फ्रेरर, पॉलो : (१५ सप्टेंबर १९२१—२ मे १९९७). प्रसिद्ध ब्राझीलियन अध्यापनशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म ब्राझीलच्या उत्तर पूर्व भागात एका सामान्य कुटुंबात झाला. अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले. प्राथमिक शाळेमध्ये त्यांना नोकरी मिळाली. त्यांनी अध्यापनाची संवादात्मक शैली विकसित केली. विद्यार्थ्यांच्या जीवनाशी समरस होऊन त्यांच्याशी संवाद साधत ते विद्यार्थ्यांना शिकवत असत. पार्नांबूको प्रांतातील रेसिफे येथे कायद्याचे शिक्षक असताना त्यांचा परिचय एल्झा (Elze D’Costa De Oliveira) ह्या प्राथमिक शाळा शिक्षिकेशी झाला. त्याची परिणती प्रेमविवाहात झाली (१९४४). एल्झा म्हणजे फ्रेरर यांच्या जीवनातील एक निरंतर स्फूर्तिस्थान होते. त्यांना पाच अपत्ये झाली. त्यांतील तीन मुले अध्यापन क्षेत्रात चमकली. एल्झाने फ्रेरर यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. तसेच आधुनिक शिक्षण जगतात ज्याला क्रांती समजण्यात येते, ती ‘संवादात्मक शिक्षणपध्दती’ विकसित करण्यातसुद्धा एल्झाचा सिंहाचा वाटा होता.
केवळ कामगारांच्या शिक्षणासाठी निर्माण झालेल्या ‘सेसी’ (SESI, ब्राझील) या संस्थेमध्ये फ्रेरर यांची १९४६ साली संचालक म्हणून नियुक्ती झाली. संस्थेच्या कामाचा भर प्रामुख्याने पौढ शिक्षणावर होता. येथे त्यांची शैक्षणिक तत्त्वज्ञ म्हणून वाटचाल सुरू झाली. फ्रेरर यांना या संस्थेत कामगारांच्या परिस्थितीची तसेच त्यांचे एकूण जीवन व ते शिकत असलेल्या अभ्यासक्रम यातील दरीची प्रकर्षाने जाणीव झाली व ही दरी भरून काढण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम कामगारांच्या बोलीभाषेचा अभ्यास करायला सुरुवात केली. याच सुमारास फ्रेरर लोकसंस्कृती जागरण चळवळीमध्ये सहभागी झाले. त्यांनी भाषण, लिखाण व कृती यांद्वारे लोकशाही मूल्यांचा पुरस्कार केला. या त्यांच्या कामावर आधारित त्यांनी १९५९ साली पीएच.डी. प्रबंध सादर केला, ज्याचे शीर्षक ‘ब्राझीलमधील विद्यमान शिक्षण’ असे होते. फ्रेरर यांनी अतिशय निर्भीडपणे तत्कालीन ब्राझीलियन समाजाचे व शिक्षण व्यवस्थेचे (वा दुरावस्थेचे) परखड विश्लेषण आपल्या या प्रबंधात मांडले. नेमके यामुळेच तत्कालीन तथाकथित सरकार त्यांना देशद्रोही समजू लागले.
ब्राझीलमधील राजकीय अस्थिरता व लष्करी हस्तक्षेप यांमुळे फ्रेरर यांना त्यांचे शैक्षणिक प्रयोग बंद करावे लागले. एवढेच नव्हे, तर जून १९६४ मध्ये त्यांना कैद करून हद्दपार केले गेले. काही दिवस बोलिव्हियामध्ये राहून पुढे ते चिली येथे पाच वर्ष अँग्रेरियन लोकशाही समाजसुधारण चळवळीमध्ये कार्यरत राहिले. पंधरा वर्षांनी ते मायदेशी परतले. तेव्हा त्यांनी वर्कर्स पार्टी (PT) मध्ये सहभाग घेतला (१९८०). साऊँ पाउलू शहरात त्यांनी प्रौढ साक्षरता कार्यक्रमाचे पर्यवेक्षक म्हणून काम केले. वर्कर्स पार्टी सत्तेवर आल्यानंतर त्यांची साऊँ पाउलू शहराचे शिक्षणमंत्री म्हणून नेमणूक झाली.
प्रौढ शिक्षणातील प्रयोग व त्यांनी कार्यवाहीत आणलेली शैक्षणिक धोरणे जगभर प्रसिद्ध असून त्यांचे जतन ब्राझीलच्या पुराभिलेखागारात केले आहे (१९९१). आज त्यांच्या नावाने १९९१ साली उभारलेल्या संस्थेमध्ये त्यांचे अनेक वैयक्तिक ठेवे जतन करून ठेवले आहेत. तसेच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जवळजवळ १८ निरनिराळ्या देशांमधून एकत्र आलेल्या २१ अभ्यासकांनी त्यांच्या अध्यापनशास्त्राचे विशेष मंथन करून एक अमूल्य असा ज्ञानठेवा संपूर्ण जगासाठी व प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रासाठी निर्माण करून ठेवला आहे. १९८५ साली त्यांची पत्नी एल्झा हिचा मृत्यू झाला. नंतर त्यांनी १९८६ साली ॲना मारियाशी विवाह केला. ॲनाचे त्यांना त्यांच्या कार्यात सहकार्य लाभले. हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ७५ व्या वर्षी साऊँ पाउलू येथे त्यांचा मृत्यू झाला.
त्यांनी विपुल ग्रंथलेखन व स्फूटलेखन केले. त्यांच्या ग्रंथांपैकी एज्युकेशन ॲज द प्रॅक्टिस ऑफ फ्रीडम (१९६७), पेडगॉगी ऑफ द ऑप्रेसड (१९६७), कल्चरल ॲक्शन फॉर फ्रीडम (१९७०) इत्यादी ग्रंथ प्रसिद्ध आहेत. जागतिक चर्च संघटनेचे जीनिव्हात विशेष सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले (१९७१). फ्रेरर जगभर प्रवास करून त्यांच्या शैक्षणिक प्रयोगांबद्दल लोकांना सांगत राहिले. ‘जीनिव्हा बसाऊ’ ह्या पश्चिम आफ्रिकन राष्ट्राच्या राष्ट्रीय साक्षरता उपक्रमात त्यांनी लक्षणीय योगदान दिले.
१) विचार, २) संवाद, ३) कृतिशीलता ही त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाची त्रिसूत्री होती. त्यांनी प्रसंगोपात केलेल्या कृतिशील शैक्षणिक विश्लेषणामधून त्यांचे अध्यापनशास्त्र विकसित झाले.
शिक्षणाची व्याख्या : निव्वळ शब्द वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर जग वाचता येणे म्हणजे खरे शिक्षण होय. अर्थात, ज्या शिक्षणामुळे व्यक्तीच्या समीक्षणात्मक जाणिवेचा विकास घडून येतो, तेच खरे शिक्षण विद्यार्थ्यांची समाजाविषयीची तसेच स्वत:विषयीची जाणीव अधिक प्रखर व प्रगल्भ करणे म्हणजे शिक्षण होय.
फ्रेरर यांच्या ज्ञानविषयक मताला ब्राझीलमधील नवोदित लोकशाहीचा एक निश्चित असा आयाम आहे व त्यामुळेच ज्ञान वा शिक्षण हे लोकशाही मूल्यांशी, लोकशाही प्रक्रियांशी निगडित आहे. लोकशाहीमध्ये मूलभूत अशा समानतेच्या तत्त्वाला ते आव्हान देतात. त्यांच्या मते लोकशाहीमध्ये खरोखर समान संधी असते का? तकलादू लोकशाहीमध्ये प्रभावी समाजगटांची शिक्षणामध्ये कशी मक्तेदारी निर्माण होते, हे गट शिक्षण व लोकशाही प्रक्रियांवर नकारात्मक प्रभाव कसा टाकतात, हे पाहणे गरजेचे असते. हे नकारात्मक प्रभाव नाकारून नवीन लोकशाही मूल्ये राबविणे, हे शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट आहे.
अर्थपूर्ण शिक्षणाची प्रक्रिया : ह्या प्रश्नाचे उत्तर ते माणसाचे इतर प्राणिसृष्टीपेक्षा असलेले निराळेपण आणि त्याची बलस्थाने यांचा शोध घेऊन तो अधिक चांगला होण्यासाठी झटणे, झटता येणे यालाच माणूसपण म्हणता येईल, असा सिद्धान्त मांडतात. माणूस स्वतःचे भविष्य स्वतःच्या अर्थपूर्ण, स्वातंत्र्याधिष्ठित कृतीद्वारे घडवू शकतो, हे त्याचे निराळेपण आहे.
