अलेक्झांडर, सॅम्युएल : ( ६ जानेवारी १८५९—१३ सप्टेंबर १९३८ ). इंग्रज तत्त्वज्ञ. नववास्तववादी तत्त्वमीमांसेचा प्रणेता. ऑस्ट्रेलियातील सिडनी (न्यू साउथ वेल्स) येथे जन्म. वेस्ली कॉलेज, मेलबर्न येथे त्याचे शिक्षण झाले. ऑक्सफर्ड येथे गणित, प्राचीन भाषा व तत्त्वज्ञान यांचा अभ्यास केला. १८८९ मध्ये लिकंन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे फेलो म्हणून त्याची निवड झाली. पुढे जर्मनीमध्ये म्यून्स्टरबेर्कच्या मनोवैज्ञानिक प्रयोगशाळेत एक वर्ष घालविले. यानंतर मँचेस्टरमध्ये प्राध्यापक झाला व निवृत्त होईपर्यंत तो तेथेच होता. १९३० मध्ये त्याला ‘ऑर्डर आफॅ मेरिट’ हा किताब मिळाला. त्याचे प्रमुख ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत : मॉरल ऑर्डर अँड प्रोग्रेस (१८८९), लॉक (१९०८), स्पेस, टाइम अँड डिइटी (दोन खंडांत; १९२०), ब्यूटी अँड द अदर फॉर्म्स ऑफ व्हॅल्यू (१९३३), फिलॉसॉफिकल अँड लिटररी पीसेस (१९३९) इत्यादी. अलेक्झांडरने आपले तत्त्वज्ञान गिफर्ड व्याख्यानातून मांडले असून ते स्पेस, टाइम आणि डिइटी या ग्रंथात प्रसिद्ध केले आहे.

सत्ताशास्त्र : अलेक्झांडरचे सत्ताशास्त्र निसर्गवादी आहे; पण भौतिकवादी नाही. त्याचे सत्ताशास्त्र दिक्कालाच्या भक्कम पायावर आधारलेले आहे. चिद्वादात परमसतला जे स्थान आहे तितकेच महत्त्वाचे स्थान अलेक्झांडरच्या तत्त्वज्ञानात दिक् आणि काल यांना आहे. त्याच्या मतानुसार दिक् आणि काल ही आद्य द्रव्ये आहेत. ती विश्वातील सर्व वस्तूंचे आणि घटनांचे आधारद्रव्य असून जगातील सर्व सान्त वस्तूंची निर्माती आहेत. विश्वातील सर्व वस्तू व घटना या आद्यद्रव्याचे प्रभेदित आविष्कार आहेत. त्याच्या मते दिक्काल ही एक गति-प्रणाली आहे. दिक्काल हेच आदिद्रव्य आहे, आणि त्याच्यातूनच सर्व विश्वाची उत्पत्ती झालेली आहे. तो म्हणतो की, दिक् त्रिमितीय आहे; कारण काल अनुक्रमिक, अप्रत्यावर्ती आणि एकविध आहे. विश्वातील सर्व वस्तूंची घडण दिक् व काल यांच्यापासून झालेली आहे. त्यांना फक्त मनाने कृत्रिम रीतीने एकमेकांपासून अलग करता येते. दिक्काल ही दोन्ही मिळून एकच वस्तू घडवितात आणि तिचा एकमेव गुणधर्म गती आहे.

दिक्काल गुणरहित असले, तरी गतिमानता हा त्याचा एकच गुण सांगता येईल. दिक्काल या मानसिक संकल्पना नसून वास्तविक विश्वाचा आधार आहेत. ते परस्पर अवलंबित आहेत व अवियोज्य आहेत. कालाचा व्याप्त वस्तूंशी संबंध नसता, तर कालक्रमाची कल्पना असंभवनीय ठरते. तसेच वस्तूचे अस्तित्व कालनिरपेक्ष असते, तर तिच्या भूत, वर्तमान व भविष्य काळांबद्दल विचार करणे अशक्य झाले असते. कालाची गतिमानताच वस्तूमध्ये परिवर्तन घडवून आणते व नवीन घटना निर्माण करते. या अव्यवहित गतिमान घटनेचे आकलन करून घेताना मन कुठलीही एखादी घटना आधार धरून त्यानुसार भूत व भविष्य घटना ठरविते. यालाच अलेक्झांडर ‘पर्स्पेक्टिव्ह’ किंवा ‘विशिष्ट स्थलकालांतून घटनेचे अवलोकन’ असे म्हणतो. अलेक्झांडर हेराक्लायटसप्रमाणे संभवन आणि गतिमानता यांना अंतिम अस्तित्व आहे, असे मानतो.

