सीएनजी (CNG) हे एक वायुरूप इंधन असून कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (Compressed natural gas) याचे हे संक्षिप्त रूप आहे. मराठीत याला दाबाखालील किंवा दाब दिलेला नैसर्गिक वायू असे म्हणता येईल. मात्र सदर नोंदीत याचा उल्लेख सीएनजी असाच केला आहे. नैसर्गिक वायूवर दाब देऊन सीएनजी तयार करतात. असा दाब दिल्याने नैसर्गिक वायूचे घनफळ खूप कमी होते. कोणत्याही मालवाहू व प्रवासी वाहनात पेट्रोल (गॅसोलीन) किंवा डीझेल याऐवजी सीएनजी वापरता येतो. कारण पेट्रोल वा डीझेल यांचा हा स्वस्त, अधिक कार्यक्षम व अधिक पर्यावरणस्नेही पर्याय आहे. यासाठी वाहनात सीएनजीचे परिवर्तन वा रूपांतर करणारे साधन (संच) किंवा सीएनजी एंजिन बसविले जाते. अशा वाहनाच्या टाकीत १५ लीटर पेट्रोलशी तुल्य एवढा सीएनजी भरता येतो.

इ.स. १८०० च्या सुमारास वाहनाचे इंधन म्हणून नैसर्गिक वायू वापरण्यात आला. नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या पहिल्या वाहनाचे एकस्व अमेरिकेत देण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर थोड्याच काळात सीएनजी हा प्राथमिक इंधन स्रोत म्हणून इटलीमध्ये आणि नंतर अनेक यूरोपीय देशांत वापरण्यात येऊ लागला. वाहनाशिवाय सीएनजी वीजनिर्मिती, खतनिर्मिती, स्वयंपाक इ. कामांसाठीही वापरतात.

सीएनजी २०–२५ बार म्हणजेच प्रती चौ.मी.ला २५,००० किलोटन दाब देऊन टाकीत भरतात आणि वाहनासाठी इंधन म्हणून वापरतात. या दाबामुळे त्याचा आकार २५ पटीने कमी होतो. सीएनजी हा कोरडा म्हणजे बाष्प नसलेला वायू असल्याने त्याचे ज्वलन होताना कमी बाष्प निर्मिती होते. त्यामुळे त्याची ज्वलनक्षमता वाढते. यात मुख्यत: मिथेन, थोडे इथेन, ५ टक्क्यांहून कमी प्रमाणात प्रोपेन व अत्यल्प प्रमाणात निष्क्रिय वायू असतात. सीएनजी स्वच्छ, गंधहीन व संक्षारण (रासायनिक झीज) न करणारा आहे.  सीएनजी पर्यावरणस्नेही असून हे वाहनांचे सर्वांत स्वच्छ इंधन आहे. यात कार्बनाचे प्रमाण कमी आहे. याच्या ज्वलनातून कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डाय-ऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड यांसारखे हरितगृह वायू व इतर प्रदूषके कमी प्रमाणात निर्माण होतात. तसेच वाहनाच्या निष्कास नळातून (Exhaust pipe/Outlet) बाहेर पडणाऱ्या घातक वायूंचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळे पेट्रोल व डीझेलपेक्षा सीएनजीच्या ज्वलनाने कमी प्रदूषण होते. सीएनजीत शिसे नसते, त्यामुळे ठिणगी गुडदी (Spark plug) व एंजिन तेल संदूषित होत नाहीत. ज्वलन कोठीचे भाग दीर्घकाळ काम करतात. एंजिनाची कमीत कमी झीज होते व तेल वरचेवर बदलावे लागत नाही. त्यामुळे वाहनाच्या देखभालीचा खर्च कमी होतो. सीएनजीची धातूशी विक्रिया होत नसल्याने सीएनजी वाहून नेणारे नळ दीर्घकाळ टिकतात. परिणामी वाहनाच्या देखभालीचा खर्च कमी होऊन एंजिनाचे एकूण आयुर्मान वाढते.

इंधनाचा ऑक्टेन क्रमांक इंधनाच्या ज्वलनशीलतेचा निर्देशांक असून तो वाहनाची गती घेण्याची क्षमता दर्शवितो. सीएनजीचा ऑक्टेन क्रमांक जास्त म्हणजे १३० पर्यंत आहे. स्कूटर, रिक्षा, मोटार सायकल, साधारण मोटारगाड्या यांच्या बाबतीत पेट्रोलचा ऑक्टेन क्रमांक ९१, तर आधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या मोटारगाड्यांच्या बाबतीत तो ९५ आहे. सीएनजीचा ऑक्टेन क्रमांक जास्त असल्याने वाहनाच्या एंजिनात बदल करणे आवश्यक ठरते. त्यामुळे या वायुवर धावणाऱ्या वाहनाच्या एंजिनाची क्षमता २०–२५ पटींनी वाढते. तसेच वाहनात कमी धक्के बसतात. तीव्र थंडी व तीव्र उष्णता यांचा सीएनजीवर परिणाम होत नाही. मात्र डीझेल थंडीने गोठते, तर पेट्रोल एंजिनात बाष्प-अटक (Vapour lock) ही समस्या निर्माण होते. म्हणजे पेट्रोल पुरविणाऱ्या प्रणालीत बाष्प किंवा वायूचे बुडबुडे यांच्यामुळे पेट्रोल वाहण्यात अडथळा निर्माण होतो. सीएनजी वायुरूप असल्याने तीव्र थंडीत वा जास्त तापमानात वाहन सुरू होण्यात अडचण येत नाही.

सीएनजीच्या साठवण टाक्या अधिक भक्कम व सुरक्षित असतात. यामुळे अपघाताने तो बाहेर पडण्याची शक्यता कमी असते. गळती झाली, तरी तो हवेत झटपट मिसळून जातो. त्यामुळे आग लागणे वा जमिनीचे संदूषण होण्याची जोखीम कमी असते. एंजिनात सीएनजी परत भरताना त्यातून प्रदूषके उत्सर्जित होत नाहीत. सीएनजी एंजिनाचे घटक आंतरराष्ट्रीय मानकांनुसार बनत असल्याने त्याचे कार्य सुरक्षित रीतीने चालते. सीएनजी प्रणाली सीलबंद असल्याने त्याचे बाष्पीभवन वा उत्सर्जन होत नाही. एलपीजी व पेट्रोल यांच्या वाफांप्रमाणे सीएनजी खाली बसत नसल्याने तो सुरक्षित ठरतो. तसेच लगेच पेटत नसल्याने सीएनजीची वाहतूक व साठवण कमी धोकादायक असते. प्रवासी वाहने, कचऱ्याच्या गाड्या, माल पोहोचविणाऱ्या गाड्या यांसारख्या सार्वजनिक उपभोगाच्या वाहनांच्या दृष्टीने हे विपुलपणे आढळणारे, स्वच्छ ज्वलनाचे व आर्थिकदृष्ट्या परवडणारे सीएनजी हे चलाख इंधन (Smart fuel) आहे. त्यामुळे दिवसेंदिवस याचा वापर वाढत आहे.

संदर्भ :

  • जोसेफ तुस्कानो, काळे सोने, अनघा प्रकाशन, ठाणे, २०१२.
  • जोसेफ तुस्कानो, गुणवत्ता आणि निसर्ग मैत्री, चेतक्स बुक्स, पुणे, २०१७.

समीक्षक – अ. ना. ठाकूर

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा