महाराष्ट्रातील काही भागांत भैरवनाथाच्या यात्रेमध्ये पुढील वर्षाचे अनुमान व्यक्त करणारे जे भाकीत सांगितले जाते, त्याला हुईक असे म्हणतात. संगमनेर तालुक्यातील डीग्रस येथील भैरवनाथ मंदिर प्रसिद्ध आहे.येथे भव्य असा भैरवनाथाचा तांदळा आहे. ही यात्रा पंचक्रोशीतच नव्हे तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध आहे,ती येथील हुईक मुळे.या यात्रेलाच बुवाजी बाबाजी यात्रा असेही म्हणतात. येथील बुवाजीबाबा हे गृहस्थ या यात्रेत भाकीत म्हणजेच हुईक सांगतात.ते ऐकण्यासाठी परिसरातील लोक खूप गर्दी करत असतात.या यात्रेला गुजरात,मध्यप्रदेश इत्यादी भागातूनही काही भक्त आलेले असतात. या यात्रेसाठी बाहेरगावी गेलेली सर्व गावातील माणसे गावात येतात व मोठ्या उत्साहाने ही यात्रा संपन्न होते. या यात्रेतील लक्षणीय घटक म्हणजे येथे व्यक्त होणारे भाकीत होय. वर्षातून दोन वेळा ही यात्रा व भाकीत सांगितले जाते व या भाकिताच्या आधारावर शेतकरी आपल्या पीकपाण्याचे,व्यवसायाचे नियोजन करतात.येथील यात्रेत बुवाजीबाबा सर्व समुदायासमोर हे भाकीत सांगतात. यात या वर्षीचे पाऊसपाणी कसे राहील,कोणती पीके फायदेशीर ठरतील,असा अंदाज बांधला जातो. या अंदाजानुसार शेतकरी कृषिविषयक नियोजन करतात.आरोग्यासंबंधीही इथे भाकीत सांगतात.कोणते साथीचे आजार येणार आहेत,त्यावर काय काळजी घ्यावी,याबाबतचे मार्गदर्शन यात असते. तसेच नैसर्गिक भाकिताबरोबरच राजकीय परिस्थितीबाबतचे अनुमानही असते.या यात्रेप्रमाणेच कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे या गावातही बाळ भैरवनाथाच्या यात्रेत भाकीत सांगण्यात येते. बाळ भैरवनाथ आणि जोगेश्वरी यांचा विवाह-सोहळाही या यात्रेत संपन्न होतो. या गावाप्रमाणेच महाराष्ट्रातील अनेक भागात भैरवनाथ देवस्थान व त्यांची यात्रा प्रसिद्ध आहे. तेथेही या प्रकारची भाकिते-हुईक वर्तविली जातात.

हुईक म्हणजे एक प्रकारचे भविष्यकथनच होय. यात कोणाचीही फसवणूक नसून सामुदायिक रीतीने ही परंपरा जतन केली जाते. प्राचीन काळी आणि आजही लोक जसा पंचागावर विश्वास ठेवतात त्याचप्रमाणे कृषिजन व पशुपालक या हुईकवर विश्वास ठेवून आपल्या उपजीविकेचे नियोजन करत असतात.

क्षेत्र अध्ययन

प्रतिक्रिया व्यक्त करा