियमबद्धता ही तत्त्वे प्रकर्षाने जाणवतात. जपानी झेन संस्कृती व तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब झेन बागांच्या रचनेत दिसते.
संदर्भ :
- Goeffrey, Jellicoe, Susan, Jellicoe The Landscape of Man – Shaping the environment from prehistory to present day, New york : Viking press, 1975.
- Michael, Laurie An introduction to Landscape Architecture, Elsevier publishing company, 1985.
- http://www.ryoanji.jp/smph/eng/garden/making.html#j_point
- https://en.wikipedia.org/wiki/Ry%C5%8Dan-ji
समीक्षक – श्रीपाद भालेराव