उद्गामी विकास : अलेक्झांडरच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे उद्गम, उत्क्रांती वा नवनिर्मिती हे अंतिम तत्त्व आहे. त्याच्या मते आपल्या सर्व अनुभवसंवेद्य जगाचा उगम दिक्कालाच्या आद्यद्रव्यातून होतो आणि त्याची मुळे दिक्कालाच्या अत्यंत अगाध अशा गर्तेत रुजलेली आहेत. जगातील उद्गमी गुणधर्म आणि अभिकल्प बाजूला केले, तर खाली फक्त दिक्कालाचे मूलद्रव्य उरते. दिक्काल हे सर्वगत, सर्व निविष्ट, सातत्यक आहे किंवा दिक्काल गुणयुक्त शुद्ध गतीचे द्रव्य असते. सर्वांत खालच्या पातळीवर वसणारे ही शुद्ध गुणविहीण गती असते. या शुद्ध गतीपासून द्रव्यपूरित गतिशीलता निर्माण होते, आणि वरच्या विकसित पातळीवर यांत्रिक स्वरूपाचे जड द्रव्य तयार होते. ते परमाणू, अणू, विद्युदणू यांचे स्वरूप घेते. या पातळीवर इंद्रियसंवेद्य जगाची उत्पत्ती होताना दिसते.

त्यांतून पुढे उद्भवणारी घटना जीव होय. त्याची जाणीव स्नायूंची हालचाल, भूक, तहान इत्यादी अनुभवांतून होते. जीवधारी शरीराची पुनर्रचना ‘मन’ निर्माण करते. मन इतर वस्तूंचे ज्ञान इंद्रियांमार्फत करू शकते. पण स्वतःबद्दल केवळ ‘सुखानुभव’च प्राप्त करू शकते. मनाच्या नंतरची संभवनीय घटना देवता आहे, असे तो मानतो. आतापर्यंत ही घटना पृथ्वीतलावर निर्माण झाली नसल्याचे व ती मानवी विकासाची पुढील अवस्था असल्याचे, तो निवेदन करतो.

नियमबद्धता व नवीन उद्भवणाऱ्या गुणांची अतर्क्यता ही दोन्ही सत्ये आहेत. स्थलकाल हे द्विमुख पण एकात्मक तत्त्व जगाच्या बुडाशी आहे. ‘स्थलाप्रमाणेच काल हादेखील द्रव्याचा गुणधर्म आहे, असे स्पिनोझाने मानले असते, तर त्याच्या व माझ्या तत्त्वज्ञानात काही फरक राहिला नसता’, असे अलेक्झांडरचे म्हणणे होते. जडता, दुय्यम गुण, जीव व मन हे सर्व स्थलकालांतून उद्गम पावलेले आहेत. अलेक्झांडर या उपपत्तीत उक्रांतिसिद्धांतात महत्त्वाचे समजले जाणारे सातत्याचे तत्त्व टिकवून ठेवतो. या बाबतीत नावीन्याचे उपपादन करताना अलेक्झांडर स्पेन्सरच्या निसर्गवादी दृष्टिकोनाचा अवलंब करताना दिसतो.

जाणीव व मन : अलेक्झांडरच्या मते जाणीव निर्माण होण्यासाठी सेंद्रिय शरीराला मज्जासंस्था व तिचे कार्य आवश्यक ठरते. मज्जासंस्थेची प्रत्येक क्रिया जाणिवेची निर्मिती करीत नसते; परंतु मज्जासंस्थेला जेव्हा जाणीव निर्माण होते, तेव्हा मन तयार होते. मात्र काही मज्जासंस्थांना आणि फक्त काही वेळा जाणीव होते. जाणीव ही मज्जासंस्थेला निरीक्षणाच्या मागे आपल्याहून भिन्न व स्वतंत्र असलेल्या जगाचे होणारे भान किंवा अभिज्ञा आणि ज्ञान असते. मज्जासंस्थेतच जाणिवेच्या शक्तीचा उद्गम होतो. ज्यात ज्ञाता व ज्ञेय असे द्वैत असते. असे बाह्य वस्तूंचे ज्ञान व ज्यात असे द्वैत नसते, अशी आंतरिक अनुभूती अशी दोन प्रकारची ज्ञाने आहेत.

