अराबिडॉप्सीस थॅलियाना ही वनस्पती क्रुसिफेरी कुलातील आहे. बीज अंकुरल्यापासून ते पुढील बीजधारणेपर्यंत साधारणतः ६ -८ आठवडे जातात. या वनस्पतींचे रोप १०-४० सेंमी. उंच वाढते व त्याचा व्यास ५ सेंमी. पर्यंत असतो. सुरुवातीला अराबिडॉप्सीस थॅलियाना या वनस्पतीची पाने जमिनीलगत गोलाकार वाढतात व नंतर तिची उंची वाढायला सुरुवात होते. सरळ वाढलेल्या खोडावर थोडी पाने व फांद्या फुटून फुले येतात. या वनस्पतीचे आयुष्य कमी कालावधीत पूर्ण होत असल्याने प्रयोगशाळेत संशोधन करण्यासाठी ती योग्य समजली जाते. तिची प्रयोगशाळेत योग्य ती निगा राखून तिच्यावर विविध प्रयोग करण्यात आले आहेत.

वनस्पतिशास्त्रामध्ये बीजापासून सुरू होणाऱ्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी ही एक आदर्श वनस्पती आहे. विशेषकरून वाढीचा जनुकीय संदर्भ जाणून घेण्यासाठी बरेच संशोधन तिच्यावर झाले आहे. तिच्यात ५ गुणसूत्रे  व २५,५०० जनुके आहेत.कोणते प्रथिन वा विकर वनस्पतीच्या वाढीच्या कुठल्या टप्प्यावर कार्यरत असते, हे तिचा अभ्यास केल्यानंतर समजते. बीज अंकुरण्यापासून त्यात होणारे बदल, मुळे, पाने व फुलांची वाढ यांना कशामुळे पूर्णत्व येते, हे समजण्याकरिता या वनस्पतीच्या जनुकांमध्ये बदल घडवून होणाऱ्या परिणामांचा व बदलांचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला आहे.

संदर्भ :

  • http://www.mun.ca/
  • Principles of Development L. Wolpert, R. Beddington, J. Brockes, T. Jesell and P. Lawrence.

समीक्षक – बाळ फोंडके

प्रतिक्रिया व्यक्त करा