पैशाची भाषेतील बड्डकहा (संस्कृत रूप बृहत्कथा) ह्या कथाग्रंथाचा कर्ता. प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्यातील पैठण ) येथे त्याचा जन्म झाला असावा व सातवाहनवंशी राजा हाल याच्या दरबारी तो प्रधान होता असे मानले जाते. तथापि त्याचे प्रमाणभूत चरित्र अद्यापही उपलब्ध झाले नाही. कथा सरित्सागराच्या कथापीठ लंबकात त्याच्याबद्दल दिलेली सविस्तर आखयायिका अशी : पैठण गावात सोमशर्मा नावाचा ब्राह्मण रहात होता. त्याला श्रुतार्था नावाची एक मुलगी होती. सोमशर्मा याच्या निधनानंतर भावांनी श्रुतार्थाचा सांभाळ केला. वयात आल्यावर कीर्तिसेन नावाच्या राजाशी तिने गांधर्व विवाह केला. त्या दांपत्याला जो मुलगा झाला तो म्हणजेच गुणाढ्य होय. श्रुतार्था अल्पावधीतच वारली. गुणाढ्य पोरका झाला. त्यानंतर त्याने दक्षिणेकडे जाऊन संस्कृत व प्राकृत भाषांचे सांगोपांग अध्ययन केले. नंतर पुन्हा पैठणक्षेत्री परत येऊन त्याने सातवाहन राजाच्या दरबारात मानाचे स्थान मिळविले. सातवाहन राजा हा अविद्य होता. एक दिवस त्याच्या सुविद्य पत्नीने याबद्दल त्याचा उपहास केला. अपमानित राजाने व्याकरणाध्ययन करावयाचे ठरविले. आपल्याला किती दिवसात विद्याप्राप्त होईल असे राजाने गुणाढ्याला विचारले असता त्याने सहा वर्षे इतका कालावधी सांगितला; परंतु सातवाहन राजाच्या पदरी असणाऱ्या शर्मवर्मा नावाच्या आणखी एका विद्वानाने स्वप्रौढी मिरवित मी सहा महिन्यात शिकवेन असे सांगितले. गुणाढ्याला हे न पटल्यामुळे ‘सहा महिन्यात जर राजाला व्याकरणादी विद्या अवगत झाल्या तर मी संस्कृत व प्राकृतभाषा उच्चारण्याचेच सोडेन’ अशी पैज लावली. शर्मवर्मा याने चंडिकेची उपासना केली व तिच्या कृपाप्रसादाने सहा महिन्यात राजाला विद्यासंपन्न केले. गुणाढ्य हरला. दरबारामध्ये त्याची अप्रतिष्ठा झाली. प्रतिज्ञेप्रमाणे त्याने संस्कृत-प्राकृत बोलणे सोडलेच; पण अपमानित झाल्यामुळे पैठण येथील वास्तव्यही सोडून तो विंध्यारण्यात राहू लागला. तेथे त्याने पैशाची भाषा अवगत केली. काणभूती जो सुप्रतिक नावाचा यक्ष असतो व कुबेराच्या शापाने पिशाच योनीला प्राप्त होतो, तो गुणाढ्याला तेथे भेटतो. काणभूतीला वररुचीने (पुष्पदंत शिवाने पार्वतीला सांगितलेल्या सप्तविद्याधरांच्या कथा ऐकतो. पुढे पार्वतीच्या शापाने कौशांबी येथे वररुची म्हणून जन्म घेतो व काणभूतीला त्या कथा सांगतो) सांगितलेल्या सप्तविद्याधरांच्या कथा त्याने गुणाढ्याला सांगितल्या. एक लक्ष श्लोकांचा एक भाग. अशा सात विभागांमध्ये या सात विद्याधरांच्या कथा गुणाढ्याने कष्टपूर्वक लिहिल्या. या सातही विभागांमध्ये एक कथासूत्र कायम ठेवून त्या सर्वांची मिळून त्याने एक बृहत्कथा बनविली. विद्याधरांनी आपल्या कथा चोरू नेऊ नयेत म्हणून गुणाढ्याने या सर्व कथांचे लेखन स्वरक्ताने केले,कारण त्याला माहित होते, की विद्याधर रक्ताला स्पर्श करीत नाही. पुढे कथांचे बाड घेऊन तो पैठणक्षेत्री परतला. स्वतः नगराबाहेर थांबून  शिष्याकरवी तो ग्रंथ त्याने राजदरबारी पाठविला. परंतु विद्योन्मादाने उन्मत्त राजाने त्या ग्रंथाचा व शिष्याचाही अपमान केला. त्यामुळे दुःखी झालेल्या गुणाढ्याने स्वतःचा ग्रंथ अग्नीला समर्पित करावयाचे ठरविले. एक मोठी शेकोटी पेटवून एकेक पान मोठ्याने वाचून अग्नीमध्ये समर्पित करण्याचा क्रम त्याने सुरू केला. त्यावेळी रानातले सर्व पशुपक्षी तहानभूक विसरून ती कथा ऐकावयास तेथे जमा झाले. इकडे सातवाहनाला एक विकार जडला. त्यावर उपाय म्हणून सुकलेले परंतु ताजे पशुमांस राजाने खावे असे वैद्यांनी सुचविले. अशा मांसाचा शोध घेत असता गुणाढ्याचा ग्रंथ समर्पणाचा वृत्तांत राजाला समजला. पशुपक्षी तहान भूक विसरून ती कथा ऐकत असल्यामुळे जिवंतपणीच पशुपक्ष्यांचे मांस सुकले आहे असे समजताच राजाला स्वतःची चूक उमजली. तो ताबडतोब गुणाढ्याकडे गेला. गुणाढ्याला शरण जाऊन राजाने ग्रंथ समर्पण थांबविले. गुणाढ्याने शेवटची नरवाहन दत्ताची कथा राजाला सुपूर्त करून तेथेच देहत्याग केला.

गुणाढ्याच्या बड्डकहा या ग्रंथाचे अनेक संस्कृतानुवाद झाले. दहाव्या शतकातील क्षेमेन्द्राचे बृहत्कथामञ्जरी, अकराव्या शतकातील सोमदेवाचे कथासरित्सागर आणि आठव्या-नवव्या शतकातील बुध स्वामीचा बृहत्कथाश्लोक संग्रह या ग्रंथांमध्ये प्रामुख्याने नरवाहन दत्ताची कथा सांगितली आहे. बृहत्कथामञ्जरी आणि कथासरित्सागर या ग्रंथांच्या प्रस्तावनेमध्येच ग्रंथकर्त्यांनी सांगितले आहे, की त्यांचा हा ग्रंथ गुणाढ्याच्या बृहत्कथेवर आधारित आहे. तसेच दण्डीने आपल्या काव्यादर्शामध्ये वानगी दाखल गुणाढ्य विरचित श्लोक बऱ्याच ठिकाणी उद्धृत केले आहेत. संस्कृत प्रमाणेच प्राकृतमध्येही संघदासगणिकृत वसुदेवहिण्डी तसेच धर्मसेनगणीकृत मञ्झिमखण्ड हे बृहत्कथेशी संबंधित ग्रंथ आहेत. कादंबरी, दशकुमारचरित , उदयन कथा  पंचतंत्र , अश्वघोषाचे  सारीपुत्रप्रकरण, शूद्रकाचे  मृच्छकटिक तसेच चारुदत्त, शिवाय भासकृत  स्वप्नवासवदत्तम्, प्रतिज्ञायौगंधरायण ही नाटके या ग्रंथांचेही मूळ बृहत्कथाच मानतात.

गुणाढ्याच्या काळाबद्दल विद्वानांमध्ये मतभेद आहेत.भाषाभ्यासक लाकोटे यांच्या मते गुणाढ्याचा काळ तिसरे शतक असावा. ई. पी. मॅटेनदेखील हेच मत ग्राह्य धरतात. डी. सी सरकार यांच्या मते गुणाढ्याचा काळ इ. स. पूर्व पहिले ते इ. स. तिसरे शतक याच्या दरम्यान असावा. तर कंबोजमधील शिलालेखांच्या आधारे कीथ यांनी गुणाढ्याचा काळ इ. स. पूर्व सहावे शतक मानला आहे. परंतु जर सातवाहनवंशी राजा हाल यांच्याशी गुणाढ्याचा संबंध जोडला गेला, तर गुणाढ्याचा काळही इ. स. पूर्व दुसरे-तिसरे शतक हा मानावा लागतो.एम्. एल्. वरदपांडे यांच्या मताप्रमाणे बाराव्या शतकापर्यंत गुणाढ्याचे काम भारतीय परंपरेला उपलब्ध होते. त्यानंतर मात्र ते नाहीसे झाले. अलीकडच्या काळात १९७५ मध्ये ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीतील कोलिन मॅक्स मायरहॉफर याने स्टडीज इन बृहत्कथा हा प्रबंध सादर केला आहे.

पहा : बृहत्कथा किंवा बड्डकहा, पैशाची भाषा, पैशाची साहित्य

संदर्भ :

  • Keith, Berriedale, A History of Sanskrit Literature, Motilal Banarasidas, Delhi. 1996.
  • Varadpande, M. L.  History of Indian Theatre, Abhinav Publications, Delhi, 2005.
  • जोशी, महादेवशास्त्री (संपा.) भारतीय संस्कृती कोश, खंड 3, पुणे.

समीक्षक – कमलकुमार जैन