पैशाची भाषेतील कोणताही ग्रंथ आज उपलब्ध नाही. पैशाची प्राकृतमधला सर्वांत जुना व पहिला ग्रंथ म्हणजे प्राकृतसाहित्याच्या सुरुवातीच्या काळातील गुणाढ्याचा इ. स. पहिल्या-दुसऱ्या शतकांतील बृहत्कथा (बड्डकहा) होय.हा ग्रंथ आज उपलब्ध नाही; पण त्या आधारे संघदासगणीकृत वसुदेवहिण्डी आणि धर्मसेनगणिमहत्तरकृत वसुदेवहिंडी मज्झिमखंड सारखा प्राकृत ग्रंथ व संस्कृतमधील बुधस्वामीकृत बृहत्कताश्लोकसंग्रह, क्षेमेंद्रकृत बृहत्कथामंजरी तसेच सोमदेवकृत कथासरित्सागर हे ग्रंथ रचले गेले असे मानले जाते.कथासरित्सागर हा कथासंग्रह बड्डकहाच्या आधारे रचला गेल्याचे विद्वान मानतात.आजच्या काळात पैशाची प्राकृतमधील एकही स्वतंत्र साहित्यकृती उपलब्ध नाही.अन्य प्राकृत भाषांतील काही ग्रंथांतून पैशाची भाषेची उदाहरणे/नमुने आढळतात. उदा. उद्योतनसूरींनी आपल्या कुवलयमाला ग्रंथामध्ये, जयसिंहसूरींनी धर्मोपदेशमाला-विवरणामध्ये इतर प्राकृत भाषांसोबत पैशाची-प्राकृतचाही वापर केला आहे. आचार्य हेमचंद्रांच्या कुमारपालचारियं आणि काव्यानुशासन या ग्रंथांमध्ये पैशाची भाषेची उदाहरणे आढळतात. श्रीइंद्रहंसगणींच्या भुवणभाणुकेवलिचरियं, धनंजयाचे दशरूपक यांसारख्या ग्रंथांमध्ये तसेच तेराव्या शतकात रचिल्या गेलेल्या हम्मीरमदमर्दन आणि मोहराजपराजय ह्या संस्कृत नाटकांतील काही पात्रे एकप्रकारची पैशाची भाषा वापरतात.
भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये पैशाची भाषेचा उल्लेख दिसून येत नाही; परंतु त्यानंतरच्या रुद्रट, केशवमिश्र इ. संस्कृत अलंकारशास्त्रकारांनी या भाषेचा उल्लेख केला आहे. वाग्भटाने तसेच केशवमिश्राने अनुक्रमे भूत आणि पिशाचांसारख्या पात्रांसाठी तसेच षड्भाषाचन्द्रिकाकाराने राक्षस, पिशाच आणि नीच पात्रांसाटी या भाषेचा वापर करावा असे सांगितले आहे. याशिवाय प्राकृतातील सर्व वैयाकरणांनी मूल बड्डकहाच्या (संस्कृत रूप बृहत्कथेच्या) भाषेला प्राकृतची उपभाषा मानले आहे. तसेच ध्वन्यात्मक आणि रूपशास्त्रीय वैशिष्यांसह तिचे स्वरूप विषद केले आहे. प्राकृत व्याकरणाच्या ग्रंथांमध्ये जसे की वररुचींचा प्राकृतप्रकाश, आचार्य हेमचंद्रांचे सिद्धहेमशब्दानुशासन-प्राकृतव्याकरण, प्राकृतशब्दानुशासन (त्रिविक्रम), षड्भाषाचन्दिका (लक्ष्मीधर), प्राकृत-सर्वस्व (मार्कंडेय), प्राकृतरूपावतार (सिंहराज), प्राकृतकल्पतरू (रामशर्मा तर्कवागीश), प्राकृतलक्षण (चंड), इत्यादी ग्रंथांमध्ये पैशाची भाषेचे स्वरूप व वैशिष्ट्ये उदाहरणांसह सांगितलेली आहेत.
संदर्भ :
- जैन, जगदीशचन्द्र, प्राकृत साहित्य का इतिहास, वाराणसी, १९८५.
- शास्त्री, नेमिचन्द्र, प्राकृत भाषा और साहित्य का आलोचनात्मक इतिहास, वाराणसी, १९६६.