कुळातील पूर्वजांच्या स्मृती जागविण्यासाठी तसेच कुळदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आळविल्या जाणाऱ्या लोककाव्यप्रकारात वाजविले जाणारे लोकवाद्य . प्रस्तुत लोककाव्यालाही डाहाका असेच  संबोधिले जाते. शंकर महादेवाच्या हातातील डमरू सदृश्य असणारे हे चर्मवाद्य ढोलकीच्या आकराएवढे असते. डाहाका हे पुरातन लोकवाद्य असून मराठी संतवाङ्मयात आणि म्हाइंभट संपादित लीळाचरित्र या मराठी आद्य ग्रंथात याचे उल्लेख सापडतात. महाराष्ट्र ,गुजरात ,राजस्थान ,मध्यप्रदेश ,छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये या लोकवाद्याचे प्रचलन आढळते. गुजरातमध्ये हे वाद्य डाक या नावाने ओळखले जाते .

डाहाका

तेथील मदारी, बागरी आणि लबारी या जातीचे लोक सापाचे विष उतरवण्यासाठी रेडी नामक गीत गातात. या गीतामध्ये हे वाद्य वाजविले जाते. राजस्थानात या वाद्दाला डैरू म्हटले जाते. तेथील भिल आणि गोगजीचे भोगे या जमातीत हे वाद्य वाजविले जाते. पश्चिम बंगालमध्ये हे वाद्य विढिगायनात वाजविले जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भ या दोन भूप्रदेशांत डाहाका या वाद्याचे प्रचलन आढळून येतेे. परंपरेनुसार मृत्योपरांत संस्कारात आणि मुंजोबाच्या उपासनेत या वाद्याला महत्व असले तरी सांप्रत विदर्भातील नागपूर परिसरात त्याच्या उपयोगाची व्याप्ती वाढून विवाहापूर्वी पार पाडण्याचा अत्यावश्यक धार्मिक विधी म्हणून डाहाका गायनास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. मराठवाड्याात कुुंभार जातीचे लोक डाहाका वाजवितात असा उल्लेख येतो; तर वऱ्हाडात गारपगारी या जमातीकडे हे काम सोपविण्यात आल्याचे दिसून येते. शिवाय झाडीपट्टीत ढिवर म्हणजे स्थानिक मच्छीमार जमातीलाही कामगिरी दिली गेल्याचे आढळते. तथापि डाहाका वादनातील परंपरागत कुंभार, गारपगारी व ढिवर या जातींचा एकाधिकार मोडीत काढून नागपूर परिसरात स्थानिक न्हावी जातीने त्यावर आपला अधिकार जमविला आहे. अन्यत्र डाहाका तुरळक प्रमाणात ऐकायला मिळत असला तरी नागपूर परिसरात मात्र लग्नाच्या हंगामात डाहाका वादकांना क्षणाचीही उसंत नसते. या काळात डाहाका वादकांची आढळून येणारी कमतरता लक्षात घेता आता न्हावी जाती शिवाय तेली, कुणबी, कलार, गोवारी आदी अन्य जातींनीही या वादन गायनात प्रवेश केला असल्याचे दिसून येते. अन्यत्र विवाह समारोहापूर्वी होणाऱ्या सत्यनारायण कथेचे स्थान येथे डाहाका वादनाने घेतले असून डाहाका कलावंतांना आर्थिक लाभाशिवाय समाजात आदराचे स्थान प्राप्त होत असल्यामुळे कलावंतांची नवीन पिढी इर्षेने या लोककलेकडे वळताना दिसत आहे. डाहाका या वाद्याच्या स्वरूपाचा विचार करता पायली, पूड, कोंडरी, कसनी, झूल व टाहारा ही त्याची सहा अंगे आहेत. त्यांच्यापैकी पायली हे प्रमुख अंग असून ती शिवण, आंबा किंवा पिंपळया वृक्षांच्या लाकडाची बनविलेली असते. दोन शंकू एकमेकाजवळ आणले की ते जसे दिसतील तसा या पायलीचा आकार असतो. तालवाद्याचे महत्वाचे अंग असणारे पूड कोणत्याही प्राण्याच्या चामड्यााचे असले तरी डाहाक्याचे पूड मात्र केवळ गाईची बदरी म्हणजे पोटाचे चामडे वापरून तयार केले जाते. पायली व पूडयांना सांधणारा महत्वाचा दुवा म्हणजे कोंडरी असून तिला कडी किंवा रिंग हा पर्यायी शब्द वापरता येईल. ती पूर्वी वेलीची किंवा लाकडाची बनवीत असत; पण आता ती लोखंडाची बनविलेली जाते. डाहाक्याला मजबुती आणण्याचे काम कसनी करीत असून ती एक मुलायम दोरी असते. ढोलकीला कसनी लावण्या स नऊ छिदे्र असली तरी डाहाक्याला केवळ सात छिद्रे असून त्यांतून ही कसनी नामक दोरी कसलेली असते. डाहाका वाजविताना ही कसनी डाव्या पायाच्या अंगठ्याला अडकवली जाते आणि पट्टा डाव्या पायाच्या गुडघ्याला गुंडाळला जातो. बैलांना सजविण्याकरिता जशी झूल वापरली जाते जशी ओबडधोबड आकार असलेला डाहाका सुंदर दिसावा म्हणून त्यावर रंगीबंंरगी कापडाचे जे आवरण गुंडाळले असते त्याला ही झूल हेच सार्थ नाव देण्यात आले आहे. पुडावर आघात करून ध्वनी निर्माण करण्याचे काम टाहारा करीत असतो. केवळ अर्धासेंमी. रूंद असलेली तीस सेंमी. लांब अशी बासाची कांब म्हणजे हा टाहारा असून त्याच्या टोकाला दोरा बांंधलेला असतो. डाहाका वाजविताना वादकाने उजव्या हातात टाहारा घेऊन उजव्या पुडावर आघात करावयाचा असतो; तर डाव्या पुडावर डाव्या हाताने थाप मारायची असते. थाप मारण्यास केवळ डावा हात वापरण्यात येत असल्यामुळे या वाद्याला ‘डाहाका’ हे नाम पडले अशी या वाद्याच्या नावाची एक व्युत्पत्ती सांगितली जाते.