शिक्षण पद्धती : अशा प्रकारच्या साक्षेपी जाणिवांची वृद्धी केवळ विवेकाधिष्ठित संवादात्मक शिक्षणपद्धती मधून साधता येते. संवाद प्रामुख्याने प्रेम, नम्रता व श्रद्धा यांवर आधारित असतो. त्यात माणूस बदलण्याचे सामर्थ्य असते. फ्रेरर यांनी विकसित केलेली ही शिक्षणपद्धती, हे त्यांचे शिक्षणशास्त्रातील सर्वांत मोठे योगदान होय. यथायोग्य शिक्षणपद्धतीचा ऊहापोह करताना फ्रेरर मोठ्या मार्मिक प्रतिमेची व तुलनेची योजना करतात. त्यांच्या मते, सरधोपट शिक्षण (जे आजही दुर्देवाने पसरलेले दिसते) हे पतपेढी (Banking) या संकल्पनेवर आधारित आहे. पतपेढीमध्ये ज्याप्रमाणे पैशाच्या ठेवी ठेवल्या जातात, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मेंदूत शिक्षक माहितीच्या ठेवी ठेवतात. जसे पेढीतून पैसे काढले जातात, तसे परीक्षेच्या वेळेस विद्यार्थी माहिती बाहेर काढून विसरून जातात. नेमके याच्या विरोधी शिक्षणपद्धती म्हणजे ‘Critical’ अथवा साक्षेपी शिक्षणपद्धती आहे. ज्यामध्ये ‘संवाद’ हे देवाणघेवाणीचे प्रमुख माध्यम असते. ज्यामध्ये ‘ज्ञान’ ही ठेवीसारखी वस्तू नसून एकमेकांशी केलेल्या संवादामधून निर्माण होणारी एक सूक्ष्म तरल अशी गोष्ट आहे. जी साहजिकच मनुष्याला निर्भर बनवून अर्थपूर्ण कृतिसाठी उद्युक्त करते.
व्यवहाराच्या पातळीवर शिक्षणाचे स्वरूप : खरे शिक्षण हे व्यवहाराच्या पातळीवर घडून येत असते. त्याला व्यावहारिकतेत पक्का संदर्भ असतो. फ्रेरर म्हणतात ‘मनुष्य’ असण्याचा आवाका ओळखणे व मनुष्यतत्त्वाबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या पेलणे म्हणजे शिक्षण. ह्या जबाबदाऱ्या नेमक्या कोणत्या व त्या कशा पार पाडायच्या याकरिता फ्रेरर ‘स्वविश्व’ ह्या संकल्पनेचा वापर करतात. हे ‘स्वविश्व’ व्यक्तिच्या स्वातंत्र्याला त्याच्या विश्वासार्ह आविष्कारांना किती वाव देते, ते वारंवार तपासून पाहणे, ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे, असे ते मानतात. म्हणजेच व्यावहारिक कक्षेत मानवी व्यवहारांविषयी, स्वत:च्या स्वातंत्र हक्कांविषयी जागरूक राहणे, म्हणजेच आपल्या मनुष्यत्वाचा आवाका ओळखणे होय. ही एक सतत सुरू राहणारी प्रक्रिया आहे व ह्या प्रक्रियेचे दुसरे नाव शिक्षण असे आहे.
आपल्या भोवतालाबद्दल अनेक प्रकारे, अनेक प्रकारच्या पातळ्यांवर जागरूक होत जाण्यास फ्रेरर व्यक्तीचा विकास असे समजतात. ह्या भोवतालामध्ये किंवा मानवी विश्वामध्ये अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी समाविष्ट असतात किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ‘स्व चे विश्व’, हे विस्तारणारे असते. यातील सर्वात मोठे वर्तुळ असते ते संस्कृतीचे आपल्या संस्कृतीविषयी साकल्याने, विचार करून ज्यातील हिणकस असे काही त्याजून ‘सकस’ असे संचित पुढे नेण्याची जबाबदारी देखील ‘त्या’ त्या समाजातील माणसांची असते. व ह्या करताच व्यक्तींनी आपल्या चिंतनपूर्ण कृती स्वातंत्र्याचा पाठपुरावा करणे गरजेचे असते.
फ्रेरर यांनी अशा ‘Critical’ शिक्षणपद्धतीचे नेमके कोणते प्रारूप कसे विकसित केले हे जाणून घेणे आवश्यक ठरते. व्यावहारिक पातळीवर फ्रेरर यांच्या मते शिक्षणाची सुरुवात शिक्षक विद्यार्थ्यांच्या एकत्र येण्यातून, शिक्षकाने विद्यार्थ्यांबरोबर मिसळून जाण्यातून होते.
