(१) शंख, (२) शिंपला.

(काँच अँड स्कॅलप). मृदुकाय संघातील प्राण्यांच्या कवचांना शंख किंवा शिंपला म्हणतात. मृदुकाय संघात उदरपाद (गॅस्ट्रोपोडा) वर्गातील बहुतेक प्राण्यांना कठीण कवच असते, या कवचाला शंख म्हणतात. तर याच संघातील द्विपुटी (बायव्हाल्व्हिया) वर्गातील प्राण्यांच्या कवचांना शिंपला म्हणतात.

शंख आणि शिंपला हे प्राण्यांचे सांगाडे म्हणजे बाह्यकंकाल आहेत. शंख आणि शिंपला हे काँकिओलीन व कॅल्शियम कार्बोनेट (कॅल्साइट वा ॲरॅगोनाइट) यांच्या विशिष्ट थरांनी बनलेली असतात. हे थर कवचाला लागून असलेल्या प्रावाराच्या स्रावापासून तयार होतात. प्रावार म्हणजे प्राण्याच्या त्वचेची घडी असून जिवंतपणी तिच्याद्वारे शंखातील आणि शिंपल्यातील प्राणी वेढलेले असतात. शंख आणि शिंपला हे तीन थरांचे बनलेले असतात. बाहेरचा पातळ थर काँकिओलीनपासून बनलेला असून त्याचा रंग हिरवा, तपकिरी किंवा पांढरा असतो. मधला थर कॅल्साइटने बनलेला असतो. सर्वांत आतील थर ॲरॅगोनाइटने बनलेला असून या थरात एकावर एक पातळ पापुद्रे असतात.

उदरपाद वर्गात गोगलगायी, कवड्या, लिंपेट इत्यादींचा समावेश होतो. या प्राण्यांना एकपुटी व कप्पे नसलेले कवच म्हणजे शंख असतो. शंख सामान्यपणे मळसूत्राप्रमाणे सर्पिल आणि असममित असतो. काही शंखाचा आतला पृष्ठभाग चिनी मातीच्या रंगाचा, तर काहींचा मोत्याच्या रंगाचा दिसतो. शंखाची वेटोळी एकमेकांना चिकटलेली असून लगतच्या दोन वेटोळ्यांमध्ये संधिरेषा म्हणजे सेवनी असते. शेवटचे वेटोळे सामान्यपणे त्याच्या आधीच्या वेटोळ्यांपेक्षा मोठे असते. शेवटचे वेटोळे वगळून उरलेल्या शंखाच्या भागाला कळस अथवा शिखर म्हणतात. शिखरापासून सर्वांत दूर असलेला भाग म्हणजे शंखाचा पाया असतो. काही शंखांमध्ये पायाला झाकण असते. शंखातील प्राणी जिवंतपणी शरीर आकुंचित करून शंखात घेतात आणि झाकण बंद करून टाकतात. शंखामुळे प्राण्याचे शत्रूंपासून रक्षण होते. शीतकालीन अवस्थेत हे प्राणी शंखातच झोपून राहतात. शंखाची वेटोळी आतूनही एकमेकांना चिकटलेली असतात. त्यामुळे शंखाच्या मध्यभागी शिखरापासून पायापर्यंत जाणारा एक कणा अथवा अक्ष तयार होतो. शंखातील पोकळी मुखापासून शिखरापर्यंत सलग असते. शंखाचे शिखर दूर राहील अशा रीतीने शंख धरून मुखाच्या बाजूने पाहिल्यास मुख उजवीकडे किंवा डावीकडे येते. उजवीकडे गुंडाळी असल्यास त्या शंखाला उजवा शंख अथवा दक्षिणावर्ती म्हणतात, तर डावीकडे गुंडाळी असल्यास डावा शंख अथवा वामावर्ती म्हणतात. शंख बहुतकरून उजवे असतात. सागरी गोगलगाईच्या शंखांना कवडी म्हणतात. शंखाचे आकार, आकारमान, रंग, नक्षी, चकाकी यात पुष्कळ विविधता आढळते. त्यांचे आकारमान काही सेंमी.पासून ते ६० सेंमी.पेक्षाही जास्त असते. समुद्री शंख जड आणि बळकट, तर जमिनीवरील शंख हलके, पातळ व नाजूक असतात.

द्विपुटी वर्गातील प्राण्यांच्या कवचाला शिंपला अथवा शिंपा म्हणतात. शिंपला हा दोन चलनक्षम झडपांचा अथवा पुटांचा बनतो. उजवे व डावे ही दोन पुटे वरच्या कडेवरील बीजागरी व बंध यांनी एकत्र जुळलेले असतात. दोन शिंपल्यांच्या आत प्राण्याचे मृदू शरीर असते. शिंपल्यांच्या पृष्ठभागावर वृद्धिरेषा असतात. त्या संकेंद्री असून शरीराच्या वाढीची कल्पना देतात. शिंपल्याची लांबी २ मिमी. ते २ मी.पर्यंत असते, तर वजन काही ग्रॅम ते २५० किग्रॅ. असते.

शंख आणि शिंपले विविध कारणांसाठी वापरतात. त्यांपासून अलंकार, शोभिवंत वस्तू, सजावटी वस्तू, आयुधे, वाद्ये, तबके, मणी, गुंड्या, पेट्या, वाट्या, माळा इ. तयार करतात. पूर्वी कवड्या चलन म्हणून वापरत. सारीपाट या खेळात कवड्या फासे म्हणून वापरतात, त्यांना दानकवड्या म्हणतात. शंख आणि शिंपले कॅल्शियमचा एक मुख्य स्रोत आहेत. शंखापासून मिळविलेला चुना बांधकामासाठी तसेच कॅल्शियमच्या औषधपूरक गोळ्यांमध्ये वापरतात. भारतात हिंदूधर्मीय धार्मिक कार्यात शंख वाद्य म्हणून वापरतात. काही खेकडे शंखात राहतात. खनिज तेलांच्या साठ्यांचे सर्वेक्षण शंखशिंपल्याच्या मदतीने केले जाते. ऑस्ट्रेलियातील प्रवाळांबरोबर आढळणारा महाकाय शिंपला (ट्रिडॅकना जायजास) सु. २०० किग्रॅ. वजनाचा असतो. या मृत प्राण्याच्या शिंपल्याचा उपयोग बाळाला झोपविण्यासाठी पाळणा म्हणून करतात. शंख आणि शिंपले गोळा करणे, त्यांचा संग्रह करणे हा एक छंद आहे. शंख, शिंपल्यांच्या अभ्यासाला काँकालॉजी म्हणतात. शंख आणि शिंपले यांच्यातील जिवंत प्राणी मेल्यानंतर त्यांचे मृदू भाग कुजून नष्ट होतात. सामान्यपणे ज्यांना शंख, शिंपले म्हटले जाते ती म्हणजे या प्राण्यांची उरलेली कवचे असतात.