सुवासिनी नवविवाहित स्त्रियांनी श्रावणातील प्रत्येक मंगळवारी आचरावयाचे सौभाग्यदायी मंगळागौरी ह्या देवतेचे एक व्रत. या व्रतात शिव आणि गणपतीसह गौरीची पूजा करतात. लग्नानंतर पहिली पाच वर्षे किंवा सात वर्षे हे व्रत पाळल्यानंतर या व्रताचे उद्यापन करतात.

सुवासिनी स्त्री श्रावणातल्या मंगळवारी आपल्या विवाहित मैत्रिणींसह शिवासमवेत असलेल्या गौरीची पूजा करते. पहिल्या वर्षी माहेरी मातृगृही हे व्रत करण्याची प्रथा आहे. हे व्रत विशेषतः महाराष्ट्रीय ब्राह्मण स्त्री वर्गात विशेषतः आचरले जाते. बरोबरीच्या विवाहित मैत्रिणी (यांना ‘वसोळ्या’ म्हणतात) एकत्र जमून मंगळागौर रात्रभर जागवितात. निरनिराळे खेळ, गाणी, उखाणे इत्यादींनी मजेत दिवस व रात्र घालवितात व दुसरे दिवशी पहाटे पूजा-आरती करून सांगता करतात. हे व्रत सौभाग्यवती स्त्रियांकरिता आहे. ‘जय जय मंगळगौरी’ म्हणून सोळा वातींची मंगल आरती भक्तिभावाने सुवासिनी स्त्रिया करतात आणि नंतर हातात तांदूळ घेऊन बसतात व मंगळागौरीची कहाणी ऐकतात. ती कहाणी तात्पर्याने अशी : सुशीला नावाच्या एका साध्वीस मंगळागौरी प्रसन्न झाली व पुढे तिला वैधव्य प्राप्त झाले असताना, मंगळागौरीने यमदूतांशी युद्ध करून तिच्या पतीचे प्राण परत आणले आणि तिला अखंड सौभाग्यवती केले. मंगळागौरीच्या भक्तिपूर्वक केलेल्या पूजेचे हे फल होय. ही कहाणी ऐकल्यावर सुवासिनी हातातील तांदूळ देवीला वाहतात. दुपारी मौन आचरून भोजन करतात. पाच अथवा सात व्रते केल्यावर उद्यापन करतात.

संदर्भ :

  • जोशी, महादेवशास्त्री, पूजा विधान, पुणे, १९६८.

प्रतिक्रिया व्यक्त करा