स्वस्तिक हे शुभ चिन्ह आहे. प्राचीन काळापासून मांगल्याचे प्रतीक म्हणून भारतीयांनी या चिन्हाकडे पाहिले आहे. भारताप्रमाणेच भारताबाहेरही स्वस्तिक या चिन्हाचा वापर झालेला दिसतो. प्राचीन भारतातील वेदपूर्व सिंधू संस्कृतीतही स्वस्तिक आढळते. मोहें-जो-दडो येथे सापडलेल्या मुद्रांवर आणि मृद्पात्रांवर स्वस्तिक रेखलेले आढळते. पुढे वेदकालापासून आजतागायत एक पवित्र चिन्ह म्हणून मंदिरांच्या भिंतींवर ते कोरलेले दिसते. घरांच्या भिंतींवर ते रंगविलेले दिसते. तसेच घरासमोर रांगोळी काढतानाही स्वस्तिकाकृती काढली जाते. बौद्ध परंपरेत स्वस्तिकाकडे बुद्धाचे पाऊल म्हणून पाहिले जाते. बौद्ध धर्माचा प्रवेश चीन आणि जपानमध्ये झाल्यानंतर तेथील प्रतिमाविद्येत स्वस्तिकाचा अंतर्भाव झाला. अनेकता, वैपुल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य दर्शविणारे चिन्ह म्हणून चीनने स्वस्तिकाकडे पाहिले. प्राचीन ट्रॉयच्या नजीक एका पठारावर उद्ध्वस्त शहरांच्या अवशेषांत स्वस्तिकाचे नमुने सापडले आहेत. कॉकेशस पर्वतश्रेणीने व्यापलेल्या प्रदेशांत — सायप्रस, र्‍होड्स, अथेन्स, मॅसिडोनिया, मध्य यूरोप, इटली इत्यादी अनेक ठिकाणी— कधी पुष्पपात्रांवर, कधी नाण्यांवर, तर कधी भांड्यांवर स्वस्तिक दिसते. केल्ट, गॉल आणि जर्मानिक लोक यांच्या कोरीव लेखांवरही स्वस्तिक आढळते. स्वस्तिकाचा प्रचार किती व्यापक प्रमाणावर झालेला आहे,याची काहीशी कल्पना यावरून येईल.

एक उभी रेषा आणि त्या रेषेवर तिच्याइतयाच लांबीची एक आडवी रेषा काढली, की ख्रिस्ती क्रॉसची आकृती तयार होते. या क्रॉसची सर्व टोके काटकोनांत वळवली, की स्वस्तिक बनते. भारतीय परंपरेत स्वस्तिकाची रेखाकृती तयार करण्यापूर्वी काढलेली उभी रेषा आणि तिच्यावर काढलेली आडवी रेषा यांना विशिष्ट अर्थ दिलेले आहेत. उभी रेषा हे ज्योतिर्लिंगाचे प्रतीक होय. ज्योतिर्लिंग हे मूळ विश्वोत्पत्तीचे कारण मानले आहे, तर आडवी रेषा ही सृष्टीचा विस्तार दाखविते. भारतीय आर्यांच्या विचारविश्वाच्या काही अभ्यासकांच्या मते स्वस्तिक हे जिवंत ज्वालेच्या स्वरूपातील पवित्र अग्नीचे प्रतिनिधित्व करते ( यूजिन ब्यूर न्यूफ ), तर काहींच्या मते स्वस्तिकातून आर्यांच्या समाजातील चार वर्णांचे एकत्रितपण व्यक्त होते ( फ्रेड पिन्कॉट ).  माक्स म्यूलरच्या मते, स्वस्तिक सूर्याच्या मार्गाचे प्रतीक होय. स्वस्तिक आणि विष्णू हे परस्परांशी निगडित आहेत, असे मानले जाते. त्यामुळे ते नाते दर्शविणारे अर्थही लावले गेलेले आहेत. उदा., स्वस्तिकाच्या चार भुजा म्हणजे विष्णूचे चार हात. विष्णू हा विश्वधारक असल्यामुळे ह्या चार हातांमधून स्वस्तिकाचे विश्वव्यापी ईश्वरत्व सूचित होते. चार ह्या संख्येतूनही प्रतीकार्थ प्रकट होतो. चार म्हणजे चार दिशा, आर्यांच्या चार जीवनावस्था चार वेद. काही स्वस्तिकांच्या भुजांची अग्रे डावीकडे, तर काही स्वस्तिकांच्या भुजांची अग्रे उजवीकडे वळवलेली असतात. या स्वस्तिकांच्या प्रकारांना अनुक्रमे डावी स्वस्तिके व उजवी स्वस्तिके असे म्हणतात. डावे स्वस्तिक नारीतत्त्वाचे, तर उजवे स्वस्तिक नरतत्त्वाचे प्रतीक होय. भारतात स्वस्तिकाच्या आकाराची मंदिरे आहेत. पुरी येथील जगन्नाथ मंदिराचा अंतर्भाग स्वस्तिकाकृती आहे. हिंदूंच्या विवाहात अंतरपाटावर कुंकवाने स्वस्तिक काढतात. अनेक सुवासिनी चातुर्मासात स्वस्तिक व्रत करतात आणि त्या व्रतात रोज स्वस्तिकाची पूजा करतात. हिटलरने १९३३-४५ या काळात स्वस्तिक हे आर्यांचे, नाझीवादाचे आणि ज्यूविरोधाचे प्रतीक म्हणून वापरले.

पहा : धार्मिक प्रतीके.

This Post Has One Comment

  1. NILKANTH PANDURANG INGALE

    स्वस्तिक हे दोन प्रकारचे असतात डाव्या दिशेकडिल नारी व उजव्या दिशेला तोंड करून असलेल्या स्वस्तिकास पुरुष,त्याचे महत्त्व कळले. धन्यवाद सर 🌹🙏

Comments are closed.