सुरथाळ : महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातील आदिवासींचे वाद्य. भांगसर, थाळसर या नावांनेही ते ओळखले जाते. भरतप्रणीत वर्गीकरणानुसार घनवाद्य आणि कुर्ट सॅक्सच्या वाद्यशास्त्रीय वर्गीकरणानुसार कंपित शरीर या प्रकारात मोडणारे हे वाद्य आहे. सराडीच्या भेंडाची नाजूक काडी, मेण, कास्य धातूचा पसरट थाळा यासाठी वापरतात. सराडीच्या भेंडाची नाजूक काडी मेणाने मऊ करतात. काश्याच्या थाळ्यात मेणाच्या साहायाने काडी उभी करतात आणि पायावर अथवा मांडीवर थाळा ठेऊन अंगठा व शेजारचे बोट यांच्या सहाय्याने काडी घासत राहतात त्यातून जो आवाज निघतो त्याच्या सुरातालावर कथा सांगत राहतात. आपण वाजवू गेल्यास त्यातून एकच सूर निघेल; परंतु जाणकार आदिवासी त्यातून सुरेल धून वाजवितात.

या वाद्यावर आधारित सुरथाळ गायन पालघर, नाशिक जिल्ह्यातील तसेच पालघर जिल्ह्यालगत असणाऱ्या गुजरात प्रांतातील आदिवासी बहुल भागात होते. सुरथाळीच्या सुरावटी वर चालणारे हे कथागायन रात्र रात्रभर चालते. यातील कथा या प्रामुख्याने पुराणकथा आणि आदिवासी दैवत कथा यावर आधारित असतात. माणसाचे शरीर आणि आत्मा यांचा संबंध दर्शवणारी या गायनातील कथा तर अलौकिकच; कारण माणूस जन्माला कसा येतो आणि मृत्यू नंतर त्याच्या आत्म्याचा प्रवास कसा सुरु होतो हा जीवनप्रवास या कथेत आहे. गावात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या दशक्रिया विधीच्या आधल्या रात्री हे कथागायन होत असते. सुरथाळ कथागायन हे सण, उत्सव अथवा विशिष्ट हेतूने देखील केले जाते. अलीकडील काळात सुरथाळीसाठी काशाचा थाळा खूप कमी प्रमाणात वापरात येतो. या ऐवजी स्टीलची परात वापरली जाते. या वाद्यावर आधरित सुरथाळ कथागायनाची परंपरा जोपासणारे खूप कमी कलाकार आहेत. हळूहळू हे वाद्य आणि हा लोककलाप्रकार विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे कारण बदलेल्या जीवनमानामुळे त्यांच्या पुढील पिढीकडे हा लोककलाप्रकार संक्रमित होताना दिसत नाही.

संदर्भ :

  • गारे, गोविंद ; सोनावणे, उत्तमराव, आदिवासी कला, गमभन प्रकाशन, १९९३.