देवता : अलेक्झांडरच्या मते मानवी मनाच्याही पलीकडे विकास घडविणारी प्रेरक अंतःप्रवृत्ती विश्वात कार्य करीत असते आणि ती अप्रतिहतपणे पुढे जात राहणारच. ती उद्गमनाची प्रक्रिया सतत पुढे चालू ठेवणारच. विश्वात अविरतपणे आणि अप्रतिहतपणे कार्य करणारी ही अतःप्रवृत्ती जी पुढची उच्च पातळी गाठील, ती देवतेची असेल. ती सध्याच्या मानवी मनाची वरची अवस्था असेल. देवतेचे गुणधर्म नेमके कोणते असतील, हे आपल्या निम्न श्रेणीवर विचार करणाऱ्या मनाला सहजपणे समजणे कठीण आहे. देवतेची पातळी म्हणजे दिव्यत्वाचे गुणधर्म असतील आणि ते ईश्वरामध्ये व्यक्त झालेले पाहावयास मिळतील. दिव्यत्व असलेली व्यक्ती सान्त किंवा अनन्त असू शकेल, जरी त्याचे शरीर दिक्कालाने बद्ध व मर्यादित असेल, तर तो एखाद्या देवासारखा असेल. जर दिक्कालाच्या विश्वाएवढे त्याचे शरीर असेल, तर तो अनन्त असेल.

जीवाच्या अपेक्षेने मन हे दैवतस्वरूप आहे. मनोयुक्त तत्त्वांच्या ठायी अधिक उच्च गुणांच्या निर्मितीची प्रकृती असते. अशा तत्त्वांच्या लेखी हे उच्च तत्त्व म्हणजेच दैवत होय. मानवाच्या दृष्टीने असे दैवत अजून उद्भवले नाही; पण मानवाच्या ठायी त्याच्या उद्भवाची प्रवृत्ती आहे. एका विशिष्ट स्तरानंतर उद्भवणारे तत्त्व हे त्या स्तराच्या लेखी दैवतस्वरूप मानावे.

ज्ञान : अलेक्झांडर ज्ञानाचे दोन प्रकार करतो. ते म्हणजे आस्वाद किंवा उपभोग आणि चिंतन, हे होत. मनाला स्वतःशी प्रत्यक्ष होणारी जाणीव म्हणजे उपभोग किंवा आस्वाद. या अनुभवात मन स्वतःच स्वतःच्या कृतीमधून जगत असते. चिंतनात मात्र मनाला आपल्याहून भिन्न असलेल्या वस्तूचे किंवा विषयाचे आकलन होत असते. म्हणजे मन स्वतःच स्वतःचा उपभोग घेत असते आणि आपल्या विषयांचे चिंतन करीत असते. उपभोग हा आत्ममनाचा इतर कशात रूपांतरित न होऊ शकणारा अंतिम प्रकार असतो. मन हे स्वतः स्वतःच असल्यामुळे स्वतःचा उपभोग घेण्याची त्याच्या ठिकाणी कुवत किंवा ताकद असते, असे अलेक्झांडरचे मानतो. याउलट, चिंतन हे उपभोगक्रिया आणि चिंतनविषय यांना एकत्रित आणणारा किंवा जोडणारा संबंध असते.

मूल्ये : १८८९ साली त्याने प्रसिद्ध केलेल्या मॉरल, ऑर्डर अँड प्रोग्रेस : ॲन ॲनॅलिसिस ऑफ एथिकल कन्सेप्शन  या ग्रंथांत त्याने श्रेय व अश्रेय आणि युक्त व अयुक्त यांची चर्चा केली आहे. त्याच्या ‘ब्यूटी अँड द अदर फॉर्म्स ऑफ व्हॅल्यू’ या निबंध संग्रहात तो सत्य, शिव व सुंदर ही मूल्ये तृतीय श्रेणीची असल्याचे निवेदन करतो. प्राथमिक व दुय्यम गुण वस्तुनिष्ठ असतात, पण मूल्ये ही मानव व वस्तू यांच्या परस्पर संबंधांतून ठरविली जातात. सत्तेचे आकलन, गुणग्रहण, उपयोग करण्याच्या म्हणजे मूल्यमापन करण्याच्या मनाच्या क्रियेतून मूल्यजाणिवेचा उद्य होतो. त्यांना सत्तेचे गुणधर्म न म्हणता मूल्ये म्हणतात. जेव्हा मूल्यांना ‘सामूहिक एकवाक्यता’ प्राप्त होते, तेव्हा त्यांच्यातील व्यक्तिनिष्ठतेचे प्रमाण कमी होऊन त्यांना अधिक प्रमाणात वस्तुनिष्ठता प्राप्त होऊ लागते. अलेक्झांडरच्या मते व्यक्तिनिष्ठप्रमाणेच सामाजिकता हे मूल्यांचे मूलभूत लक्षण असते. त्याच्या दृष्टीने सत्य हे समग्र सत्तेचे प्रतिरूपण करते, शिवत्व हे सान्त अस्तित्वाचे सर्वोच्च प्रकटीकरण असते आणि सौंदर्य त्या दोघांच्या दरम्यान असते. कारण सौदर्यग्राही वृत्ती सैद्धांतिक वृत्तीप्रमाणे सत्तेशी अनुसंधान बांधत नाही किंवा नीती अपेक्षा करते त्याप्रमाणे बाह्य जीवन बदलण्याचा व सुधारण्याचा तिचा हेतू नसतो, पण त्या दोन्ही वृत्तींचा सौंदर्यात्मक रीतीने समन्वय घडविते.

मूल्यांचा संबंध प्रेरणांच्या तृप्तीशी आहे. मूल्य हा तृतीय प्रकारचा गुण आहे व तो निर्माण होण्यास परिणावादी प्राथमिक व रंगादी दुय्यम गुणांबरोबरच रसिक मनाचीही आवश्यकता आहे. सौदर्यनिर्मिती व सौंदर्यभोग काहीतरी रचना करण्याच्या प्रवृत्तीतून उद्भवले आहेत. निरनिराळ्या व्यक्तींच्या इच्छाप्रेरणादिकांमध्ये सुसंवाद निर्माण करण्याच्या आंतरिक ऊर्मीमधून नैतिकतेचा जन्म झाला.

सुखवाद : अलेक्झांडरचा उत्क्रांतिवादी सुखवाद हा जवळजवळ लेस्ली स्टीफनच्याच उत्क्रांतिवादी सुखवादासारखा आहे. त्याच्या मते सामाजिक सुस्थितीचे संतुलन हे नैतिक जीवनाचे सर्वोच्च मूल्य होय. त्याला अलेक्झांडर म्हणतो की, कोणत्याही घटनेचे स्पष्टीकरण उत्क्रांतीच्या नैसर्गिक प्रक्रियेवरून केले जाऊ शकत नाही. त्या स्पष्टीकरणाकरिता ती घटना ज्या ध्येयाच्या किंवा आदर्शांच्या अभिव्यक्तीकरिता घडलेली असते. त्या ध्येयाची आवश्यकता असते. याचा अर्थ असा की, घटनेचे मूल्य वा स्पष्टीकरण घटनेच्या मुळावरून न करता ध्येयावरून करणे आवश्यक ठरते. म्हणजे घटनेचे मूळ नव्हे, तर घटनेचे ध्येय हे स्पष्टीकरणाचे खरे तत्त्व आहे.

अलेक्झांडरचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्याने ‘नैसर्गिक निवड’ या उत्क्रांतीच्या तत्त्वाचा नीतिशास्त्रात केलेला अर्थ व वापर होय. तो म्हणतो नैसर्गिक निवड या तत्त्वाचा नैतिक जगात वेगळा अर्थ करावा लागतो. नैतिक जगात सबलांकडून दुर्बलांचा नाश केला जात नाही, तर प्रयत्न व शिक्षण या साधनांद्वारा निम्नितर ध्येयाचे उच्च ध्येयामध्ये रूपांतर करण्यात येते, त्यांचे उदात्तीकरण करण्यात येते. म्हणजे उच्च ध्येय निम्नितर ध्येयावर विजय मिळवीत असतात. यालाच अलेक्झांडरने नैतिक जगातील नैसर्गिक निवड, असे म्हटले आहे. यावरून जीवशास्त्रीय जग व नीतिशास्त्रीय जग ही दोन क्षेत्रे पूर्णतः भिन्न असून त्यांच्या क्षेत्रात निर्णायक ठरलेली तत्त्वे किंवा नियमसुद्धा पुष्कळ अंशीच नव्हे, तर सर्वथा भिन्न आहेत, ही गोष्ट अलेक्झांडरला पूर्णतः पटलेली होती, हे सिद्ध होते.

अलेक्झांडरचे तत्त्वज्ञान प्राचीन तत्त्वज्ञानाप्रमाणे परिकल्पनेच्या स्वरूपाचे आहे. जगाचे स्वरूप कसे आहे, ते उत्पन्न कसे झाले इत्यादी प्रश्नांचा निकाल केवळ तर्काच्या आधारे लागू शकतो, अशी प्राचीन तत्त्वज्ञांची समजूत होती. अलेक्झांडरने याच प्रकारचे तर्क केले आहेत, असे दिसते. हे तर्क खरे की खोटे हे तपासून कसे पाहावे, हे सांगता येणार नाही. दैवत म्हणजे पुढे उत्पन्न होऊ घातलेले उच्च तत्त्व, अशी स्वच्छंदी व्याख्या करून काही साधता येणार नाही. उच्च तत्त्वांच्या निर्मितीची सोय नियतीतच आहे, असे मानण्यास काहीही आधार नाही.

मँचेस्टर, इंग्लंड येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ :

                                                                                                                                                                        समीक्षक : संगीता पांडे