मनुष्याला त्याच्या आहारामधून अनेक पोषक रसायने मिळत असतात. कर्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थ यांबरोबरच अनेक सूक्ष्म पोषक घटकही (उदा., जीवनसत्त्वे व खनिजे) उत्तम आरोग्यासाठी आहारामध्ये समाविष्ट असणे अतिशय गरजेचे असते. अ जीवनसत्त्व हाही अशाच प्रकारचा एक घटक आहे. अ जीवनसत्त्व मुख्यत्वे करून पालक, गाजर, रताळे, कोबी अशा भाज्या आणि अंडे व लोणी या प्राणिजन्य आहारामधून मिळते. यांपैकी बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये अ जीवनसत्त्व हे आदि-जीवनसत्त्वाच्या (उदा., बीटा-कॅरोटीन) रूपामध्ये असते. मनुष्यामधील चयापचय अभिक्रिया या आदि-जीवनसत्त्वाचे रूपांतर अ जीवनसत्त्वामध्ये करू शकतात. अ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे रातांधळेपणासारखे आजार होऊ शकतात. हा आजार मुख्यत्वे मागासलेल्या देशांत आढळून येतो. अशा देशांमधील लोकांच्या आहारामध्ये केवळ कर्बोदके असणाऱ्या खाद्यपदार्थांचा (उदा.,भात) समावेश असतो.
जगाच्या अनेक भागांमध्ये आढळणारी अ जीवनसत्त्व कमतरता दूर करण्यासाठी १९८२ सालामध्ये अमेरिकेमधील रॉकफेलर फाउंडेशनद्वारे गोल्डन राईस प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. यासाठी केलेल्या काही प्राथमिक प्रयोगांमध्ये शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, तांदळाच्या वनस्पतीमध्ये बीटा-कॅरोटीन तयार करण्यासाठीचे चयापचय मार्ग व संबंधित जनुके उपलब्ध असतात आणि त्यांद्वारे तांदळाच्या पानांमध्ये बीटा-कॅरोटीन बनते. मात्र तांदळाच्या दाण्यांमध्ये ही जनुके क्रियाहीन झाल्यामुळे बीटा-कॅरोटीन तयार होऊ शकत नाही. या माहितीच्या आधारे असे गृहीतक मांडण्यात आले की, तांदळाच्या दाण्यांमध्ये जी जनुके क्रियाहीन आहेत त्यांसारखी कार्यक्षम जनुके इतर जीवांमधून तांदळाच्या दाण्यामध्ये समाविष्ट करण्यात आली, तर अशा तांदळामध्ये बीटा-कॅरोटीनच तयार होऊ शकते. आहारामध्ये अशा तांदळाचा समावेश केल्यास अ जीवनसत्त्वाची कमतरता दूर केली जाऊ शकते.
या गृहीतकाच्या आधारे शास्त्रज्ञांनी जनुकीय अभियांत्रिकीच्या आधारे तांदळाच्या दाण्यामध्ये दोन विकरे (एंझाइमे) बनविणारी नवी जनुके समाविष्ट केली. यातील एक जनुक जीवाणूंमधून तर दुसरे डॅफोडिल नावाच्या वनस्पतीमधून घेण्यात आले. या प्रयोगानंतर तयार झालेल्या तांदळाच्या वनस्पतीमधील दाण्यांमध्ये बीटा-कॅरोटीन तयार झाले व त्यामुळे दाण्यांचा रंग पिवळा झाला. २००५ सालामध्ये गोल्डन राईस-२ तयार करण्यात आला, त्यामध्ये डॅफोडिलऐवजी मक्यातील जनुक वापरण्यात आले. या बदलामुळे अशा तांदळामध्ये बीटा-कॅरोटीनचे प्रमाण मूळ गोल्डन राईसपेक्षा २३ पटीने वाढले. यानंतर झालेल्या अनेक प्रयोगांमधून असे आढळून आले की, गोल्डन राईसमधील बीटा-कॅरोटीन मनुष्याच्या शरीरात अ जीवनसत्त्वामध्ये रूपांतरित होऊ शकते.
समीक्षक – बाळ फोंडके