कॅनडातील ग्रेट बेअर सरोवरानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे, तर उत्तर अमेरिकेतील पाचव्या क्रमांकाचे मोठे सरोवर(Lake). कॅनडातील नॉर्थवेस्ट टेरिटरी या संघीय प्रदेशाच्या दक्षिण भागातील डिस्ट्रिक्ट ऑफ मॅकेंझी विभागात हे सरोवर आहे. सरोवराची उंची स. स.पासून १५६ मी. आहे. सरोवर अनियमित आकाराचे असून त्याची लांबी ५०० किमी., रुंदी ३० ते १४० किमी., खोली ६०० मी. आणि क्षेत्रफळ २८,६०० चौ. किमी. आहे. सरोवराच्या दक्षिणेकडील किनारी भागात स्लेव्हरी (डॉग्रीब) इंडियनांचे वास्तव्य होते. त्यांच्यावरूनच सरोवराला स्लेव्ह हे नाव देण्यात आले आहे. इंग्लिश समन्वेषक सॅम्युएल हर्न यांनी १७७१ मध्ये या सरोवराचे समन्वेषण केले. या सरोवरापर्यंत पोहोचणारी हीच पहिली गोरी व्यक्ती होय. १९२० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत या सरोवराचे पूर्णपणे सर्वेक्षण झाले नव्हते. सरोवराच्या परिसरात पूर्वी फर व्यापाराची अनेक ठाणी स्थापन करण्यात आली होती. पुढे त्यांच्याच कायमस्वरूपी वसाहती निर्माण झाल्या.
अनेक नद्यांच्या माध्यमातून सरोवराला पाणीपुरवठा होतो. त्यांपैकी यलोनाइफ नदी उत्तरेकडून, स्लेव्ह नदी दक्षिणेकडून, तर हे नदी नैर्ऋत्येकडून सरोवराला मिळते. त्यांपैकी स्लेव्ह ही सर्वांत महत्त्वाची नदी आहे. वायव्य कॅनडातील मॅकेंझी ही महत्त्वाची नदी या सरोवराच्या पश्चिम टोकाजवळ बाहेर पडते आणि उत्तरेकडे आर्क्टिक महासागराला जाऊन मिळते. म्हणजेच या सरोवराच्या माध्यमातून स्लेव्ह आणि मॅकेंझी या दोन नद्या एकमेकींना जोडल्या गेल्या आहेत. सरोवराचे पाणी अतिशय स्वच्छ असते. वर्षातील जवळपास आठ महिने सरोवर गोठलेले असते. चारच महिने ते हिम-विरहित असून या सरोवरातून बाहेर पडणाऱ्या मॅकेंझी नदीतील जलमार्ग विशेष महत्त्वाचा आहे. सरोवराच्या परिसरात अनेकदा अतर्क्य (Unpredictable) व तीव्र वादळे येतात. सरोवराचा किनारा खडकाळ व दंतुर आहे. सरोवरात काही उपसागर आहेत. त्यांपैकी पूर्व टोकाशी १३ किमी. लांबीचा मॅकलाऊड उपसागर आहे. सरोवराच्या पूर्व भागात काही बेटे आहेत. मत्स्यव्यवसायाच्या दृष्टीने सरोवर महत्त्वाचे असून त्यात प्रामुख्याने ट्राउट व व्हाइटफिश जातीचे मासे आढळतात. येथील हे रिव्हर आणि ग्रॉस कॅप ही खेडी मासेमारीसाठी महत्त्वाची आहेत.
सरोवराचे पश्चिम आणि दक्षिण किनारे वनाच्छादित असून पूर्व आणि उत्तर किनारे काहीसे उजाड आहेत. वनांमधून उपयुक्त लाकूड उत्पादन होते. १९३४ मध्ये सरोवराच्या परिसरात प्रामुख्याने यलोनाइफ नदीजवळ सोन्या-चांदीच्या खाणींचा शोध लागला. याशिवाय शिसे व जस्ताचे साठेही येथे आहेत. सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर यलोनाइफ नदीच्या मुखाशी यलोनाइफ नगर आहे. नॉर्थवेस्ट टेरिटेरी या संघीय प्रदेशातील हे सर्वांत मोठे नगर असून ते त्या प्रदेशाच्या राजधानीचे ठिकाण आहे. त्याशिवाय सरोवराच्या काठी इतर लहानलहान वस्त्या स्थापन झाल्या आहेत. सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलेल्या हे रिव्हर येथून मॅकेंझी (यलोनाइफ) महामार्ग जातो. त्यामुळे सरोवराच्या दक्षिणेकडील भागात वर्षभर वाहतूकसुविधा उपलब्ध आहे. रशियाचा कॉसमॉस ९५४ हा कृत्रिम उपग्रह २४ जानेवारी १९७८ रोजी या सरोवराच्या जवळपास कोसळला होता.
समीक्षक – माधव चौंडे