पेरियार (नायकर), ई. व्ही. रामास्वामी : (१७ सप्टेंबर १८७९–२४ डिसेंबर १९७३).

द्राविड आंदोलनाचे प्रमुख नेते व तमिळ जनतेत पेरियार (थोर आत्मा) व थानथाई (पिता) म्हणून गौरविलेले समाजसुधारक. पूर्ण नाव एरोड व्यंकटप्पा रामास्वामी नायकर. तमिळनाडूतील एरोड येथे कन्नडा नायकर जमातीतील संपन्न कर्मठ हिंदू कुटुंबात जन्म. वडील व्यंकटप्पा हे व्यापारी होते. आईचे नाव चिन्ना थायाम्मल उर्फ मुथम्मल. कृष्णस्वामी ई. व्ही. हे त्यांचे वडीलबंधू आणि कन्नमल व पुन्नथाई या लहान बहिणी होत्या. शालेय शिक्षण फक्त तीन वर्षेच झाले. एकोणिसाव्या वर्षी त्यांचा पहिला विवाह नात्यातील नागमल्ल या तरुणीशी झाला.

त्यांनी वडिलांच्या व्यवसायामध्ये मदत करण्यास सुरुवात केली. लहानपणापासूनच ते परंपरावादी, अंधश्रद्धा व धर्मग्रंथांतून सांगितलेल्या विचारांवर नेहमीच प्रश्न उठवत असत. गरीब आणि अस्पृश्य यांची परिस्थिती पाहून त्यांचे मन क्षुब्ध झाले व त्यांनी धर्मग्रंथांचा चिकित्सापूर्ण अभ्यास केला. त्यामुळेच त्यांची हिंदू धर्मावरील श्रद्धा डळमळली आणि त्यांनी सामाजिक समानतेचा व अस्पृश्योद्धाराचा प्रसार सुरू केला. १९०५ पासून पेरियार यांनी सामाजिक कार्यास सुरुवात केली. याच काळात एरोडमध्ये प्लेगची साथ पसरली होती. अनेक लोक मृत्युमुखी पडू लागले, त्यामुळे अनेक श्रीमंत व्यापाऱ्यांनी एरोडमधून स्थलांतर केले. पण पेरियार यांनी रोग्यांची सेवाशुश्रूषा केली व मृतांवर स्वतः अंत्यसंस्कार केले.

१९१८ मध्ये ते एरोड नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील थोर नेते चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या सल्ल्याने त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९२० मध्ये महात्मा गांधी यांनी पुकारलेल्या असहकार आंदोलनात त्यांनी सक्रिय भाग घेतला. या आंदोलनाचा एक भाग म्हणून त्यांनी स्वतःहून विविध संस्थांत असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव या पदांचा राजीनामा दिला. या असहकार आंदोलनात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. अस्पृश्यांवरील निर्बंध दूर करण्यासाठी त्रावणकोरमध्ये झालेल्या वैक्कोम सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. काँग्रेसमधील वरिष्ठवर्णीयांच्या धोरणाबद्दल मनात असंतोष निर्माण होऊन त्यांनी पक्षत्याग केला. तमिळ व उपेक्षित समाजाला ब्राह्मणी वर्चस्ववादाच्या विरोधात संघटित केले. पददलित समाजाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी १९२५ साली स्वाभिमान आंदोलन सुरू केले. आंतरजातीय विवाह व विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. तसेच देवदासीप्रथा बंद करण्यासाठीच्या विधेयकास पूर्ण पाठिंबा दिला.

१९३१ मध्ये त्यांनी रशिया, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स व स्पेन या देशांचा दौरा केला. १९३३ मध्ये त्यांनी लोकांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड करण्याचे आवाहन केले आणि त्यामुळे पुन्हा त्यांना बंदिवास भोगावा लागला. पहिल्या काँग्रेस मंत्रिमंडळाच्या काळात १९३७ मध्ये त्यांनी प्रथम हिंदी भाषेविरोधी आंदोलन सुरू केले. त्यासाठीही त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. १९४४ साली त्यांनी जुन्या जस्टिस पक्षाचे रूपांतर द्रविड कळघम या नवीन पक्षात केले. सार्वभौम व वर्णभेदरहित द्रविडनाडूची स्थापना हे त्यांच्या द्रविड कळघम पक्षाचे ध्येय होते. पुढे पेरियार यांनी पहिली पत्‍नी वारल्यानंतर मणिअम्माई या आपल्या २८ वर्षांच्या स्वीय सहायिकेसोबत दुसरे लग्‍न केले (१९४९). त्याच्या निषेधार्थ आण्णा दुरै यांच्या नेतृत्वाखाली काही अनुयायांनी त्यांचा पक्ष सोडून द्रविड मुन्नेत्र कळघम हा नवा पक्ष स्थापन केला. निवडणुका लढविण्यासाठीच मुख्यतः नवा पक्ष अस्तित्वात आला होता. पक्षात फूट पडली, तरी पेरियार यांचा तमिळ जनतेवरील वैयक्तिक प्रभाव कमी झाला नव्हता. १९७१ साली त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन संमेलन भरवून धर्म, जात व भाषा यांच्या आधारावर होणारा सर्व प्रकारचा पक्षपात दूर करण्याचे सरकारला आवाहन केले, तसेच हिंदी भाषेला विरोध केला.

१९३४ पासूनच त्यांनी सामाजिक क्रांतीला वाहून घेतले होते. हिंदू धर्म हे ब्राह्मणांच्या वर्चस्वाचे व मक्तेदारीचे एक साधन आहे, मनुस्मृति ही अमानुष आहे आणि पुराणे म्हणजे परीकथा आहेत, अशी त्यांची मते होती. वर्णव्यवस्था, बालविवाह, सक्तीचे वैधव्य यांविरुद्ध ते सतत प्रचार करीत. द वर्ल्ड टू कम, व्हाय द राइट्स फॉर कम्यूनल रिझर्व्हेशन, वर्ड्स ऑफ फ्रीडम : आयडिया ऑफ नेशन, सच्ची रामायण हे त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ. कुटियरसू (१९२५), रिव्होल्ट (१९२८), पकुत्तरिवू (१९३४), विधुथालई या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले.

वेल्लोर येथे वयाच्या ९४व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Jeyaraman, Bala,  Periyar : The Political Biography of E. V. Ramasamy, New Delhi, 2013.
  • Veeramani, K. Collected Works of Periyar E. V. R., Chennai, 2005.

समीक्षक – अरुणचंद्र पाठक

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा