पेंग्विन :अंटार्क्टिकाचे वैशिष्टय.

हे पृथ्वीवरील दक्षिण ध्रुवाभोवतीचे हिमाच्छादित व पर्यावरण प्रदूषणमुक्त खंड आहे. ते जागतिक हवामानाचे नियंत्रक म्हणून ओळखले जाते. या खंडाचे क्षेत्रफळ १,४२,००,००० चौ. किमी. आहे. याचा ९८% भाग हिमाच्छादित असून हिमस्तराची सरासरी जाडी सु. १,६०० मी. आहे. पृथ्वीवरील एकूण गोड्या जलसंसाधनांपैकी ७० % जलसंसाधन अंटार्क्टिकावर हिमरूपात आहे.

अंटार्क्टिकाचे हवामान जगातील इतर प्रदेशांच्या तुलनेत सजीवांसाठी अत्यंत प्रतिकूल मानले जाते. त्यामुळे हे कायमस्वरूपी मानवी वस्ती नसलेले एकमेव खंड आहे. या खंडावरील तापमान अत्यंत कमी असून जगातील सर्वांत कमी तापमान -८९० से. पूर्व-मध्य अंटार्क्टिका भागातील बोस्टॉक येथे २१ जुलै १९८३ रोजी नोंदले गेले आहे. अतिथंड हवामान, अत्यंत कमी वृष्टी, बहुतांश हिमाच्छादित भाग यांमुळे या खंडाचा अंतर्भाग ओसाड आहे. येथे अंटार्क्टिक हेअर ग्रास आणि अंटार्क्टिक पर्लवोर्ट या दोन प्रकारच्या सपुष्प वनस्पती वाढतात. यांशिवाय तेथे हरिता (मॉस) आणि यकृतका (लिव्हरवर्ट्स) या शेवाळी वनस्पती विशेषत: आढळतात. डास व चिलटे हे येथील मुख्य प्राणी आहेत.

अंटार्क्टिक महासागरालगतच्या खंडाचा भाग पृथ्वीवरील एक अतिशय सधन परिसंस्थेचा भाग म्हणून ओळखला जातो. या वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्थेत विविध प्रकारचे सागरी जीव वाढतात. त्यात क्रील, माखली यांसारख्या अपृष्ठवंशी लहान कवचधारी प्राण्यांपासून ते पेंग्विन, सील, देवमासा इ. मोठ्या पृष्ठवंशी प्राण्यांसारख्या सजीवांचा समावेश आहे. क्रील हा अंटार्क्टिका अन्नसाखळीचा आधार घटक आहे. अंटार्क्टिका खंड खनिज संसाधनांच्या दृष्टीने अतिशय सधन आहे. तेथे क्रोमियम, तांबे, खनिज तेल, दगडी कोळसा या खनिजांचे मोठे साठे आहेत.

इ.स. १९५९ च्या अंटार्क्टिका करारानुसार अंटार्क्टिका हा आंतरराष्ट्रीय भूप्रदेश म्हणून ओळखला जातो. या करारावर १९५९ साली १२ राष्ट्रांच्या स्वाक्षर्‍या होत्या. आता त्यावर एकूण ४५ राष्ट्रांच्या स्वाक्षर्‍या आहेत. या करारातील अटीनुसार या खंडावरील संसाधनांचा उपयोग जागतिक शांततेसाठी केला जाईल. तसेच या भूप्रदेशावर कोणत्याही देशाचा हक्क किंवा अधिकार राहणार नाही. याशिवाय अंटार्क्टिकावरील संसाधने शाश्वत राहावीत व पर्यावरण प्रदूषणमुक्त राहावे अशी जगातील पर्यावरणवाद्यांची मागणी आहे.

अलीकडील काळात पर्यटनाच्या विकासामुळे अंटार्क्टिकाच्या पर्यावरणावर परिणाम होत आहे. दरवर्षी सु. ३,००० प्रवासी जहाजे अंटार्क्टिकाभोवतीच्या महासागरात प्रवेश करतात. त्यामुळे पेंग्विनच्या जीवनमानात व्यत्यय येत आहे. तापमान वाढीमुळे अंटार्क्टिकावरील बर्फ वितळले जात आहे. विशाल हिमखंड मुख्य भूमीपासून अलग होत आहेत. त्याचा परिणाम अंटार्क्टिका परिसंस्थेवर होत आहे. पृथ्वीच्या वातावरणातील संपूर्ण ओझोन स्तराच्या पाहणीसाठी खास कृत्रिम उपग्रहांतून उपकरणे कार्यरत करण्यात आली आहेत. या उपकरणांद्वारे असे आढळून आले आहे की, अंटार्क्टिकावरील वातावरणातील ओझोन स्तर पातळ होत आहे.

भारत सरकारने १९८१ सालापासून ‘अंटार्क्टिका संशोधन’ हा एक प्रमुख राष्ट्रीय कार्यक्रम हाती घेतला आहे. बहुविध संस्था व बहुविध विद्याशाखा यांच्या समन्वयातून हा कार्यक्रम राबविला जात आहे. भारतीय संशोधकांनी २०१० पर्यंत ३० मोहिमा पूर्ण केलेल्या आहेत. या मोहिमांत महाराष्ट्रातील अनेक संशोधकांचा मोलाचा सहभाग आहे. पूर्व अंटार्क्टिकातील मध्यभूमीत ‘मैत्री’ हे भारतीय स्थानक आहे. या मोहिमेंतर्गत राष्ट्रीय प्रयोगशाळा, संशोधन संस्था, विद्यापीठे, सर्वेक्षण विभाग अशा ७५ संस्थांतील १,५०० तज्ज्ञांना संशोधनासाठी निमंत्रित करण्यात येते. राष्ट्रीय अंटार्क्टिक व महासागरी संशोधन केंद्र ‘नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिक अँड ओशन रिसर्च’ पणजी (गोवा) येथे आहे.

भारतीय संशोधक अंटार्क्टिकाच्या सरोवरातील जीवसृष्टीचा, तेथील जैवविविधतेचा, सजीवांवरील ध्वनिप्रक्रियेच्या परिणामांचा आणि सजीवांच्या अवशेषांचा अभ्यास करीत आहेत. तसेच हवेचे प्रवाह, हिमभेगा, समुद्र-बर्फ-महासागर-वातावरण यातील आंतरक्रिया यासंबंधी अभ्यास करीत आहेत.

भारत सरकारतर्फे सध्या ‘भारती’ नावाचे संशोधन केंद्र उभारण्यात येत असून २०१२ साली ते कार्यान्वित होणार आहे.

भारताखेरीज जगातील अनेक प्रमुख राष्ट्रांची संशोधन केंद्रे अंटार्क्टिकावर आहेत. एका वेळेस साधारण ४,००० शास्त्रज्ञ तेथे काम करीत असतात. हरितगृह वायू परिणामाच्या मापनासाठी अंटार्क्टिका हे प्रमुख केंद्र आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा