अमानुल्ला, अमीर : (१ जून १८९२ –२५ एप्रिल १९६०). अफगाणिस्तानचा १९१९–२९ या काळातील अमीर. देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्याने १९१९ मध्ये इंग्रजांबरोबर जे युद्ध सुरू केले तेच तिसरे इंग्रज–अफगाण युद्ध म्हणून ओळखले जाते. ह्या युद्धानंतर झालेल्या तहानुसार इंग्रजांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्रीय संबंध नियंत्रित करण्याचा आपला अधिकार सोडून दिला; परंतु त्याचबरोबर त्यांनी अफगाणिस्तानला देण्यात येत असलेली आर्थिक मदतही बंद केली.
स्वतंत्र अफगाणिस्तानचे नवे संविधान व कार्यक्षम प्रशासन ह्यांसाठी अमानुल्लाने अनेक योजना आखल्या. त्याने १९२७ मध्ये यूरोपचा दौरा केला व परत येताच पाश्चात्त्य पद्धतींवर अफगाणिस्तानात सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांतील सक्तीचे प्राथमिक शिक्षण, पडदा-पद्धत बंद करणे इ. सुधारणा महत्त्वाच्या होत. यांतील काही सुधारणांमुळे सनातनी समाज असंतुष्ट होऊन अफगाणिस्तानात यादवी सुरू झाली. १९२९ मध्ये अमानुल्लाला राज्यत्याग करून इटलीत जावे लागले.
झुरिक (स्वित्झर्लंड) येथे त्याचे निधन झाले.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.