ह्या पुढची पायरी म्हणजे विद्यार्थ्यांच्या रोजच्या जीवनव्यवहारविषयी शिक्षकाने विदयार्थ्यांना बोलते करणे व त्यांच्या रोजच्या वापरात असणाऱ्या सहज अर्थवाही शब्दांची, वाक्यप्रचारांची सूची बनवणे व त्यांच्या भाषेतून शिक्षकाने विद्यार्थ्यांचा सामाजिक अवकाश समजून घेणे. ह्या पुढे जाऊन शिक्षकाने प्रस्थापित भाषा व विद्यार्थ्यांच्या सामाजिक व्यवहाराची भाषा यांच्या संकरातून काही नवीन शब्द वा संकल्पना तयार करणे व त्या संकल्पनांच्या अनुषंगाने अभ्यासवर्गात चर्चा व ऊहापोह करणे ह्या सर्व मंथनामधून नवीन सामजिक जाणीव व नवे विधायक असे सामाजिक वास्तव्य रचणे वा निर्माण करणे, ही शिक्षणाची केवळ फलश्रुती होय. फ्रेरर यांनी सिद्ध केलेल्या या शैक्षणिक पद्धतीचा पहिला दृश्य प्रयोग कृतीत आला (१९६२). त्यांच्या कृतिशील शिक्षणपद्धतीमुळे केवळ ४५ दिवसांत ३०० शेतमजूर लिहायला व वाचायला शिकले. ह्याची परिणती ब्राझील सरकारने देशभर हजारो प्रौढशिक्षण संस्कृती-मंडले स्थापन करण्यात झाली.
शिक्षण प्रक्रियेचे नेमके स्वरूप : शिक्षण ही एक राजकीय प्रक्रिया आहे. ती पूर्णत: लोकशाहीमूलक असणे गरजेचे असून शिक्षक आणि विद्यार्थी यांतील द्वैत नष्ट करून ही प्रक्रिया कृतीत आणणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांनी नम्र व सजग असणे गरजेचे आहे. तसेच त्यांना विद्यार्थ्यांविषयी निरपेक्ष जिव्हाळा व आदर असणे गरजेचे आहे.
संवाद : शिक्षणाच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये फ्रेरर यांनी संवादाला विशेष महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. तसेच फ्रेरर यांच्या शिक्षणशास्त्रांचा ‘गाभा’ म्हणजे संवाद प्रक्रिया. संवाद शब्दाद्वारे प्रकट होतो. खरा/सच्चा शब्द तो, जो खरा संवाद घडवून आणू शकतो. चिंतनपूर्ण शब्दसंवादाचे परिवर्तन वा प्रकटीकरण पुढे कृतीमध्ये घडून येते अशी कृती की, ज्यामध्ये जग सभोवताल चांगल्या प्रकारे बदलण्याचे सामर्थ्य असेल. अशा संवादाधिष्ठित चिंतनपूर्ण कृतीला फ्रेरर ‘Praxis’ असे म्हणतात.
मानवामानवामध्ये घडून येणाऱ्या ह्या संवादाचे काही मार्मिक विशेष फ्रेरर साकल्याने विशद करतात. हा संवाद मूलत: (Essentially) ‘प्रेम’, ‘नम्रता’ व ‘श्रद्धा’ यांवर आधारित असतो. ह्या संवादात माणसे बदलण्याचे, क्रांती घडवून आणण्याचे सामर्थ्य असते. आहे याहून अधिक ‘सकस’ अर्थपूर्ण जीवन जगण्यावर, आशेवर हा संवाद बेतलेला असतो. अशा संवादामधून पुढे सरकत जाते ते खरे शिक्षण.
लोकशाही प्रक्रिया अधिकाधिक सधन, अर्थपूर्ण व सखोल होत जाणे, हीच खरी शिक्षणाची फलश्रुती आहे. समाजामध्ये लोकशाही संस्कृती रुजणे हे शिक्षणाचे ध्येय आहे. ह्या संस्कृतीमधील सर्वांत महत्त्वाचे मूल्य म्हणजे समानता व परस्पर सहिष्णुता, धार्मिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, वैचारिक सर्व बाबतींत सहिष्णू समाज निर्माण करणे हेच शिक्षणाचे फलित असणे अनिवार्य आहे.
फ्रेरर यांची ‘संवादात्म शिक्षण पद्धती’ तसेच समाजजागृती व कृतिशीलतेवरचा भर निश्चितच स्पृहणीय आहे. परंतु अनौपचारिक शिक्षणात हे अधिक फलदायी ठरू शकते. औपचारिक शिक्षण पद्धतीत कदाचित नाही.
संदर्भ :
- Freire, Paulo, Cultural Acton for Freedom, U.S. 1972.
- Freire, Paulo, Trans. Ramos, Myra Bergman, Pedagogy of the Oppressed, New York, 1972.
समीक्षक – श्रीनिवास हेमाडे
Paulo Freire विषयी मराठीत इतकी चान माहिती मिळणे दुर्मिळच आहे…. धन्यवाद