आदिवासीतील कोलाम जमातीचा सण.कोलामी भाषेत या सणाला ‘बुर्री’ किंवा ‘भुर्री’ असे नाव आहे. या सणामध्ये मोहफूल आणि मोहाच्या झाडाचे महात्म्य असते, म्हणून कोलामांनी मराठी भाषिक लोकांसाठी ‘मोहडोंबरी’ हे नाव ‘बुर्री’ किंवा ‘भुर्री’ या सणास दिले आहे. काही कोलाम हा सण ‘फणमोडी’ या सणासोबत वर्षप्रतिपदेला करतात. ‘फणमोडी’ व ‘मोहडोंबरी’ हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे करण्याची प्रथा आढळते. इतरत्र कोलाम लोक मोहडोंबरीचा सण अक्षय्यतृतीयेच्या दिवशी साजरा करतात. मोहडोंबरी साजरी करण्यासाठी प्रत्येक कोलाम वस्तीत दीड दोन पायली सुके मोह आधीच गोळा करण्यात येतात. कोलामांच्या घरातून प्रत्येकी एक एक शेर चारोळी व काही पैशाच्या स्वरूपात वर्गणी जमा करण्यात येते. हे काम कोलामांच्या पंचमंडळातील घट्या करीत असतो. कोलामांची वस्ती असलेल्या जंगली भागात मोह व चारोळी ह्या दोन्ही वस्तू मुबलक मिळतात. यादिवशी कोलाम पुरुष शिकारीसाठी जंगलात जातात. फणमोडी, मोहडोंबरी इतरही सणांच्या वेळी शिकारीस निघताना एक रुढी कटाक्षाने पाळण्यात येते. पुरुष शिकारीस गेल्याशिवाय स्त्रियांनी कामास सुरुवात करू नये, अशी ती रुढी आहे. पुरुष शिकारीस जाण्यापूर्वी बायकांनी काजळ आणि कुंकू नव्याने लावून साजशृंगार करू नये, अशीही कोलाम पुरुषांची त्या काळात अपेक्षा असते. शिकारीस जाणारे सर्व कोलाम पुरुष वस्तीच्या चावडीपुढे जमल्यावर शिकारीस निघून जातात. ते वस्तीबाहेर गेल्यानंतरच कोलाम स्त्रिया पाणी वगैरे आणायला निघतात. शिकार केलेले प्राणी सायंकाळी वस्तीत आणतात. ते मृत प्राणी वस्तीतील चावडीपुढील विशिष्ट जागी भाजून काढतात. नंतर त्यांचे ‍हिस्से पाडून ते प्रत्येक कुटुंबास वाटून देतात. वाटणी करण्यापूर्वी ते सर्व मांस देवीला नैवेद्य म्हणून दाखवितात.हिस्से वाटणीचे वरील काम सुरु असताना काही कोलाम स्त्रिया पूर्वी जमवून ठेवलेले मोह घरातच भाजून घेतात. ते भाजलेले मोह व जमविलेली चारोळी नैवेद्य दाखविण्याच्या वेळी देवी जवळ आणतात. त्यावेळी वस्तीतील सर्व कोलाम स्त्रीपुरुष तेथे जमतात. जमविलेल्या वर्गणीतून गूळ, साखर, तीळ व पानसुपारी आणलेली असते. गूळ, साखर, तीळ व चारोळी यांचा प्रसाद तयार करण्यात येतो. हा प्रसाद तयार करण्यापूर्वी, जमविलेल्या चारोळीतून गावाच्या पाटलाचा हिस्सा वेगळा काढून ठेवतात. तो काढून ठेवल्यावर देवीपुढे जमलेल्या सर्व कोलाम स्त्रीपुरुषांना प्रसाद म्हणून दोन तीन इसम तो चारोळीयुक्त प्रसाद वाटतात. सोबत भाजलेले मोहही वाटतात. त्यानंतर ती गोड चारोळी व भाजलेले मोह यांचा प्रसाद सामुदायिकपणे ग्रहण करण्याचा कार्यक्रम होतो. वऱ्हाडात बहुसंख्य जातींमध्ये अखजी किंवा तीज या नावाने अक्षय्यतृतीयेचा सण साजरा करतात. कोलामांचा मोहडोंबरी हा सण कोलामेतरांच्या अखजीहून अगदीच वेगळा आहे.

संदर्भ :

  • कोलाम, भाऊ मांडवकर, सेवा प्रकाशन, अमरावती, १९६६.

प्रतिक्रिया व्यक्त करा