भारतात भाजीपाला लागवडीमध्ये बटाटा हे प्रमुख पीक मानले जाते. सर्व भाजीपाल्याच्या वार्षिक उत्पादनामध्ये हे पीक अग्रस्थानी आहे. बटाटा पीक मूळचे दक्षिण अमेरिकेच्या ‘पेरू’मधील असून संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाणारे हे कंदमूळ आहे. स्पॅनिश दर्यावर्दी लोकांनी ही वनस्पती १५८७ च्या सुमारास यूरोपमध्ये आणली व पुढे ४० वर्षांनी या वनस्पतीची भारतात आयात झाली. पोर्तुगीज लोकांनी याची भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळच्या प्रदेशात लागवड सुरू केली. नंतर ब्रिटिश व्यापाऱ्यांनी ती बंगालमध्ये नेली.

बटाटा हे पीक सोलॅनेसी (Solanaceas) कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव  सोलॅनम ट्यूबरोझम (Solanum tuberosum) असे आहे. ते भारतात बटाटा, आलू इ. स्थानिक नावांनी ओळखले जाते. जागतिक पातळीवर बटाटा या पिकाचे सर्वाधिक उत्पादन ‘चीन’ या देशात होते आणि त्या खालोखाल भारताचा क्रमांक लागतो. यानंतर रशियासह इतर यूरोपियन देशांचा क्रमांक लागतो.

भारतामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये बटाट्याची लागवड प्रामुख्याने केली जाते. या पिकाखालील एकूण क्षेत्राच्या ८०% पेक्षा अधिक क्षेत्र या प्रमुख राज्यांमधील आहे. भारतातील उत्तर प्रदेशात या पिकाचे उत्पादन अधिक होते. महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, नागपूर आणि औरंगाबाद या जिल्ह्यात रब्बी हंगामात जास्त प्रमाणात या पिकाची लागवड केली जाते.

बटाट्यापासून निरनिराळे पदार्थ तयार करता येतात. महाराष्ट्रात वेफर्स, पापड, चीप्स, किस करण्याचे कुटिरउद्योग आहेत. गेल्या काही काळात जागतिकीकरणामुळे प्रक्रिया उद्योगात मोठी वाढ झाली आहे. मागणी वाढल्यामुळे उद्योगही वाढत आहेत. हरियाणामध्येही वेफर्स उद्योग फार मोठ्या प्रमाणावर चालू आहेत.

हवामान : बटाटा हे थंड हवामानातील पीक आहे. या पिकास सरासरी १६ ते २१० से. तापमान लागते. पिकाच्या सुरुवातीच्या काळात २४० से. तापमान पोषक असून बटाटे पोसण्याच्या काळात १८० से. तापमान अनुकूल असते.

जमीन :  मध्यम ते हलक्या व गाळाच्या जमिनीत बटाट्याची लागवड चांगल्या रीतीने करता येते. जमीन कसदार भुसभुशीत व उत्तम निचर्‍याची असावी. जमिनीचा सामू ६ ते ८ च्या दरम्यान असावा.

लागवड : बटाट्याची लागवड खरीप हंगामात १५ जून ते १५ जुलै दरम्यान करावी. बेणे उत्तम दर्जाचे असावे. हेक्टरी १५ ते २० क्विंटल बेणे लागवडीस पुरेसे असते. लागवडीपूर्वी बेणे डायथेन एम ४५,१०० ग्रॅ.४५ लि. पाण्यात ५ मिनिटे बुडवावे व नंतर लागवडीसाठी वापरावे. कुफरी ज्योती, कुफरी सूर्या या वाणांची लागवड खरीप हंगामात करावी.लागवडीसाठी बेणे ३०-४० ग्रॅ. वजनाचे व ३.५ सेंमी. व्यासाचे असावे.विषाणू रोगापासून बेण्याचा र्‍हास होतो.म्हणून बटाट्याचे प्रमाणित बेणेच वापरावे.राष्ट्रीय बीज निगम किंवा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यांच्या प्रतिनिधींकडून आगाऊ नोंदणी करून बटाटा बेणे खरेदी करावे. बटाटा बेणे शीतगृहात ठेवलेले असल्यामुळे ते लागवडीपूर्वी ७-८ दिवस पसरट व हवेशीर जागी मंद प्रकाशात चांगले कोंब येण्यासाठी ठेवणे आवश्यक आहे. बटाट्याचे विषाणुविरहीत बेणे तयार करण्यासाठी Tissue Culture चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

