भारूड : मराठी संतसाहित्यातील एक महत्त्वाचा, रूपकात्मक, नाट्यप्रधान आणि गेय काव्यप्रकार . लौकिक जीवनातील विविध व्यक्तिरेखा, प्रसंग, व्यवसाय, विधी, खेळ, पशुपक्षी आणि सामाजिक व्यवहार यांच्या माध्यमातून आध्यात्मिक, नैतिक आणि तात्त्विक आशय व्यक्त करणाऱ्या रचनांना भारूड असे म्हणतात. संत साहित्यामध्ये या रचनांना मूळतः ‘रूपके’ असे संबोधण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास इत्यादी संतांनी या प्रकारच्या रचना केल्या असल्या, तरी संत एकनाथ महाराज यांच्या भारुडांनी विशेष लोकप्रियता मिळविल्यामुळे ‘भारूड’ म्हटले की संत एकनाथ यांचेच नाव प्रामुख्याने घेतले जाते. ‘भारूड’ या संज्ञेची व्युत्पत्ती निश्चितपणे स्पष्ट झालेली नाही. ‘बहुरूढ’ या शब्दापासून, भराडी समाजाच्या गायनपरंपरेतून किंवा ‘भारूंड’ या द्विमुखी पक्ष्याच्या नावापासून ही संज्ञा उद्भवली असावी, असे विविध मतप्रवाह आढळतात; तथापि, यांपैकी कोणत्याही मताला निश्चित ऐतिहासिक आधार उपलब्ध नाही.
भारूडांचे सादरीकरण महाराष्ट्रातील धार्मिक, सांस्कृतिक आणि लोककलात्मक परंपरांमध्ये विविध प्रसंगी केले जाते. वारकरी संप्रदायातील कीर्तन, भजन, हरिकथा, जागरण-गोंधळ, तसेच लोकनाट्य आणि तमाशा यांच्या माध्यमातून भारूडांचे सादरीकरण होते. गावातील धार्मिक उत्सव, यात्रोत्सव, सप्ताह, कीर्तन महोत्सव, संतस्मरण सोहळे आणि लोककलांच्या कार्यक्रमांमध्ये भारूडे सादर केली जातात. पारंपरिकरित्या भारूड हे लोकशिक्षण, मनोरंजन आणि अध्यात्मिक प्रबोधन यांचे प्रभावी माध्यम म्हणून वापरले गेले आहे. मराठी संतपरंपरेत रूपकात्मक रचना करण्याची परंपरा प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांनी विविध सामाजिक आणि लौकिक प्रतीकांचा वापर करून रूपके रचली. पुढे संत तुकाराम, समर्थ रामदास आणि इतर संतांनीही या प्रकारच्या रचनांची निर्मिती केली. संतांच्या गाथांमध्ये या रचनांना ‘रूपके’ असे संबोधण्यात आले आहे. या रूपकांमध्ये समाजजीवनातील विविध घटकांचा उपयोग करून आध्यात्मिक आणि नैतिक विचार सहजपणे लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला गेला.
संत एकनाथ महाराज हे भारूड साहित्याचे सर्वश्रेष्ठ निर्माते मानले जातात. त्यांच्या भारुडांची लोकप्रियता चार प्रमुख वैशिष्ट्यांमुळे वाढली : (१) विषयवैविध्य, (२) नाट्यात्मता, (३) विनोद आणि (४) गेयता. त्यांनी महालक्ष्मी, भवानी, खंडोबा, बहिरोबा यांसारख्या देवतांचे उपासक; महानुभाव, लिंगायत, नाथपंथीय अनुयायी; अंध, बहिरे, पांगळे भिक्षेकरी; ज्योतिषी, भटजी, जागते; डोंबारी, कोल्हाटी, भांड यांसारखे लोककलावंत; तसेच दळण, कांडण, बाजार, वृश्चिकदंश, नवस, हळद, फुलवरा, हुतुतू, टिपरी, पिंगा, भोवरा, कुत्रा, बैल, टिटवी इत्यादी विषयांवर भारुडे रचली. संत एकनाथांनी सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनातील प्रसंगांचा आधार घेत आध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भारुडांमधील पात्रे आणि प्रसंग हे नाट्यपूर्ण आणि प्रभावी असल्यामुळे ते सामान्य लोकांच्या मनात सहजपणे घर करून राहिले. ‘विंचू चावला’ यांसारख्या भारुडांमध्ये लौकिक अनुभवांच्या माध्यमातून मानवी मनोविकारांचे सूक्ष्म चित्रण करण्यात आले आहे.
लौकिक जीवनाच्या आधारे आध्यात्मिक आणि नैतिक आशय व्यक्त करण्याची परंपरा भारतीय साहित्यामध्ये अत्यंत प्राचीन आहे. महाभारत, भागवत, पुराणे, लोकगीते आणि शाहिरी साहित्यामध्ये रूपकात्मक अभिव्यक्तीचे अनेक नमुने आढळतात. या परंपरेत श्रोत्यांचे लक्ष वेधण्यासाठी प्रथम लौकिक अनुभव किंवा प्रसंग मांडला जातो; त्यानंतर त्यामागील तात्त्विक, आध्यात्मिक किंवा नैतिक अर्थ उलगडला जातो. संत ज्ञानेश्वर, नामदेव आणि एकनाथ यांच्या भारुडांनी या प्राचीन भारतीय रूपकपरंपरेचा प्रभावी अवलंब केला. रूपकाच्या माध्यमातून लोकमनाला स्पर्श करून अध्यात्मिक विचार सहजपणे पोहोचविण्याचे कार्य भारुडांनी केले. भारूड हा लोकजीवनाचा आरसा मानला जातो. त्यामध्ये तत्कालीन समाजजीवन, लोकसंस्कृती, लोकविश्वास, धार्मिक समजुती, रूढी, परंपरा, सामाजिक संबंध आणि मानवी स्वभाव यांचे जिवंत चित्रण आढळते. सामान्य लोकांच्या सुख-दुःख, आशा-आकांक्षा, अंधश्रद्धा, व्यवहारकौशल्य, विनोदबुद्धी आणि जीवनदृष्टी यांचा भारुडांमध्ये समावेश आहे. लोकशिक्षण आणि लोकप्रबोधन हे भारूडाचे मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे त्यातील सामाजिक आशय विशेष महत्त्वाचा ठरतो. भारूड हे केवळ धार्मिक वा आध्यात्मिक साहित्य नसून लोकजीवनाचे सांस्कृतिक दस्तऐवजीकरण देखील आहे.
भारूडांच्या लोकप्रियतेमागील सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांची गेयता. भारुडांमध्ये लोकसंगीताची चाल, लय, ठेका आणि ताल यांचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. ढोलकी, डमरू, तुमडी, दिमडी, टाळ, चाळ, एकतारी, तुणतुणे आणि वेणू यांसारख्या लोकवाद्यांच्या साथीवर भारूडांचे गायन केले जाते. वासुदेव, गोंधळी, वाघ्या-मुरळी, फकीर आणि इतर लोककलावंतांच्या गायनपरंपरेतील स्वररचना आणि तालवैशिष्ट्ये संत एकनाथांनी आपल्या भारुडांमध्ये समाविष्ट केली. त्यामुळे ही भारुडे लोकांच्या कंठात सहज बसली आणि व्यापक लोकप्रिय झाली. भारूड हा मराठी संतसाहित्यातील एक अद्वितीय आणि प्रभावी लोकाभिमुख काव्यप्रकार आहे. अध्यात्म, नैतिकता, लोकसंस्कृती, विनोद, नाट्य आणि संगीत यांचा सुंदर संगम या प्रकारात आढळतो. संत एकनाथांनी या काव्यप्रकाराला अभूतपूर्व समृद्धी आणि लोकप्रियता प्राप्त करून दिली. लोकमनाचे मनोरंजन करताना लोकशिक्षण आणि आध्यात्मिक प्रबोधन साधण्याचे कार्य भारुडांनी यशस्वीपणे केले.
संदर्भ : नांदापूरकर, ना. गो. , श्री एकनाथदर्शन भाग १, श्री एकनाथ संशोधन मंदिर, औरंगाबाद, १९५२.
समीक्षण : जगतानंद भटकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.

अतिशय समर्पक शब्दात माहिती उपलब्ध करून दिली आहे. धन्यवाद!