घशात असलेल्या लसीका ग्रंथींचा एक समूह. टॉन्सिल हा शब्द इंग्रजी भाषेतील असून मराठीत त्याला गलवाताम म्हणतात. या ग्रंथी साधारण द्राक्षाच्या आकाराच्या आणि गुलाबी रंगाच्या असतात. यांपैकी सर्वसाधारणपणे टॉन्सिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन ग्रंथी घशाच्या मागे दोन्ही कडांवर असतात. त्यांना तालू टाळू टॉन्सिल (पॅलॅटाइन टॉन्सिल) म्हणतात. याखेरीज तोंडाच्या आतील भागात अजून दोन प्रकारच्या टॉन्सिल असतात : (१) ग्रसनी टॉन्सिल आणि (२) जिव्हा टॉन्सिल. ग्रसनी टॉन्सिल (फॅरेन्जिएल टॉन्सिल) घशाच्या मागे नासामार्गाजवळ असतात. जिव्हा टॉन्सिल (लिंग्वल टॉन्सिल) जिभेच्या मागच्या बाजूला आढळतात. या तीनही प्रकारच्या टॉन्सिलांपासून घशाच्या मागील भागात कडे तयार झालेले असते.
टॉन्सिल टॉन्सिलचे नक्की कार्य अजूनही उमगलेले नाही; परंतु अनेक वैद्यांच्या मते टॉन्सिलमुळे श्वसन संस्था आणि पचन संस्था यांचे रोगकारक संक्रामणापासून संरक्षण होते. टॉन्सिल लसीकाभ ऊतींपासून बनलेल्या असतात. या ऊतींपासून रक्तातील पांढऱ्या पेशी (लसीका पेशींची) निर्मिती होत असते. या पेशी संक्रामणाचा प्रतिकार करतात. उदा., जेव्हा शरीरावर जीवाणू किंवा विषाणूंचे संक्रामण होते तेव्हा लसीका पेशी जीवाणूंचा किंवा विषाणूंचा नाश करतात किंवा त्यांना निष्प्रभ करतात. तालू टॉन्सिलवर अनेक खळगे असतात. जीवाणू आणि अन्नकण या खळग्यांमध्ये अडकले जातात. जिव्हा टॉन्सिलवरही खळगे असतात; परंतु ग्रसनी टॉन्सिलवर असे खळगे नसतात.
शरीरात टॉन्सिलचे महत्त्व ८-१० वर्षांपर्यंत असते. मुले जशी वयाने वाढतात तसे त्यांच्या टॉन्सिलचा आकार लहान होतो. श्वसनमार्गातील सूक्ष्मजीवांना प्रतिकार करताना बरेचदा टॉन्सिल स्वत:च दूषित होतात. टॉन्सिलच्या पृष्ठभागावरील खळग्यांत सूक्ष्मजीवांचा शिरकाव झाल्यास त्यात पू भरून फोड तयार होऊ शकतो. त्याला टॉन्सिल गळू (टॉन्सिलर अॅब्सेस) म्हणतात. प्रतिजैविकांच्या वापराने हा गळू बरा होतो. काही वेळा संक्रामणामुळे टॉन्सिलदाह होतो आणि त्या सुजतात. वेदना दूर करण्यासाठी वैद्य विश्रांतीचा सल्ला देतात, मिठाच्या गुळण्या करायला सांगतात आणि अॅस्पिरीन हे औषध देतात. जीवाणूंचे संक्रामण असल्यास प्रतिजैविके देतात. मात्र, विषाणूंचे संक्रामण झाल्यास टॉन्सिलशोथावर प्रतिजैविकांचा काही उपयोग होत नाही. सामान्यपणे १०-४० वर्षे वयापर्यंतच्या व्यक्तीला हा आजार होऊ शकतो. विजेरीच्या मदतीने वैद्य तोंडातील टॉन्सिलवरील सूज व लालसरपणा पाहतात. त्यांच्यावरील सूक्ष्मजीवांचे पांढरे चट्टे दिसू शकतात. टॉन्सिल सुजल्यामुळे झोपताना श्वास घेण्यास अडथळा येतो आणि गिळताना किंवा बोलताना कधीकधी त्रास होऊ शकतो. काही व्यक्तींना वारंवार हा त्रास होत असल्यास वैद्य टॉन्सिल काढून टाकण्याचा सल्ला देतात आणि शस्त्रक्रियेने ती काढून टाकतात. टॉन्सिल काढल्यामुळे कोणत्याही व्यक्तीस कसलाही अपाय होत नाही.