ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण-मध्य भागातील साउथ ऑस्ट्रेलिया या राज्यातील एक खाऱ्या पाण्याचे सरोवर (Lake). ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या एअर द्वीपकल्पाच्या उत्तरेस या सरोवराचे स्थान आहे. टॉरेन्स सरोवराच्या पश्चिमेस असलेल्या उथळ द्रोणी प्रदेशात सरोवरांचा जो समूह आहे, त्यातील हे सर्वांत मोठे सरोवर आहे. सरोवराची लांबी १६० किमी. आणि रुंदी ४८ किमी. आहे. अंतर्गत नदीप्रणालीच्या माध्यमातून या सरोवराला अधूनमधून पाणीपुरवठा होतो. सरोवर जेव्हा भरते, त्या वेळी ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या  क्रमांकाचे हे मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर ठरते. इ. स. १८५७ मध्ये स्टीफन हॅक आणि पीटर ई. वॉरबर्टन या दोघांनी साधारणपणे एकाच वेळी या सरोवराचा शोध लावला. साउथ ऑस्ट्रेलिया राज्याचा गव्हर्नर सर रिचर्ड ग्रेव्हज मॅकडॉनेल यांनी वसाहत कार्यालयांतर्गत येणाऱ्या ऑस्ट्रेलियन विभागातील मुख्य लिपिक गॉर्डन गेर्डनर याच्या नावावरून या सरोवराला गेर्डनर हे नाव दिले (१८५७). गेर्डनर सरोवराच्या परिसराबरोबरच त्याच्या जवळपासच्या एव्हरॅर्ड आणि हॅरिस सरोवरांच्या परिसरात लेक गेर्डनर राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार झालेला आहे. एके काळी ही सरोवरे अंतर्गत समुद्राचा भाग होती.

गेर्डनर सरोवर म्हणजे शुष्क मिठाचे एक मोठे भांडेच (प्लाया) आहे. सरोवरातील मिठाच्या थराची जाडी काही ठिकाणी १.२ मीटर आढळते. या मिठाच्या थराच्या समतल आच्छादनामुळे जमिनीवरील वाहनांच्या वेगाचे जागतिक विक्रम करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येतो. त्यावरून मोटार सायकल, मोटार गाड्या आणि ट्रकही चालविले जातात. तसेच येथे वार्षिक वेग सप्ताहाचेही आयोजन केले जाते. सरोवर परिसरात खुरटे वनस्पतिजीवन असून त्यावर मेंढ्या पाळल्या जातात.

 

समीक्षक – माधव चौंडे

प्रतिक्रिया व्यक्त करा