मध्य प्रदेश राज्यातील प्रागैतिहासिक कलेसाठी प्रसिद्ध असलेले रायसेन जिल्ह्यातील एक स्थळ. ते विंध्या पर्वतरांगांत वसले आहे. विंध्य पर्वतातील गुहांमधे व खडकांच्या आश्रयाला अनेक वनवासी समूह राहत. यांमधील कित्येक गुहा व शैलाश्रयांचा (रॉक शेल्टर) वापर प्रागैतिहासिक मानव समूहांनी केला होता. त्याचे अनेक पुरावे प्राण्यांची हाडे, दगडी अवजारे, दफने आणि दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. या मानवी पूर्वजांनी ते राहात असलेल्या गुहांच्या भिंती, छत व शैलाश्रयांमधील खडकांवर मोठ्या प्रमाणात चित्रे काढली आहेत. या शैलचित्रांमधे पाळीव प्राणी, वन्यप्राणी, शिकारीचे प्रसंग, मासेमारी, वनस्पतीजन्य अन्न गोळा करणे, नृत्य, संगीत, धार्मिक विधी, जन्ममृत्यूच्या घटना असे नानाविध विषय आहेतया स्थळाला जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा मिळालेला आहे.

भीमबेटका येथील शैलाश्रय.

स्थान व शोध :

भीमबेटका हे स्थान विंध्य पर्वतरांगेच्या उत्तर टोकापाशी, माळवा पठारासमोर असलेल्या अनेक टेकड्यांच्या समूहामध्ये असून ते होशंगाबाद-भोपाळ रेल्वे मार्गावरील ओबेदुल्लागंज (हिरणीया) व बरखेडा या रेल्वे स्थानकांच्या मध्ये आहे. भीमबेटकाच्या कमी उंचीच्या टेकड्या करीतलाई ते जोंद्रा अशा पसरलेल्या आहेत. भोपाळपासून भीमबेटकाचे अंतर ४५ किमी. आहे. येथे टेकडीच्या माथ्यांवर व उतारांवर ५०० पेक्षा जास्त गुंफा व शैलाश्रय आहेत. जवळजवळ या सर्व ठिकाणी बाजूच्या खडकांवर आणि छतांवर प्रागैतिहासिक मानवाने चित्रे काढली आहेत. तसेच ऐतिहासिक काळातही यांपैकी काही गुंफा व शैलाश्रयांमध्ये चित्रे काढलेली दिसतात.

भीमबेटका हे नाव व या परिसरातील अनेक नावे महाभारतामधील प्रसंगांशी व त्यातील व्यक्तींशी संबंधित आहेत. खूप दूर अंतरावरून भव्य दिसणाऱ्या या खडकांना पांडववीर भीम याच्या बैठकीचे स्थान असे म्हणतात. फार वर्षांपूर्वी भीमसेन भोपाळजवळच्या भव्य खडकांपाशी आला व तेथे बैठक मारली अशी आख्यायिका आहे. त्यावरून स्थानिक लोकांनी येथील टेकड्यांना भीमबैठका (भीमबेटका) हे नाव दिले.

