बटाटा ही वनस्पती सोलॅनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव सोलॅनम ट्यूबरोजम आहे. मिरची, वांगी व टोमॅटो या वनस्पतीही याच कुलात मोडतात. जगभरात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाणारी बटाटा ही एक खाद्य वनस्पती आहे. ती मूळची दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि बोलिव्हिया देशांच्या सीमेवर असलेल्या अँडीज पर्वतातील आहे. सोळाव्या शतकात स्पॅनिश दर्यावर्दींनी ती यूरोपात आणली. पोर्तुगिजांनी भारतात पश्‍चिम किनाऱ्याजवळच्या प्रदेशात बटाट्याची लागवड केली. बटाट्यात असलेल्या पोषक घटकांमुळे अनेक देशांत मानवी आहारामध्ये त्याचा समावेश केला जातो.

बटाटा (सोलॅनम ट्यूबरोजम) : पाने आणि खोड (बटाटा)

बटाट्याचे रोप सर्वसाधारणपणे ०·३–१·२५ मी. उंच वाढते आणि त्याचे खोड जमिनीलगत पसरते. रोपाची मुळे आगंतुक, मुख्य खोडाच्या पेरावर व जमिनीलगतच्या थरात वाढणारी असतात. खोड लहान, मऊ, जांभळ्या-हिरव्या रंगाचे, त्रिकोणाकृती व पोकळ असते. याच्या शाखांना भूस्तरिका म्हणतात व त्या जमिनीलगत वाढतात. त्यांच्या टोकाला अन्नसंचय झाल्यामुळे ते खोड फुगते आणि मोठे होते. हे फुगलेले खोड म्हणजे बटाटा. बटाट्यावरील डोळे म्हणजे पेरावरील कक्षस्थ कलिका आहेत. बटाट्याची साल पातळ, फिकट पिवळी, क्वचित लाल किंवा जांभळी असते. पाने संयुक्त, लवदार व पिच्छाकृती असून टोकाची पर्णिका मोठी असते. फुले पांढरी व विविधरंगी असून वल्लरीत येतात. पांढरी फुले असलेल्या क्षुपाचे बटाटे पांढऱ्या सालीचे असतात, तर रंगीत फुलांच्या बटाट्यांची साल गुलाबी, लाल, निळी किंवा जांभळी असते. मृदुफळे हिरवी, गोलसर १·५-२·५ सेंमी. व्यासाची असून त्यांत अनेक चपट्या बिया असतात. त्या बिया विषारी असतात.

जगात सर्वत्र मिळून बटाट्याचे सु. ५,००० वाण आहेत. त्यांपैकी सु. ३,००० वाण पेरू, चिली, बोलिव्हिया, एक्वादोर आणि कोलंबिया या देशांत दिसून येतात. सो. ट्यूबरोजम ही जाती आणि तिच्यापासून तयार केलेले आधुनिक वाण यांचीच लागवड जगात मोठ्या प्रमाणावर केली जाते. बटाट्याची लागवड शाकीय पद्धतीने म्हणजे ग्रंथिक्षोडाचे तुकडे लावून करतात. प्रत्येक तुकड्यावर किमान दोन डोळे असावे लागतात. चीनमध्ये बटाट्याची लागवड सर्वाधिक केली जात असून त्यानंतर भारत, रशिया, युक्रेन आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशांचा क्रम लागतो.

बटाट्यात ७५% पाणी आणि २०% स्टार्च हे दोन मुख्य घटक आहेत. यांशिवाय त्यात काही प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्व आणि ब-समूह जीवनसत्त्वांपैकी निॲसीन असते. बटाटा हे लवकर पचणारे अन्न आहे. बटाटा उकडून किंवा तळून त्यापासून वेगवेगळे अन्नपदार्थ बनविले जातात. भारतात बटाट्यापासून तयार केलेले वडे, भाजी आणि वेफर मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. उकडलेल्या बटाट्याची साल भारतीय उपचार पद्धतीत भाजलेली जखम बरी करण्यासाठी लावतात. बटाट्यातील स्टार्चचा उपयोग वस्त्र-उद्योगात तसेच व्होडका हे मद्य तयार करण्यासाठी होतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा