अनवरी : (११२० ? — ११९० ?). एक फार्सी कवी. संपूर्ण नाव हकीम औहदुद्दीन अली बिन इसहाक अनवरी.जन्म इराणमधील खोरासान प्रांतातील अबिवर्द येथे. तूस येथे त्याचे शिक्षण झाले. अरबी आणि फार्सी भाषा-साहित्यांचा त्याने उत्तम अभ्यास केला होता. ज्योतिषशास्त्राचे अध्ययनही त्याने केले होते. मर्व्ह (मारी) येथील संजार (कारकीर्द १११८–११५३) नामक सेल्जुक तुर्की सुलतानाने त्याला राजकवी म्हणून आपल्या दरबारी ठेविले होते. या सुलतानावर त्याने अनेक उत्तम ‘कसीदा’ (स्तुतिपर कविता) रचलेल्या आहेत. ११५३ मध्ये गझ जमातीच्या टोळ्यांनी खोरासानवर स्वारी करून संजारला कैद केल्यामुळे अनवरीला विपन्नावस्था प्राप्त झाली. या स्वारीमुळे खोरासानच्या जनतेस झालेले दुःख ‘खोरासानचे अश्रू ’ या प्रसिद्ध विलापिकेत त्याने उत्कटपणे व्यक्त केले आहे. त्याच्या आयुष्याचा बराचसा काळ मर्व्ह येथेच गेला. तथापि त्याचे अखेरचे दिवस मात्र बाल्ख येथे गेले.
त्याच्या काव्यातून रचनाकौशल्याबरोबरच त्याची बहुश्रुतता आणि कलासक्ती दिसून येते. त्याचे काव्य सर्वसाधारणतः समजण्यास अवघड असल्यामुळे त्यावर भाष्ये व्हावीत, असे काही फार्सी साहित्य समीक्षकांनी व्यक्त केले आहे. त्याची भावगीते मात्र सुबोध असून त्यांतून हळुवार भावनाविष्कार आढळतो. त्याच्या कवितांचा एक संग्रह १८८० मध्ये लखनौ येथे प्रकाशित झाला आहे. त्याच्या काही कवितांची इंग्रजी भाषांतरेही झाली आहेत.
भाषांतरकार – अनिल कुलकर्णी