भीमबेटका या प्रस्तर गुहांचे समन्वेषण विक्रम विद्यापीठाचे संशोधक-प्राध्यापक विष्णू श्रीधर वाकणकर यांनी प्रथम केले (१९५७). त्यांच्या मते गोट्यांची अवजारे वापरणाऱ्या संस्कृतीपासून ते अवघ्या ३०० वर्षांपूर्वीच्या गोंड राजवटीपर्यंतचा सलग इतिहासाच्या खुणा जपणारे हे संपूर्ण भारतामधील एकमेव स्थान आहे. वाकणकरांनी भीमबेटका येथे विस्तृत सर्वेक्षण केले व सर्व शैलाश्रयांचे वर्गीकरण केले. वर्ग व उपवर्ग यांचा विचार करून सर्व शैलाश्रयांना त्यांनी वैज्ञानिक पद्धतीने, एक तिहेरी नोंदणी क्रमांक (उदा., तीन एफ – २४) दिला. भीमबेटकाविषयी काम करणारे सर्व संशोधक आजही हेच क्रमांक वापरतात. येथील अनेक शैलाश्रयांमध्ये चित्रे सापडल्याने प्रागैतिहासिक मानवाने वसती केली होती किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी येथे उत्खनन होणे आवश्यक होते. वाकणकरांनी १९७२ मध्ये येथे प्रथम उत्खनन केले व नंतर डेक्कन कॉलेज (पुणे) यांच्या वतीने वीरेंद्रनाथ मिश्र आणि वाकणकर यांनी मिळून पाच वर्षे उत्खनन केले (१९७३-७७). या उत्खननात स्वित्झर्लंडमधील बसेल येथील फोक आर्ट म्युझियममधील विदुषी सुसान हास यांचाही सहभाग होता.

विक्रम विद्यापीठाने एकूण सात शैलाश्रयांमधे (तीन एफ – २४ ए,  तीन एफ – १४, तीन एफ – १६, तीन ए – २८, तीन ए – २९, तीन ए – ३०, व तीन ए – ३३) उत्खनन केले. डेक्कन कॉलेजने तीन एफ – २२ व तीन एफ – २३, तर बसेल विद्यापीठाने तीन सी – १२ व तीन सी – १६ या शैलाश्रयांमध्ये उत्खनन केले. येथील गुहांमधे प्राथमिक निक्षेपांत पुराश्मयुगीन अवजारांचे उत्खनन करून वाकणकर व वीरेंद्रनाथ मिश्र या दोघांनी भारतीय पुरातत्त्वामध्ये भरीव योगदान दिलेले आहे.

भीमबेटका येथील पुरातत्त्वीय अवशेष :

भीमबेटका समूहातील सर्वांत मोठा शैलाश्रय तीन एफ – २४ हा आहे. वाकणकर यांनी या शैलाश्रयात दोन खड्डे घेतले. त्यांना अधिक कठीण थरात अशुलियन या अश्मयुगीन संस्कृतीची अवजारे मिळाली, तर तुलनेने मृदू थरांमधे मोठमोठ्या दगडगोट्यांमधे गोटा अवजारे (Pebble tools) मिळाली. ही अवजारे अशुलियनच्या पूर्वीच्या काळातली होती. वाकणकरांना तीन ए – ३ या शैलाश्रयात उत्खनन करताना अशुलियन काळातील वसाहतीच्या थरामधे धोंड्यांची विशिष्ट रचना आढळली. बहुदा ती तत्कालीन झोपडीची बाहेरची बाजू होती. वाकणकरांना इतर शैलाश्रयांमधे उत्तर पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग व मध्याश्मयुग या कालखंडांतील अवजारे मिळाली. भीमबेटका येथे वाकणकर यांना जी सलग सांस्कृतिक क्रमवारी उपलब्ध झाली, ती पुढीलप्रमाणे आहे :

कालखंड ७ : उत्तर मध्ययुगीन व पूर्व मध्ययुगीन

कालखंड ६ : उत्तर प्रारंभिक ऐतिहासिक व पूर्व प्रारंभिक ऐतिहासिक

कालखंड ५ : इतिहासपूर्व (ताम्रपाषाणयुग)

कालखंड ४ : उत्तर पुराश्मयुग व मध्याश्मयुग

कालखंड ३ : मध्य पुराश्मयुग (भीमबेटका)

