आपल्याला एखाद्या गोष्टीचा बोध कसा होतो, आपण एखादी गोष्ट समजून घेताना त्यात कोणत्या ज्ञानात्मक प्रक्रिया अनुस्यूत असतात, आपण विचार कशाप्रकारे करतो, लक्षात कसे ठेवतो, कसे शिकतो, समस्या आणि पेच कसे सोडवतो याचा अभ्यास म्हणजे मनोवाद. भाषेच्या संदर्भात मनोवादी भूमिका घेतल्यानंतर भाषाभ्यास एका वेगळ्या उंचीवर गेला. मनोवाद ही संकल्पना १९५०-६० च्या दशकात मानसशास्त्रातील वर्तनवादाला आव्हान देत उभी राहिली. नोम चॉम्स्की यांनी १९५९ साली स्किनर या मानसशास्त्रज्ञाच्या वाचिक वर्तनावरील पुस्तकाच्या परीक्षणात वर्तनवादी भूमिकेचे रीतसर खंडन केलेले आहे. हे परीक्षण म्हणजे चॉम्स्कीप्रणीत मनोवादाची पायाभरणी होती. वर्तनवादी आकलनानुसार भाषा या घटिताकडे एक वर्तन म्हणून पाहिले जाते. भाषा आत्मसात कशी केली जाते, भाषा कशी शिकली जाते, भाषेचा व्यक्ती आणि समाजातील विकास या सार्या प्रश्नांसाठी चेतक-प्रतिसाद यांद्वारे उत्तर दिले जाते. १९५० च्या दशकात सर्वच ज्ञानशाखांत या वर्तनवादी भूमिकेला छेद दिला गेला आणि ज्ञानात्मक अगर मनोवादी भूमिकेची मांडणी केली गेली. भाषिक संरचनेच्या तळाशी काही सामान्य तत्त्वे असतात आणि ती तत्त्वे वर्तन या बाह्य गोष्टीवर अवलंबून नसून ती जैविक पातळीवर मानवी मेंदूत उपस्थित असतात आणि जनुकीय पातळीवर ती संक्रमित होत असतात अशी धारणा मनोवादी भूमिकेच्या मुळाशी आहे. सामान्य व्याकरण अगर युनिव्हर्सल ग्रामर हे त्यामुळे शक्य आहे ; कारण भाषा या अशाप्रकारे मानवी मेंदूतील अमूर्त शक्तीच्या आविष्कार होत. सामान्य व्याकरणाची तत्त्वे शोधून काढली म्हणजे आपोआपच आपल्याला मनोगत (मेंदूतील) भाषिक ज्ञानात्म शक्तीचे प्रतिरुपण मिळेल अशी धारणाही या भूमिकेत बाळगलेली होती.
मनोवादी भूमिका स्वीकारल्याने भाषाविज्ञानातील सर्वच उपशाखा ढवळून निघाल्या आणि मनोवादी भूमिकेचा शिरकाव होऊन अभ्यासपद्धती आणि गृहीतकेदेखील बदलली. वाक्यविन्यास, पदिमविचार, स्वनविज्ञान इ. शाखांत आता मेंदूत हे भाषिक ज्ञान कसे उमटलेले असते, त्याची प्रतिमा आपण निर्माण करत आहोत की नाही याकडे लक्ष दिले जाऊ लागले. सैद्धान्तिक पातळीवर सिद्धान्त हे मानवी मेंदूतील भाषिक शक्तीचे नकाशे होत अशी धारणा बळावली. किंबहुना चांगला सिद्धान्त म्हणजे तो, जो मानवी मेंदूतील भाषिक व्यवस्थेचे वर्णन अगर प्रतिरूपण करतो असा समजही रूढ होत गेला. उदा. वाक्यविन्यासातील एक्स-बार सिद्धान्त हे केवळ एक सैद्धान्तिक स्पष्टीकरण न राहता मानवी मेंदूतील भाषिक संरचनेबाबतचे सत्ताशास्त्रीय विधान ठरू लागले. व्याकरणगत सर्वच कोटी आता अशाप्रकारे मेंदूगत भाषिक ज्ञानाची सत्ता आणि सत्त्व सांगत असतात हेही पर्यायाने मान्य केले जाऊ लागले.वर्तनवादी भूमिका ही भाषा संपादनाचा वेग, अश्रुतपूर्व नवी वाक्ये बनविण्याचे लहान मुलांचे कसब आणि वेग, व्याकरणिक वाक्य आणि अव्याकरणिक वाक्य (अर्थात बरोबर वाक्य कोणते चूक कोणते) याची मुलांमध्ये निर्माण होणारी समज,मुले भाषा आत्मसात करीत असताना त्यांच्याकडून होणार्या चुकांतील व्यवस्था, या सार्या जटिल बाबी केवळ चेतक-प्रतिसाद आणि प्रबलन किंवा परिपोष या ढोबळ संकल्पनांच्या आधारे स्पष्ट करता येत नाहीत. भाषा आत्मसात होत असताना केवळ नक्कल करून, अनुकरण करून भाषेची समज निर्माण होत नसते तर त्या भाषिक ऐवजाला ठोस असे जनुकीय आणि जैविक अधिष्ठान असते. भाषेचे स्वरूप आणि व्यक्तिगत विकास हा जनुकीय-जैविक व्यवस्थेचा भाग असतो.
