डॅफोडिल हे बहुवर्षायू फुलझाड अॅमारिलिडेसी (मुसली) कुलातील असून ती एकदलिकित वनस्पती आहे. या कुलातील नार्सिसस प्रजातीच्या वनस्पतींना सर्वसाधारणपणे डॅफोडिल म्हणतात. या प्रजातीत सु. ५० जाती व अनेक उपजाती असून अंदाजे १,३०० संकरित प्रकार आहेत. डॅफोडिल हे नाव काही ठिकाणी वन्य डॅफोडिल किंवा लेंट लिली या जातीसाठी वापरले जाते. लेंट लिली या जातीचे शास्त्रीय नाव नार्सिसस स्यूडोनार्सिसस आहे. ही जाती यूरोपमध्ये पूर्व पोर्तुगाल ते जर्मनी, स्पेन, इंग्लंड, वेल्स इत्यादी ठिकाणी आढळते. सध्या अनेक ठिकाणी (उ.यूरोप, उ.अमेरिका) डॅफोडिलाची लागवड केली जाते. डॅफोडिल हे ग्रेट ब्रिटनमधील वेल्स या विभागाचे राष्ट्रीय फूल आहे. इंग्रज निसर्गकवी विल्यम वर्ड्स्वर्थ याने डॅफोडिल कवितेत डॅफोडिल फुलाचे सुंदर वर्णन केले आहे.
डॅफोडिल ही वनस्पती कंदापासून वाढते. ती सु. ४० सेंमी. उंच वाढते. तिला ५–६ पानांचा झुबका येतो. पाने कंदापासून जमिनीवर वाढतात व त्यांची लांबी सु. ३० सेंमी. असते. पाने भुऱ्या रंगाची, लांबट व निमुळती असतात आणि त्यांमधून फुलाचा दांडा येतो. या दांड्याला सहा पाकळ्या असलेले दलपुंज व त्याच्या मध्यभागी गडद रंगाचे मोठे व तुतारीच्या आकाराचे लोंबते तोरण (ट्रंपेट्स) असते. तोरण दलपुंजाइतके अथवा त्यापेक्षा लांब असते. तोरणाच्या मध्यातून सहा पुं–केसर बाहेर येतात. फुले मोठी, फिकट पिवळ्या रंगाची, सुवासिक आणि लोंबती असतात. वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देणारी डॅफोडिलाची फुले अत्यंत आकर्षक असून ती अधिक काळ टिकतात. त्यांच्या टिकाऊपणामुळे व त्यांची विशेष काळजी घ्यावी लागत नसल्यामुळे अलीकडे ही फुले सजावटीसाठी लोकप्रिय झाली आहेत. मूळच्या पिवळ्या फुलांच्या जातीपासून निरनिराळे संकरित प्रकार उपलब्ध झाले आहेत. त्यांतील काहींच्या पाकळ्या पांढऱ्या व त्यातील तुतारीचा रंग गुलाबी, तर काहींत पाकळ्या पिवळ्या आणि तुतारी नारिंगी अशा विविध रंगसंगतीची फुले आढळतात. पाकळ्या व तुतारी दोन्ही पांढरी असलेले प्रकारही दिसतात.
पूर्वी रोमन संस्कृतीतील लोक डॅफोडिलाची मोठ्या प्रमाणावर लागवड करीत. परंतु सोळाव्या शतकापर्यंत हे फूल विस्मृतीत गेले होते. १६२९ मध्ये काही इंग्रजांनी या वनस्पतीचे कंद जंगलातून आणून बागांमध्ये तिची लागवड केली. ही फुलझाडे जंगलात, गवताळ प्रदेशात तसेच खडकाळ जमिनीत वाढतात. चांगले ऊन व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन त्यांना मानवते.
डॅफोडिलाच्या काही जाती भारतातील बागांतही लावतात. नार्सिसस जोन्क्विला ही सु. ४५ सेंमी. उंचीची द. यूरोप व अल्जेरिया येथील जाती भारतातील बागांत लावलेली आढळते. या जातीला २–६ पिवळ्या सुगंधी फुलांचा फुलोरा येतो. फ्रान्समध्ये तिच्या फुलांपासून बाष्पनशील तेल काढतात व त्याचा सुगंधी द्रव्यांत उपयोग करतात. नार्सिसस टॅझेटा ही जाती कॅनरी बेटे ते जपान या भागात आढळते व तीही भारतातील बागांत लावतात. ३०–५० सेंमी. उंचीच्या दांड्यावर पेल्यासारखे पिवळे तोरण असलेल्या अनेक सुगंधी पांढऱ्या फुलांचा फुलोरा येतो. या फुलांपासून उग्र व सुगंधी बाष्पनशील तेल काढतात. त्यापासून फ्रान्समध्ये उच्च प्रतीची फ्रेंच अत्तरे बनविली जातात.
डॅफोडिलाच्या कंदामध्ये व पानांमध्ये लायकोरिन हा विषारी अल्कलॉइड पदार्थ असतो. त्यामुळे हरिणे, खारी, ससे इत्यादी त्याच्या वाटेस जात नाहीत. तोडलेल्या फुलांच्या देठातून एक प्रकारचा रस बाहेर येतो. तो विषारी असल्यामुळे पुष्पगुच्छ तयार करताना विशेष काळजी घ्यावी लागते. वैज्ञानिकांना असे आढळले आहे की, डॅफोडिलाच्या कंदातील नार्सिक्लासिन हे संयुग मेंदूतील कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखू शकते. त्यासंबंधी अजून संशोधन चालू आहे.