कालखंड २ : उत्तर अशुलियन व पूर्व अशुलियन

कालखंड १ :  गोट्यांच्या अवजारांची संस्कृती

वीरेंद्रनाथ मिश्र यांनी या शैलाश्रयाच्या बाजूला असलेल्या तीन एफ – २३ या शैलाश्रयाचे उत्खनन केले. या ठिकाणी मानवी वसतीमुळे तयार झालेल्या थरांची जाडी ३.९० मी. होती. भीमबेटका समूहातील कोणत्याही इतर शैलाश्रयात एवढा जाड वसाहत निक्षेप (Habitation deposit) आढळलेला नाही. या शैलाश्रयातील सांस्कृतिक क्रमवारी उपलब्ध झाली आहे ती पुढीलप्रमाणे आहे :

स्तर १ : भौमितिक आकाराची सूक्ष्मास्त्रे, मृद्भांडी व मणी

स्तर २ : फक्त मृद्भांडी व मणी वगळता अवशेष स्तर प्रमाणे

स्तर ३ : कमी प्रमाणातील सूक्ष्मास्त्रे

स्तर ४ : उत्तर पुराश्मयुगीन अथवा मध्य पुराश्मयुगाच्या अखेरीची अवजारे

स्तर ५ : मध्य पुराश्मयुग काळातील अवजारे

स्तर ६ : उत्तर अशुलियन काळातील अवजारे

स्तर ७ : उत्तर अशुलियन काळातील अवजारे

स्तर ८ : उत्तर अशुलियन काळातील अवजारे

उत्खननात पुराश्मयुगापासून मध्याश्मयुगापर्यंत सर्व टप्प्यांच्या वसाहतींचे पुरावे मिळाले. भारतामध्ये अनेक ठिकाणी भरपूर प्रमाणात अशुलियन अवजारे मिळाली आहेत. परंतु ती नदीनाल्यांच्या गाळात म्हणजेच मूळच्या ठिकाणांपासून दूर अंतरावर दुय्यम निक्षेपात असतात. निर्मिती व वापर होणार्‍या मूळ ठिकाणांपासून दूर अंतरावर वाहून आलेल्या या अवजारांचा सांस्कृतिक वा ऐतिहासिक पुरावा म्हणून फारसा उपयोग होत नाही. याउलट शैलाश्रयात मिळणारी अवजारे ही प्रत्यक्ष बनवण्याच्या व वापराच्या जागीच असल्याने त्यांचे मोल जास्त असते.

भीमबेटका येथे पुराश्मयुगीन अवजारे बनवण्यासाठी दोन प्रकारच्या क्वार्टझाइट दगडांचा वापर केलेला आहे. हातकुऱ्हाडी व फरशी हत्यारे गडद भुऱ्या रंगाच्या, तर छिलका अवजारे पिवळ्या रंगाच्या क्वार्टझाइट दगडापासून तयार केलेली दिसतात. अशुलियन थरांची जाडी २.५ मी. होती. भीमबेटका येथे उत्तर अशुलियन काळातील अवजारे प्रामुख्याने छिलका प्रकारची आहेत. त्यामध्ये तासण्या, दंतुरीत (डेंटिक्युलेट), खोबण (नॉच), चाकूची पाती, व समतल (लेवाल्वा) छिलके आहेत. या अवजारांचे प्रमाण ८८ टक्के असून, उरलेली अवजारे म्हणजे हातकुऱ्हाडी व फरशी हत्यारे आहेत. गोट्यांची बनवलेली तोड हत्यारे सापडली नाहीत.

मध्य पुराश्मयुगीन थरांची जाडी तुलनेने कमी असून या काळात पूर्वीच्या अशुलियन काळातीलच दगडांचे प्रकार अवजारांसाठी वापरले होते. या थरांमध्ये हातकुऱ्हाडी व फरशी हत्यारे सापडत नाहीत; तथापि इतर अवजार संच तसाच आढळतो. लेवाल्वा तंत्राचा वापर या कालखंडातही सुरू होता. या काळाचे वैशिष्ट्य म्हणजे तासण्या बनवण्यासाठी फक्त छिलके न वापरता नैसर्गिक सपाट दगडांचा उपयोग केला जात होता.