भाषा नावाची एक स्वतंत्र क्षमता, एक स्वतंत्र अंग मानवी मेंदूत कल्पिणे हे मनोवादी भूमिकेचे महत्त्वाचे गृहीतक आहे. म्हणजे संवेदना आणि इतर ज्ञानेन्द्रियांद्वारे आपल्याला संवेदना होत असतात आणि त्यामागे मेंदूत स्वतंत्र क्षमता कार्यरत असतात. उदा. ऐकणे, बघणे, वास घेणे इ. स्वतंत्र क्षमता म्हणून अभ्यासल्या जातात. तद्वतच भाषिक आकलन हाताळणारी स्वतंत्र क्षमता असते ; कारण भाषा नामक हे घटित व्यामिश्र स्वरूपाचे असते आणि इतर ज्ञानक्षमतांपेक्षा भाषिक क्षमता वेगळी आणि खूपच गुंतागुंतीची असते अशी कल्पनादेखील मनोवादी भूमिकेचे गाभ्याशी आहे. याला विरोध करत भाषिक क्षमता स्वतंत्र नसून इतर ज्ञान क्षमतांच्या समन्वयातून ती विकसित होत असते अशी भूमिका घेतली जाते आणि चॉम्स्कीप्रणीत मनोवादाच्या विरुद्ध पुरावा, सिद्धान्तन तेथे केले जाते. या अभ्यास प्रकारास ज्ञानात्मकतावादी भाषाविज्ञान असे संबोधले जाते. रोनाल्ड लँगाकर, स्टिव्हन पिंकर इ. मंडळी या भूमिकेचे समर्थक आहेत. मनोवादात अनेक गृहीत पक्ष स्वीकारलेले आहेत. यात भाषा जन्मजातच जैविक-जनुकीयरीत्या मानवी अर्भकांस प्राप्त असते आणि योग्य ते भाषिक पर्यावरण प्राप्त झाले असता भाषासंपादन सुरू होत असते याला उपजततेचा गृहीत पक्ष म्हटले जाते. तसेच जन्मानंतर काही विशिष्ट काळातच हे संपादन सर्व शक्तीनिशी शक्य असते नंतर ते कठीण किंवा अशक्यही होत जाते याला निर्णायक काळाचा गृहीत पक्ष असे संबोधले जाते. हा गृहीत पक्ष केवळ मानवांतील भाषिक क्षमतेपुरता मर्यादित नसून इतर प्राणी उदा. पक्षी. पक्ष्याने जन्मानंतर विशिष्ट काळात आपले गाणे (पक्षिसमाजात सामील होण्यासाठी आणि जीवनावश्यक धोक्याच्या सूचना इ. ध्वनिसंकेत) ऐकून आत्मसात न केल्यास त्याला सामान्य जीवनक्रम अनुसरता येत नाही, पक्षिसमाजात सामीलही होता येत नाही.
संदर्भ :
- Croft,William , Cruse,D. A. ,Cognitive Linguistics, CUP, Cambridge , 2004.
- Chomsky, Noam ,A Review of B. F. Skinner’s Verbal Behavior, Language, 1959.
- Skinner,B.F.,Verbal Behavior,Copley Publishing Group,US,1992.2.