नाकर : (१६ वे शतक). मध्यकालीन गुजराती आख्यानकवीत ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत महत्वाचे स्थान. ज्ञातीने दशावाळ वाणी. वडोद-यात निवास. आपण संस्कृतचे जाणकार नाही असे कवी म्हणत असला तरी दीर्घ समासयुक्त संस्कृत पदावलीचा उपयोग व कवीचे पौराणिक कथेचे ज्ञान कालिदास, व्यास, श्रीहर्ष वगैरेंचा सखोल अभ्यास दर्शविणारे आहे. पौराणिक कथेत समकालीन रंग मिसळून लोकांना रोचक वाटेल अशा त-हेने तिची निर्मिती करण्याची पाऊलवाट नाकर यांनीच पहिल्यांदा तयार केली. याचेच अनुकरण पुढे आख्यानकवी प्रेमानंदांनी अधिक सक्षमपणे केले. एका अर्थाने नाकर हे भालण आणि प्रेमानंद यांच्यातील दुवा स्वरूप कवी आहेत; तसेच महाभारतातील ९ पर्वे आणि जैमिनीच्या अश्वमेधांची पाच आख्याने त्यांनीच गुजरातीत पहिल्यांदा आणली आहेत. महाभारतातील पर्वाची रचना करताना कवीने अनेकदा उपपर्वे सोडून देत, कित्येक प्रसंगांचे केवळ सार देत, कथाक्रमात फेरफार करीत, संक्षिप्त करीत या पर्वांना सुघटित रूप दिले आहे. त्यातील विराटपर्वात, पौराणिक पात्रातून बहुजनसमाजातील स्वभावलक्षणांचे आरोपण, शल्यपर्वात अनेक प्रसंगांची केलेली नवनिर्मिती, सौप्तिक पर्वात दुर्योधनाच्या मनोभावांना दिलेली उदात्त छटा यामुळे त्यात रसवत्ता आलेली आहे. त्यांच्या अन्य आख्यानात ६ कांड आणि १२५ कडव्यात विस्तारलेले रामायण ही त्यांची विशेष निर्मिती आहे. कुंभकर्ण, रावण या पात्रांतील उदात्ततेचे रंग, लक्ष्मणमूर्छेच्या प्रसंगी रामाने केलेला विलाप, हनुमान, अंजनीमातेला रामकथा निरूपित आहे अशी नवी मांडणी यामधून कवीचे नवनिर्मिती कौशल्य दिसून येते. त्याचबरोबर १२ कडव्यांचे नलाख्यान, ओखाहरण, अभिमन्यु आख्यान, कर्णाचे दानशूरत्व केंद्रस्थानी असलेले कर्णआख्यान यासारख्या अनेक आख्यानपर रचनात नाकरच्या निर्मितीतील वैशिष्ट्यपूर्णता दिसून येते. याशिवाय व्याध-मृगली-संवाद, कृष्णविष्टि, भ्रमरगीता, भीलडीना द्वादशमास, सोगठा नो गरबो या संवादरूप स्फुट रचना नाकर यांच्या नावावर आहेत. गरबो शब्दाचा हा उल्लेख कदाचित पहिला असावा असे मानले जाते.
संदर्भ :
- पंड्या, गजेन्द्र शंकर ला, (संपा.), ओखाहरण (प्रेमानंद, नाकर अने विष्णुदासनां),१९३८.
- त्रिवेदी, चिमनलाल शि., कवि नाकर एक अध्ययन, १९६६.