उत्तर पुराश्मयुगीन कालखंडाची वसाहत आणखी कमी प्रमाणात होती. पूर्वीच्या काळातील अवजार संचात या काळात फारसा फरक पडलेला दिसत नाही. अधिक प्रमाणात टोक तासण्या, छोटी व पातळ पाती, सूक्ष्मपाती व ब्युरीन ही या काळाची वैशिष्ट्ये होती.

पुराश्मयुगाच्या तुलनेत मध्याश्मयुगात अधिक प्रमाणात गुंफांमध्ये मानवाने वसाहत केली होती. निरनिराळ्या गुंफांमध्ये या काळातील थरांची जाडी २० ते १५० सेंमी. आढळली आहे. मध्याश्मयुगीन माणसांनी संपूर्णपणे नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला व आणखी इतर प्रकारच्या दगडांचा वापर केला. या काळातील थरांमध्ये बोथट पाठीची पाती, तिरपी तोडलेली पाती, टोचे, त्रिकोणी व गारपाती प्रकारची अस्त्रे (triangle and trapeze), व तीराग्रे अशी विविध प्रकारची सूक्ष्मास्त्रे आढळतात. मध्याश्मयुगात यासाठी वापरलेले दगड (चर्ट व चाल्सिडोनी) हे भीमबेटका परिसरात आढळत नाहीत. मध्याश्मयुगीन लोकांनी अन्नप्रक्रिया करण्यासाठी पाटा व वरवंटा यांचा वापर केला होता. तसेच या लोकांनी चपटे दगड वापरून पक्क्या जमिनी बनवल्या होत्या.

कालमापन :

येथील वसाहत थरांचे रेडियोकार्बन पद्धतीने कालमापन करण्यात आले. मध्य पुराश्मयुगातील नमुन्यांवरून त्या थरांचे वय दर्शवणाऱ्या तीन रेडियोकार्बन तिथी उपलब्ध आहेत. त्या १७६७ अधिक – उणे ४९०, १७२३ अधिक – उणे ४८० व १७३७ अधिक – उणे ५७० अशा आहेत. म्हणजेच या वसाहती आजपासून १५००० ते १७००० वर्ष जुन्या आहेत. मध्याश्मयुगाच्या १३ रेडियोकार्बन तिथी उपलब्ध असून त्यांच्यानुसार मध्याश्मयुगाचा कालखंड आजपासून ७५०० ते १०६० वर्षपूर्व असा निश्चित करण्यात आला आहे. अनेक शैलाश्रयांमध्ये मध्याश्मयुगीन थरांवर ताम्रपाषाणयुगीन रंगीत खापरे, तांब्याचे तुकडे व मौल्यवान दगडांपासून बनवलेले मणी आढळले. यावर असणाऱ्या थरांमध्ये साधी खापरे व लोखंडाची अवजारे मिळाली. याचा अर्थ असा की, भीमबेटकाच्या शैलाश्रयांचा वापर पुराश्मयुगापासून ते ऐतिहासिक-मध्ययुगीन काळापर्यंत सातत्याने केला जात होता.

संदर्भ :

  • Misra, V. N. ‘The Acheulian Industry of Rock-Shelter IIIF-23 at Bhimbetka, Central India’ – A Preliminary Study, Australian Archaeology 8: 63-106, 1980.
  • Misra, V. N. & Bellwood, P. Eds., ‘The Acheulian Succession at Bhimbetka, Central India’, Recent Advances in Indo-Pacific Prehistory, pp.35-48, New Delhi, 1985.
  • Wakankar, V. S. ‘Bhimbetka : The Stone Tool Industries and Rock Paintings’, Recent Advances in Indo-Pacific Prehistory (V. N. Misra & P. Bellwood, Eds.), pp. 175-176, New Delhi, 1985.
  • मिश्र, वीरेंद्रनाथ, अनु., जोगळेकर, प्रमोद, पद्मश्री विष्णू श्रीधर वाकणकर,  पुणे, २००२.

समीक्षक : सुषमा देव