बड्डकहा (बृहत्कथा) : गुणाढ्य नावाच्या पंडिताने पैशाची भाषेत रचलेला कथाग्रंथ. त्यात सात विद्याधरांच्या प्रदीर्घ कथा व त्या अनुषंगाने इतर काही उपकथाही होत्या असे म्हटले जाते; परंतु हा ग्रंथ सध्या मूळ रूपामध्ये उपलब्ध नाही.पैशाचीमध्ये रचलेला हा एकमेव ग्रंथ होय. या ग्रंथाच्या आधारे अन्य ग्रंथरचना झालेली आढळते. जसे – संस्कृतमध्ये बुधस्वामीकृत बृहत्कथाश्लोकसंग्रह, क्षेमेंद्रकृत बृहत्कथामंजरी, सोमदेवकृत कथासरित्सागर, तर प्राकृतमध्ये संघदासगणीकृत वसुदेवहिंडी व या ग्रंथाचा पुढील भाग असणारा मज्झिमखंड.
बड्डकहाचे संस्कृत रूपांतर बृहत्कथा तसेच वृद्धकथा असे होते. वृद्धकथा हे रूपांतर अधिक योग्य वाटते. कारण बहुतांश वेळा वृद्ध लोकांना आपला जीवनकाळ किंवा अन्य कथा सांगण्यामध्ये रुची असते.अशा वृद्ध लोकांनी सांगितलेल्या कथांचे संकलन म्हणजेच वृद्धकथा (बड्डकहा -बृहत्कथा) होत.
बृहत्कथामंजरी व कथासरित्सागर या ग्रंथांमध्ये गुणाढ्य व त्याच्या बृहत्कथेच्या रचनेसंबंधी पौराणिक कथा आढळते. (पहा – गुणाढ्य) गुणाढ्य आणि त्याच्या बृहत्कथेसंबंधीचे उल्लेख अनेक संस्कृत व प्राकृत ग्रंथांमध्ये आढळतात. बाणभट्टकृत हर्षचरिताच्या प्रस्तावनेमध्ये बृहत्कथेचा रस शृंगार व अद्भुत आहे, असे सांगितले आहे. दंडीनेसुद्धा आपल्या ग्रंथामध्ये बृहत्कथेचा उल्लेख केला आहे. आर्यासप्तशतीमध्ये रामायण व महाभारताच्या प्रभावामुळे बृहत्कथेची या ग्रंथांशी तुलना केलेली आहे. (”श्रीरामायणभारतब्रुत्कथानां कवीन्नमस्कुर्म: त्रिस्नोता इव सरसा सरस्वती स्फुरति योर्भिन्न:”). उद्योतनसूरी यांची कुवलयमाला, जिनसेन यांचे आदिपुराण यांमध्येही बृहत्कथेसंबंधी उल्लेख आढळतात.
रामायण–महाभारताप्रमाणे बृहत्कथा हा ग्रंथसुद्धा कथावस्तूंचा आधार होता. सुरुवातीला उल्लेखिलेल्या ग्रंथांसोबतच अश्वघोषाचे सारिपुत्त–प्रकरण, शूद्रकाचे मृच्छकटिक तसेच चारुदत्त या ग्रंथांची कथावस्तू निश्चित रूपाने बृहत्कथेतून घेतली आहे. शिवाय भासकृत स्वप्नवासवदत्तम्, प्रतिज्ञायौगंधरायण ही नाटकेसुद्धा बृहत्कथेवर आधारित आहेत. तसेच भासाचे अविमारक हे नाटक, हर्षाची तीन नाटके, भवभूतीकृत मालती–माधव, विशाखादत्ताचे मुद्राराक्षस या नाटकांची विषयवस्तू सुद्धा बृहत्कथेद्वारे घेतली असावी.
बृहत्कथेचा नायक नरवाहनदत्त असून त्याला कुबेर म्हटले आहे. काही ठिकाणी त्याला कुबेराचा अवतार मानले गेले आहे. कुबेर ही धनदेवता आहे.पैशांसंबंधी व्यवहार व्यापारी लोक करत असल्याने बृहत्कथेला वणिग् वर्गाचे साहित्य मानले आहे आणि हा युक्तिवाद योग्य वाटतो. कारण व्यापारी लोक व्यापाराच्या निमित्ताने देशोदेशी फिरत असत. मन रमवण्यासाठी ते एकमेकांना गोष्टी सांगत असत.त्याद्वारे कथांची देवाण-घेवाण होऊन त्या कथा मौखिक अथवा लिखित स्वरूपात एकत्रित केल्या जात असाव्यात.अशाच प्रकारच्या कथा गुणाढ्याने बृहत्कथेमध्ये घेतल्या आहेत. इ. स. च्या सहाव्या शतकामध्ये गंगराजा दुर्विनीत याने बृहत्कथेचे संस्कृत रूपांतर केले. त्याचे तमिळ भाषांतर झाले असे उल्लेखही मिळतात; पण सध्या हे ग्रंथ उपलब्ध नाहीत.
पहा : गुणाढ्य; पैशाची भाषा; पैशाची साहित्य.
संदर्भ :
- पं. शिवदत्त; परब, काशिनाथ ,पांडुरंग, बृहत्कथामंजरी , निर्णयसागर प्रेस,. मुंबई, १९३१.
- बुधस्वामी; (अनु. इ.) पोद्दार , रामप्रकाश, बृहत्कथाश्लोकसंग्रह, तारा प्रिंटिंग वर्क्स, वाराणसी. १९८६.