लीकी, लुई : (७ ऑगस्ट १९०३–१ ऑक्टोबर १९७२). विख्यात केनियन पुरामानवशास्त्रज्ञ व पुरातत्त्वज्ञ. त्यांचा जन्म केनियातील (ब्रिटिश ईस्ट आफ्रिका) काबेटे येथे झाला. पूर्ण नाव लुई सेमूर बॅझेट लीकी (एलएसबी). त्यांचे कुटुंबीय ख्रिश्चन धर्मप्रसारक होते. लुई लीकी पुरातत्त्व आणि मानवशास्त्राच्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेले (१९२१). त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून आफ्रिकेतील प्रागितिहासावर डॅाक्टरेट पूर्ण केली.
मानवी उत्क्रांतीचा प्रारंभ यूरोपात नाही तर आफ्रिकेत झाला असावा, हा चार्ल्स डार्विन यांचा सिद्धांत तेव्हा मान्य नव्हता. या सिद्धांतांचे परीक्षण करण्यासाठी त्यांनी १९३१ मध्ये टांझानियात ओल्डुवायी गॉर्ज येथे पहिली पुरामानवशास्त्रीय शोधमोहीम काढली. तेथे त्यांनी ज्या स्थळावर काम केले, त्याला त्यांनी फ्रिडा लीकी कोरोन्गो (एफएलके) असे नाव दिले. ‘कोरोन्गोʼ याचा स्वाहिली भाषेत ‘घळʼ असा अर्थ होतो, तर फ्रिडा हे त्यांच्या पत्नीचे नाव होते.
ॲडम्स ॲन्सेस्टर्स या पुस्तकाचे काम करत असताना या पुस्तकासाठी चित्रे काढणाऱ्या मेरी डग्लस निकोल यांच्याशी त्यांचा परिचय झाला (१९३४). मेरी निकोल यांच्यासोबतच्या प्रेमप्रकरणामुळे त्यांना केंब्रिज विद्यापीठातून बाहेर पडावे लागले. पुढे लुई लीकी पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन मेरी निकोल यांच्याशी विवाहबद्ध झाले (१९३७). यानंतरच्या काळात लुई लीकी यांच्या संशोधनात मेरी लीकींचा महत्त्वाचा सहभाग होता.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश गुप्तचर खात्यासाठी काम करत असतानाच लुई लीकी यांची कॉरडन संग्रहालयात (विद्यमान ‘नॅशनल म्यूझीअम ऑफ केनियाʼ) मानद अभिरक्षक म्हणून नेमणूक झाली (१९४१). पुढे ते पूर्णवेळ अभिरक्षक झाले (१९४५). या पदावर काम करताना त्यांनी अनेक शोधमोहिमा काढल्या. लेक व्हिक्टोरियामधील रसिंगाबेटावरील त्यांच्या शोधमोहिमेत मेरी लीकींना मायोसीन कालखंडातील प्रोकोन्सुल (Proconsul) हा प्रायमेट जीवाश्म सापडला (१९४८). सुमारे २ कोटी वर्षांपूर्वींच्या या कपी जीवाश्मामुळे मानवी उत्क्रांतीचा कालपट मोठा आहे, हे लक्षात आले.
लुई लीकी आणि मेरी लीकी यांनी मिळून अनेक महत्त्वाचे शोध लावले. ओल्डुवायी गॉर्ज येथे १९५९ मध्ये मेरी लिकींना मिळालेल्या कवटीच्या जीवाश्माला (ओएच-५ / झिंझ / नटक्रॅकर मॅन) लुई लीकी यांनी झिंझान्थ्रोपस बॅाइसी असे नाव दिले. आता ही प्रजात पॅरान्थ्रोपस बॅाइसी या नावाने ओळखली जाते. ओल्डुवायी गॉर्ज येथेच १९६० मध्ये एक आकाराने छोटा असलेला खालचा जबडा (ओएच-७) मिळाला. लुई लीकी, फिलिप टोबियास आणि जॉन नेपियर यांनी त्याला हॅन्डी मॅन अथवा होमो हॅबिलिस असे नाव दिले. पुरामानवशास्त्रातला हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. झिंझान्थ्रोपसच्या शोधापूर्वी ३० वर्षे काही जीवाश्म मिळविण्याच्या दृष्टीने लिकी प्रयत्नशील होते. परंतु त्यांतील बरेचसे फक्त कपींचे जीवाश्म असल्याने जगाने त्याची फारशी नोंद घेतली नाही.
लुई लीकींनी पुरामानवशास्त्रासह प्रागैतिहासिक पुरातत्त्वात मोलाची कामगिरी केली. याशिवाय त्यांनी प्रायमेट संशोधनाला प्रोत्साहन दिले. चिंपँझी, गोरिला आणि ओरांगउटान यांच्यावर बहुमूल्य काम करणाऱ्या जेन गूडॉल (जन्म ३ एप्रिल १९३४), डायन फॉसे (१९३२–१९८५) आणि बरूटे गाल्डिकस (जन्म १० मे १९४६) यांच्यासारख्या संशोधकांना त्यांनी आर्थिक पाठबळ मिळवून दिले. या तिघी ‘लिकीज एन्जल्सʼ म्हणून प्रसिद्ध आहेत.
लुई लीकींनी अनेक पुस्तके आणि १५० शोधनिबंध प्रकाशित केले. द स्टोन एज कल्चर ऑफ केनिया कॉलनी (१९३१), ॲडम्स ॲन्सेस्टर्स (१९३४), व्हाइट आफ्रिकन (१९३७), ओल्डुवायी गॉर्ज (१९५१) आणि ॲनिमल्स ऑफ ईस्ट आफ्रिका (१९६९) हे त्यांची काही प्रसिद्ध ग्रंथ.
लुई आणि मेरी लीकींच्या संशोधनाला पाठबळ देण्यासाठी त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या काही जणांनी अमेरिकेत लीकी फाउंडेशनची स्थापना केली (१९६८). ही संस्था प्रायमेटविज्ञान, मानवी उत्क्रांती आणि तत्सम विषयांतील संशोधनप्रकल्पांना प्रोत्साहन देते.
लुई लीकींना फ्रिडा लिकींपासून कॉलिन हा मुलगा तर, मेरी लीकींपासून तीन मुले (जोनाथन, रिचर्ड व फिलिप) होती. कॉलिन लीकी यांनी वनस्पतिविज्ञानात, तर रिचर्ड लीकी यांनी वडिलांप्रमाणे पुरामानवशास्त्रात भरीव कामगिरी केली. लुई लीकी आणि मेरी लीकी यांनी एकत्र काम केले असले, तरी उतारवयात त्यांच्यातले संबंध ताणलेले होते.
लंडन येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- Clark, Desmond John, ‘Louis Seymour Bazett Leakey, 1903-1972ʼ, Proceedings of the British Academy, pp.447–471, 1973.
- Gaur, Ranjan, ‘Louis Leakey and Mary Leakeyʼ, Resonance, pp. 667-679, August 2015.
- Morrel, Virginia, Ancestral Passion : The Leakey Family and the Quest for Humankind’s Beginnings, New York, 2011.
समीक्षक : शौनक कुलकर्णी