माकडाचे खेळ दाखवून मनोरंजन करीत उदरनिर्वाह करणारा समाज.गावाची यात्रा, गावातील हमरस्‍ता,चौक,शाळा,बाजार यांसारख्‍या सार्वजनिक ठिकाणी माणसाळवलेल्‍या माकडांचे खेळ दाखविणारा हा समाज संपूर्ण भारतात आढळतो.मदारी असेही प्रचलीत नाव त्‍यास आहे.महाराष्‍ट्रामध्‍ये कैकाडी ही जमात असून,माकडवाले ही या जमातीची पोटजात आहे.महाराष्‍ट्रातील माकडवाले मूळचे तेलंगणाचे.त्‍यांचे शिकारीचे कौशल्‍य पाहून छत्रपती शाहू महाराजांनी त्‍यांना राजाश्रय दिला.शिकारीच्‍या कौशल्‍याबरोबर माकडाच्‍या खेळांतून उदरनिर्वाह करण्‍याचा सुकर मार्ग त्‍यांनी निवडला.त्‍यांचा मुख्‍य व्‍यवसाय माकड नाचविणे हा आहे.गाण्‍यासारखे गायलेले गद्य आणि माकडांचे नाटक हा त्यांच्या आविष्‍काराचा विशेष होय.माकडांना नाचविण्‍या व्‍यतिरिक्‍त माकडवाले केरसुण्‍या बांधणे,कुंचले तयार करणे,घोंगड्यांना खळ लावणे हे व्‍यवसाय करतात.मरीमाता, यल्‍लमा, दुर्गामाता आणि मारूती या त्‍यांच्‍या प्रमुख देवदेवता आहेत.याशिवाय कोचामाय,मल्‍लामाय,पीर पश्‍याम्‍मा ह्या देवदेवतांवर त्‍यांचा विश्‍वास आहे. माकडवाल्‍याचा खेळ दाखविण्‍यात कला कौशल्‍याचा वापर करावा लागतो. त्‍या हेतूने माकडवाल्‍याचा वेशही विशेष असतो. डोक्‍यावर काळी टोपी, सदरा, सद-यावर कोट अथवा जाकिट हा त्‍यांचा वेश असतो.

माकडवाले ही कैकाड्यांची उपजमात असल्‍यामुळे कैकाडी व माकडवाले यांच्‍यात परस्‍परविवाह होतात. माकडवाले समाजात जातपंचायतीचे वर्चस्‍व आहे. भावकीतली भांडणेदेण्‍याघेण्‍याचे व्‍यवहार पूर्ववैमनस्‍य,आंतरजातीय विवाह,अनैतिक संबंध इत्‍यादीसारख्‍या बाबी जातपंचायतीत येतात.संवेदनशील प्रकरणे मढी या यात्रेतील वार्षिक जातपंचायतीत निकाली काढली जातात. माकडवाल्यांच्या जात पंचायतीची गावे सोलापूर,माकडवाला कंपौड मुंबई, बार्शी, जेजुरी,करमाळा, बीड, अकोला अशी आढळतात.

संदर्भ :

  • चव्हाण, रामनाथ,भटक्या विमुक्तांची जातपंचायत (खंड १-५),देशमुख आणि कंपनी पब्लिशर्स प्रा.लि.,पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा