उदी अंबर हा एक नैसर्गिक राखाडी रंगाचा, मेणचट व सुगंधी स्थायू पदार्थ आहे. याचा उपयोग अत्तरे व सुगंधी द्रव्यनिर्मितीमध्ये करतात. वसातिमी (sperm whale) या समुद्री प्राण्याच्या शरीरात उदी अंबर हे विशिष्ट रसायन आढळते.
लोलिगो (squid) किंवा ऑक्टोपस (octopus), खेकडा, शेवंडा (lobster) यांसारखे समुद्री प्राणी हे वसातिमीचे खाद्य आहे. ह्या प्राण्यांची कवचे किंवा नांग्या अन्ननलिकेतून सहज पुढे सरकली जावीत म्हणून उदी अंबर हे चिकट मऊसर रसायन वसातिमीच्या पित्तवाहिनीतून बाहेर पडून आतड्यामध्ये येते. कधीकधी वसातिमीच्या वमनातून हा पदार्थ त्याच्या शरीराबाहेर पडतो आणि नंतर समुद्राच्या पाण्यावर तरंगू लागतो. सुरुवातीला धुरकट पांढरा आणि मऊ चिकट असलेला हा पदार्थ समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगताना ⇨प्रकाशीय विघटन आणि ⇨ऑक्सिडीकरण यांमुळे गडद राखाडी रंगाचा तर होतोच शिवाय काहीशा मेणचट परंतु घट्ट पदार्थामध्ये त्याचे रूपांतर होते. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे सुरुवातीला त्याला येणारा विष्ठेचा वास पूर्णपणे नाहीसा होऊन त्याला मातीसारखा सुरेख गोडसर सुगंध येऊ लागतो. ही प्रक्रिया घडण्यासाठी अनेक वर्षे जावी लागतात. नंतर ही उदी अंबर समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत येऊन पडते. त्यामुळे वसातिमीचे वास्तव्य असलेल्या समुद्रकिनारी हा पदार्थ आढळतो. यात अँब्रिनॉल (ambrinol) व अँब्रोक्झॅन (ambroxan) ही प्रमुख सुगंधी संयुगे असतात. ⇨कस्तुरी सारखी अत्तरे आणि इतर सुगंधी द्रव्यांमध्ये उदी अंबरचा वापर केल्यास अनेक वर्षांपर्यंत अत्तरांचा सुगंध टिकतो. परंतु ज्या अत्तरांमध्ये उदी अंबरचा वापर केला असेल ती अत्तरे अत्यंत मौल्यवान असतात. कारण उदी अंबर हे अतिशय दुर्मिळ रसायन आहे.
उदी अंबरचा मुख्य घटक असलेलं अँब्रिन (ambrine) ह्या रसायनाचे मानवी शरीरातील ⇨कोलेस्टेरॉल या रसायनाशी साधर्म्य आहे. उदी अंबर अल्कोहॉलासह गरम केली असता त्यातून अँब्रिन हे रसायन वेगळे होते. अँब्रिनला कोणताही वास येत नाही परंतु त्याचे विघटन झाल्यावर अँब्रोक्झॅन आणि अँब्रिनॉल ही दोन सुगंधी रसायने तयार होतात. अलीकडे कृत्रिम पध्दतींनी अँब्रोक्झॅन या रसायनाची निर्मिती केली जाते.
समीक्षक – श्रीनिवास सामंत