वेषांतर करून लोकांच्या मनोरंजनासाठी निरनिराळी सोंगं धारण करणारा व्यक्ती. बहुरूपी जमातीचे लोक संपूर्ण भारतात आढळतात. राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्यप्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये बहुरूपी जमात आढळते. बहुरुप्यांची स्वतंत्र जातीसंस्था नाही. काही जातीधर्माची ओळख त्यांना दिली जाते. देशाच्या उत्तर-पूर्वेतले काही बहुरूपी पूर्णत: मुस्लीम आहेत. बहू हा संस्कृत शब्द आहे. बहू म्हणजे अनेक. रूप म्हणजे ठरावीक भूमिकेचं दृष्यस्वरूप. श्रीपतीभट्टाच्या जोतिषरत्नमाला या प्रसिद्ध ग्रंथात बहुरुप्यांचा उल्लेख आहे. समर्थ रामदासांनीही त्यांच्या भारुडात ‘खेळतो एकला बहुरुपी रे। पहाता अत्यंत साक्षेपी रे। सोंगे धरिता नाना परी रे। बहुतचि कलाकुसरी रे॥’असा उल्लेख केला आहे. जटाधारी तपस्वी, गोसावी, साधू इत्यादींची सोंगे घेणाऱ्या बहुरूपीसारख्या, वेगवेगळी कला-कौशल्ये जोपासणाऱ्या भटक्या जमातींच्या भिक्षुकांचा हेरगिरीसाठी गुप्तपणे कसा उपयोग करून घ्यावा यासंबंधीची कौटिलीय अर्थशास्त्र या ग्रंथात लिहिले आहे. महाराष्टातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात बहुरूपीस राईंदर तर पूर्व विदर्भात त्यास भिंगी कलावंत म्हटले जाते. महार बहुरूपी, मुसलमान बहुरुपी, (मराठवाडा) डवरी बहुरुपी, मराठा बहुरुपी असे बहुरुप्यांचे बरेच प्रकार महाराष्ट्रात आढळून येतात. औंधकर, सातारकर, मिरजकर, खेडकर, काशीकर, पल्लाणीकर (पैठणकर), वैद्य, काळे अशी यांची आडनावं आहेत.
गावोगावी फिरून देवादिकांचे, पुराण-पात्रांचे सोंगे घेऊन संगीत, नृत्य, अभिनय या कलांद्वारे पुराणकथांचे कथन करणे, भजन-कीर्तन करणं, छोटे छोटे नाटय़प्रसंग अंगणात, चौकात, मंदिरासमोर सादर करणे अशा कार्यक्रमातून लोकांची आध्यात्मिक करमणूक करून सदाचार व नीतीचा प्रचार करणे आणि लोक देतील ती भिक्षा स्वीकारणे हा या जमातीचा मूळ परंपरागत व्यवसाय होय. कालांतराने लोकांच्या रुचीनुसार अध्यात्मिक करमणुकीबरोबर निखळ करमणूक करण्याची कलाही त्यांनी अवगत केली. अस्वल-रेडा-यमराज, साधू-संन्यासी-फकीर, पोलीस, व्यापारी, अधिकारी, लुळे-पांगळे, जर्जर म्हातारा इत्यादींची ते सोंगे करतात. बहुरूपी पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज काढण्यात तरबेज असतात. वाद्ये वाजविणे,नकला करणे, गाणी म्हणण्याचे संस्कार त्याच्यावर झालेले असतात. बहुरुपी सहसा दोघं मिळून भटकंतीला निघतात. इतर भटक्या-विमुक्त समाजाप्रमाणेच हे लोकसुद्धा अंधश्रद्धेला बळी पडलेले आहेत. देवदेवतांना नवस करणे, कोंबडे कापणे, उपासतापास करणे किंवा देवदेवतांच्या नावाने गळ्यात गंडेदोरे बांधण्याची प्रथा या लोकांमध्ये आहे. बहुरूपी जमातीत महिलांचं स्थान दुय्यम आहे. जात पंचायतीत महिलांना बसता येतं पण चर्चेत भाग घेता येत नाही. कोणत्याही परिस्थितीत महिलांना पुनर्विवाह करण्यास बंदी आहे. आंतरजातीय विवाहास परवानगी नाही.
संदर्भ :
- मांडे, प्रभाकर, लोकरंगभूमी (परंपरा,स्वरूप आणि भवितव्य), मधुराज पब्लिकेशन्स, पुणे, २००७.
(गांव कळमनेर). ता,पो. राळेगांव, जिल्हा, यवतमाळ
आम्ही माहाराष्ट राज्याचे बहूरूपी कलाकार, बाबाराव पंजाबराव वैद्य, व त्यांचे मूल, वृषभ वैद्य, परिक्षित वैद्य वेगवेगळ्या प्रकारचे ( वेषभूषा ) धारन करून, कलेच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन करतो, आणि आमची कला पाहून लोकांना आनंद, मीळतो आम्हाला जे कहीं बक्षीस मिळतात त्यावर आमचा (उदरनिरवाह), चालतो. अनेक पिढ्यानपासून चालत आलेलि बहूरूपी कलेला आम्ही टीकून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहो. तरी सूध्दा महाराष्ट्र राज्य सरकार ने आमच्या या बहूरूपी लोक कलेला लक्षात घेता सांस्कृतिक कलाकेंद्रा द्वारे होनार्या कार्यक्रमा मध्ये आमंञित करावे. धन्यवाद