डाहाका लोकगीत : कुळातील पूर्वजांच्या स्मृती काव्यात्मक गुंफणीतून शृंगार, करूण रसासह आदरभावाने आळविणे व वाद्यासह जागरण करून कुळदेवतेला प्रसन्न करण्याकरिता ओळखला जाणारा गायन प्रकार म्हणजेच डाहाका. नागपूर परिसरात डाहाका गायनाचे गुडगुडी व रायनी हे दोन प्रका रप्रचलित असून गणेशोत्सव, दुर्गोत्सव, गौरीपूजन, जन्माष्टमी अशा सणांनिमित्‍ताने संबंधित दैवतांचे गायन करण्यास गुडगुडी हा प्रकार वापरला जातो. यात गणासह त्या देवतेवरील प्रदीर्घ चौक अथवा पोवाडा यांचा समावेश असतो.रायनी हा गायनप्रकार केवळ विवाहापूर्वी गायलाजातो. रायनी हा पूर्वज पूजेचा विधी असून त्याचे पूर्वरंग व उत्तररंग हे दोन भाग पडतात. पूर्वरंगात परंपरागत गणा नंतर देवतांच्या आमंत्रणास्त व हंकारा, पहाडी व कुलदेव हे तीन छंद गायले जातात. हंकारा शिवाचे गायन करतो, तर पहाडी शिवाच्या स्थानांचा महिमा गाते. कुलदेव या छंदात नामानुसार आपल्या कुळातील दैवतांना आमंत्रण देण्यात येते.रायनीच्या उत्‍तररंगात आपल्या पूर्वजांना मंगल कार्यास येण्याकरिता आमंत्रण दिले जाते. त्यावेळी वीर, स्वासीन, पित्रीन, पाहुना, पाहुनी, मुंज्या, करुली व माळ हे आठ छंद गायले जातात. उत्‍तररंगाच्या प्रारंभी वीर हा छंद गायला जात असून त्यात आपल्या वंशाच्या तीन पिढ्याांतील काका, आजा इत्यादी मृत पुरुषांना आमंत्रण दिले जाते. आपल्या वंशातील तीन पिढ्याांच्या काकू, आजी अशा मृत सधवांना स्वासीन छंदात पाचारण केले जात असून पित्रीन या छंदात मात्र आपल्या वंशातील मृत विधवांना बोलावले जाते. मामा, सासरे अशा अन्य वंशातील मृत पुरुषांना पाचारण करण्यास पाहुना हा छंद गायला जातो; तर पाहुनी या छंदात मामी, सासू अशा अन्य वंशीय मृत स्त्रियांना आळविले जाते. मुंज्या हा छंद मृत अविवाहित मुलांकरिता वापरला जातो; तर मृत अविवाहित मुलींकरिता करुली हा छंद गायला जातो. माळ हा समारोपाचा छंद असून त्यात या सर्व पितरांना निरोप द्यायचा असतो. या निमित्‍ताने डाहाका गायनाने अनेक नवीन छंदांची निर्मिती केली आहे असे दिसून येते.गुडगुडी व रायनी या दोन्ही गायन प्रकारांचा प्रारंभ गणाने होत असून शेवट आरतीने केला जातो. मात्र गुडगुडीच्या प्रत्येक चौकात शेवटी नाम मुद्रा असली तरी रायनीच्या कोणत्याच छंदात नाम मुद्रा नसते. लग्न समारंभात चार ते पाच दिवसांपूर्वी प्रत्येक लग्नघरी डाहाका वाजविण्याचे पद्धत रूढ झाली. एक भगत, दोन ते तीन डाहाका वादक एकूणच कमीतकमी तीन व अधिकाधिक पाच लोकांचा संच डाहाका वादनात असायचा. शृंगार, करूण रस व मयतांच्या कहाणीची काव्यात्मक गुंफण करून संचाद्वारे गाणी गायली जायची. कुटुंबातील व्यक्ती कंटाळू नयेत, याकरिता वेळीच चाल बदलण्याचीही हातोटी संचाला असायची. एका पायाची घडी घालून व दुसरा पाय डाहाकाच्या मधोमध थेट ठेवून डाहाका वाजविला जायचा. परंतु आता कुळदेवता व मयतांचे अंगात येणे याविषयी जनजागृती झाल्याने लोकांमधील अंधश्रद्धेचे पारणे फिटत आहे. मात्र विपरित परिणाम होऊन गायन प्रकारातील हे लोकवाद्य नादासह लूप्त होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा