गिबन या मानवसदृश कपीचा समावेश स्तनी वर्गाच्या नरवानर गणातील हायलोबेटिडी कुलात होतो. हा प्राणी म्यानमार, मलेशिया, बांगला देश, जावा, सुमात्रा, बोर्निओ, थायलंड, भारत इ. देशांमध्ये वर्षावनांतील दाट झाडीत आढळतो. त्याच्या सहा जातींपैकी एकच जात भारतात आढळते. ही जात ईशान्येकडच्या आसामच्या ब्रम्हपुत्रा, लोहित आणि दिबांग नद्यांच्या खोर्‍यांतील वनांत आढळते. या जातीचे शास्त्रीय नाव हायलोबेटीस हूलॉक आहे. स्थानिक भाषेत ती ‘उलकू’ या नावाने प्रसिध्द आहे. या प्राण्यात आणि मानवात साम्य असल्यामुळे त्याला ‘मानवसदृश कपी’ असे म्हणतात.

चिंपँझी, गोरिला आणि ओरँगउटान या इतर कपींच्या तुलनेत गिबन आकाराने लहान असतात. हूलॉक गिबन लुकडा असून उंची सु. ९० सेंमी. पर्यंत व वजन ८-१० किग्रॅ. असते. त्याचे हात भरपूर लांब असून हाताची लांबी पायाच्या दीडपट असते, शरीर केसाळ असते, शेपूट नसते व चेहरा पसरट असतो. लहान वयात मादी आणि नर यांचा रंग काळा असतो. जन्मत: पिल्लांचे केस पांढरट असतात. त्यांच्या वाढीनुसार केस काळे होतात. नर काळेच राहतात. पण माद्यांचा रंग वयाबरोबर बदलत जाऊन नंतर पिवळसर करडा होतो. गिबनला श्रोणि-किण (ढुंगणावरील घट्टे) असतात. आंत्रपुच्छ असते. दाढा माणसांसारख्या असतात. गालफडात कपोलकोष्ठ (पिशव्या) नसतात. डोळे आणि तोंडाभोवती असलेल्या पांढर्‍या लवीमुळे गिबनचा चेहरा एखाद्या मुखवट्यासारखा भासतो. त्याच्या आहारात कोवळी पाने आणि फळे यांचा समावेश असून काही वेळा ते कीटक, कोळी व पक्ष्यांची अंडी खातात.

गिबनच्या मोठ्या टोळ्या नसतात. त्यांचे कुटुंब एकत्र असते. प्रत्येक कुटुंबात नर, मादी व दोन ते चार पिल्ले असतात. अन्नाचा भरपूर पुरवठा असेल अशा ठिकाणी यांची बरीच कुटुंबे एकत्र राहतात. रात्री दरीतील सुरक्षित ठिकाणी ते झोपतात व सकाळ होताच डोंगर चढून अन्न शोधू लागतात. दिवस वर आल्यावर हुप! हुप!! असे ओरडायला सुरुवात करतात. यांच्या ओरडण्याने सारे वन दुमदुमते. १५-२० कुटुंबांनी एकत्र येऊन केलेले ओरडणे कित्येक किमी. पर्यंत ऐकू येते. गिबनची हालचाल दोन-तीन प्रकारची असते. एका फांदीवर उभा राहून तो खालच्या फांदीवर उडी घेतो. झाडाच्या मोठ्या फांदीवर ताठ उभा राहून तो चालत जातो. डोंबारी ज्याप्रमाणे दोरीवर चालताना काठीने तोल सावरतात त्याप्रमाणे गिबन फांदीवर दोन लांब हातांनी तोल राखतात. हाताने झोका घेत घेत एका फांदीवरून दुसर्‍या फांदीवर झेप घेण्यात गिबनचे कौशल्य थक्क करून सोडते. त्याची एक झेप सु. १५ मी. पर्यंत असते. त्याचा वेग ताशी सु. ५६ किमी. पर्य़ंत असतो. उंच उडी मारण्यातही तो पटाईत असून त्याची उंच उडी सु. ८ मी. पर्य़ंत पोहोचते.

पावसाळ्याच्या सुरवातीला नर आणि मादी यांचा समागम होतो. गर्भावधी सु. २१२ दिवसांचा असतो. दर खेपेला एक पिल्लू होते. पिल्लांची काळजी घेण्यात मादी फार दक्ष असते. झेप घेताना पिल्लाला पाठीवर घेते किंवा एका हाताने पोटाशी घट्ट धरून ठेवते. मादी आप्तजनांशी सलोखा राखण्यात पुढाकार घेत असते.

प्रजननावस्थेत येण्यास गिबनला सु. ८-९ वर्षे लागतात. त्याचे सर्वसाधारण आयुर्मान सु. २५ वर्षे असते.