खत व्यवस्थापन : लागवडीपूर्वी जमिनीस १५ ते २० टन प्रति हेक्टरी चांगले कुजलेले शेणखत द्यावे. तसेच १५० किग्रॅ. नत्र, ६० किग्रॅ.स्फूरद आणि १२० किग्रॅ. पालाश प्रतिहेक्टरी द्यावे. त्यापैकी नत्राची अर्धी मात्रा लागवडीपूर्वी द्यावी आणि उर्वरित मात्रा लागवडीनंतर एका महिन्याने भर देताना द्यावी.

पाणी व्यवस्थापन : बटाट्यास जमिनीच्या मगदुराप्रमाणे एकूण ५० ते ६० सेंमी. पाण्याची गरज असते. सरी बरंबा पद्धतीने रानबांधणी केल्यास पाण्याची बचत होऊन बटाट्याचे उत्पादन जास्त मिळते. लागवडीनंतरचे हलके (आंबवणी) पाणी द्यावे. नंतर चार-पाच दिवसांनी पाण्याची दुसरी पाळी वरंबा २/३ उंचीपर्यंत भिजतील अशा पद्धतीने द्यावे. बटाट्याची वाढ पूर्ण झाल्यानंतर पाण्याच्या पाळ्या कमी कराव्यात.पीक वाढीच्या संवेदनक्षम अवस्थांना पाण्याचा पुरवठा होणे अत्यावश्यक असते. अन्यथा पीक उत्पादनात  घट होते.

पीक वाढीच्या अवस्था :

  • रोपावस्था : ही अवस्था लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी येते. या वेळी जमिनीत पुरेशी ओल नसेल तर पिकाची वाढ चांगली होत नाही.
  • स्टोलोनायझेशन : या अवस्थेत बटाटे तयार होण्यास सुरुवात होते. ही अवस्था लागवडीनंतर ४५ ते ६० दिवसांनी येते. या अवस्थेत पाण्याचा ताण बसल्यास बटाट्यांची संख्या, आकार कमी होतो व उत्पादनात घट येते.
  • बटाटे मोठे होण्याची अवस्था : ही अवस्था लागवडीनंतर ७० ते ७५ दिवसांनी प्राप्त होते. या अवस्थेत पाण्याच्या कमतरतेमुळे बटाटे खूप लहान राहतात. परिणामी उत्पादन घटते.
  • बटाटा लागवडीनंतर ५ ते ६ दिवसांनी जमीन वापश्यावर असताना बटाटा पिकामध्ये उगवणार्‍या तणांच्या बंदोबस्तासाठी मेट्रीबेंधीन २५ ग्रॅ. प्रति १० लि. पाण्यात या तणनाशकांची जमिनीवर फवारणी करावी.लागवडीनंतर साधारणतः २५ ते ३० दिवसांनी बटाटा पिकाच्या वरंब्यास मातीची भर द्यावी. यामुळे बटाट्याचे हिरवे होण्याचे प्रमाण कमी होते. या वेळी उर्वरित नत्राचा दुसरा हप्ता म्हणजेच ७५ किग्रॅ. नत्र प्रतिहेक्टर द्यावा.

बटाट्यावरील काही प्रमुख किडी  : बटाटा पिकावर प्रामुख्याने मावा, तुडतुडे, बटाटा पोखरणारी अळी या किडींचा तसेच लवकर व उशिरा येणारा करपा आणि विषाणुजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.या किडी आणि रोगांचे नियंत्रण एकात्मिक कीड व रोग नियंत्रण पद्धतीने केले जाते.

एकात्मिक कीड व रोग नियंत्रण :

  •  २-३ दिवसांतून पिकाचे सर्वेक्षण करावे.
  •  कामगंध सापळ्यांचा वापर करावा.
  •  बटाटा पिकावर रस शोषण करणार्‍या किडींच्या नियंत्रणासाठी स्पायरोमायसीफेन (२४० एस सी) १० मिली किंवा थायामेथॉक्झान (२५ इसी) ८ मिली. किंवा अॅसिटामीप्रीड २-३ ग्रॅ. किंवा डायमिथोएट (३० टक्के) १५ मिली. प्रति १० लि. पाणी यांच्यापैकी एका कीटकनाशकाची गरजेनुसार १५ दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी.
  •  रस शोषणार्‍या किडी विषाणुजन्य रोगांचा प्रसार करतात. कोवळी पाने आणि शेंडे यावर लक्ष ठेवून कीटकनाशक फवारणी करावी.
  •  पिकामध्ये एकरी ६-७ पक्षी थांबे करावेत. पिवळ्या रंगाचे चिकट सापळे प्रत्येक ४-५ ओळीनंतर लावावेत.
  •  पाने खाणार्‍या अळीचे पतंग पानावर अंडी घालतात. असे अंडीपुंज नष्ट करावेत.
  •  स्पोडोप्टेरा अळीसाठी जैविक बुरशीनाशक न्यूमोरिया रिलेय ५ ग्रॅ. प्रति लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  •  लवकर येणारा करपा या रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास पाण्यात मिसळणारे मॅन्कोझेब (७५ टक्के) या बुरशीनाशकाची २५ ग्रॅ. प्रति १० लि. पाण्यातून फवारणी करावी.
  •  मर रोगाच्या नियंत्रणासाठी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा व्हिरीडी ४० ते ५० ग्रॅ. प्रति १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  •  पावसामुळे मर रोगाचे प्रमाण वाढल्यास पाण्यात मिसळणारे मॅन्कोझेब (७५ %) २५ ग्रॅ. प्रति १० लि. पाण्यात मिसळून मुळाजवळ सोडावे.

बटाटा काढणी : काढणीपूर्वी ८ ते १० दिवस पाणी देऊ नये. बटाटे काढणी नांगराने किंवा पोटॅटो डिगरने करावी. काढणीनंतर बटाटे शेतात पडू न देता गोळा करून सावलीत आणावेत. आकारमानानुसार जाळीदार पोत्यात भरून बाजारात विक्रीसाठी किंवा शीतगृहात साठवणीसाठी पाठवावेत.

उत्पादन : उष्ण हवामान, लागवडीचे तंत्रज्ञान, शेतकऱ्यांपर्यंत माहितीचा अभाव आणि बटाटा काढणीनंतर साठवण करण्यासाठी शीतगृहांची (Cold Storage) कमतरता ही बटाट्याचे उत्पादन कमी येण्याची प्रमुख कारणे आहेत. अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड, योग्य लागवड पद्धत, आधुनिक तंत्रज्ञान यांचा संतुलित वापर केल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होते.

संदर्भ :

  • World Potato Statistics (FAO STAT 2017).
  • सिंह,बी. पी.; राना,राजेश के.बटाटा लागवडीतील समस्या,२०१४.
  • बटाटा प्रक्रिया उद्योग www.bookganga.com.
  • अरनेजा,सी. एस. ,सिंह, रमनदीप ;कौर,गुरबिंदर, ॲग्रिक, सायन्स डायजेस्ट २९ (२) २००९.
  • देशमुख,एम. आर. ;बनसोडे, जी, एम. ; सुपे,व्ही.एस. बटाटा लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान  www.digitalbaliraja.com.
  • कृषी विभाग, महाराष्ट्र शासन  www.krishi.maharashtra.gov.in.
  • फायदेशीर बटाटा लागवड www.destaktalk.com.
  • काटोले, रवीन्द्र . एकात्मिक कीड-रोग नियंत्रण, गोडवा कृषि प्रकाशन, पुणे, २००९.

समीक्षक – भीमराव उल्मेक

प्रतिक्रिया व्यक्त करा